आद्य शंकराचार्य आणि संस्कृत सिनेमा !!

अलीकडेच मला एक नाद खुळा लिंक मिळाली. मी सर्च मारत होतो आद्य शंकराचार्यांबद्दल , तर युट्युबवर त्यांच्या आयुष्यावर आधारलेला “आदि शंकराचार्य ” नावाचा पिक्चर च हाती लागला . त्याचे वैशिष्ट्य असे की त्यातील सर्वच्या सर्व डायलॉग संस्कृतमध्ये आहेत. अगदी त्या काळात गेल्याचा भास झाला- मग तात्पुरता का असेना. सर्व सीन अगदी उत्कृष्ट वठले आहेत. कोणी अय्यर म्हणून डायरेक्टर आहेत .इ.स. ७८८ ते ८२० या अवघ्या ३२ वर्षांच्या छोट्या अवधीमध्ये शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन असे काही केले, की त्यापुढे बौद्ध धर्म अगदी फिका पडला आणि भारतातून जवळपास नष्टच झाला तो तहत बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा intoduce करेपर्यंत. असो. शंकराचार्य आणि त्यांचे कार्य यांच्या मूल्यमापनाचे सध्या तरी प्रयोजन नाही, त्यामुळे खाडीलकरांच्या भाषेत सांगायचे झाले तर ” झाले इतके ईशस्तवन (introduction) पुरेसे आहे “.

पूर्ण पिक्चरभर वैदिक धर्म असा भरभरून जाणवत राहतो आणि मन आपसूक त्या काळात ओढले जाते . पिक्चरची सुरुवातच मुळी एका अतिशय बोलक्या सीन ने होते- नदीकिनारी ४ ब्राह्मण मंत्र म्हणत असतात आणि background ला “णमो अरीहंताणं”, “बुद्धं शरणं गच्छामि” असे आवाज हळू, पण स्पष्ट ऐकू येतात आणि ते हळूहळू मोठे होतात. आणि मग निवेदक सांगतो की वैदिक धर्माला तगडी स्पर्धा कशी आहे ते. आणि सीन लगेच ट्रान्स्फर होतो केरळमधील कलाडी गावात . शंकराचार्यांचे वडील शिवगुरू हे शास्त्रे शिकविण्यात मग्न असतात आणि आई आर्याम्बा घरकामे करण्यात. बाल शंकराचार्य आईकडे हट्टसुद्धा असा करतात की भाई वाह!

पण सगळ्यात उत्तम वठले आहेत ते म्हणजे मंडनमिश्र आणि कुमारीलभट्ट यांच्याबरोबरचे संवाद. कुमारीलभट्ट हे आत्मदहन करणार इतक्यात येऊन शंकराचार्य त्यांची मनधरणी करतात तेव्हा ते आपली कहाणी कशी सांगतात, तो सीन उत्तम आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे महिष्मती नगरीमध्ये (नर्मदेच्या काठी M .P. मध्ये कुठेतरी) शंकराचार्य मंडनमिश्र यांचे घर कुठे आहे? अशी पृच्छा करतात, तेव्हा त्यांना उत्तर मिळते- ” गिरांगना यत्र गिरा किरंती” ज्या घरातील पिंजर्यातील पोपटदेखील वेद स्वत:प्रमाण की परत:प्रमाण यावर चर्चा करतात , ते घर मंडनमिश्र यांचे आहे. तो सीन पाहून तर शांकर दिग्विजय नाटक पाहिल्याचा भास झाला . अर्थात दोघांमधील अगदी लहान पोरांसारखे डायलॉग पिक्चर मध्ये नाहीत, हे खरंय. नाटकातील संवादाचा एक मासला असा आहे:

मंडनमिश्र : कुतो मुण्डि ? अरे मुंडण केलेल्या(संन्याशा), तू कुठून आलास?
शंकराचार्य: आगलात् मुण्डि | त्यांनी अर्थ घेतला की कुठपर्यंत मुंडण केलेस? आणि त्याप्रमाणे उत्तर दिले की
गळ्यापर्यंत मुंडण केले.
मंडनमिश्र: पन्थास्ते पृच्छते मया | तुझा मार्ग विचारला.
शंकराचार्य : किमाह पंथा:? त्यांनी अर्थ घेतला की रस्ता काय म्हणाला म्हणून.
मंडनमिश्र: अहो पीता किं सुरा? अहो दारू प्यायलात की काय ?
शंकराचार्य : नैव पीता श्वेता स्मर | दारू पीता(पिवळी) नसते, तर श्वेता (पांढरी) असते.
मंडनमिश्र: किं त्वं जानासि तद्वर्णं? म्हणजे तुम्हाला दारूचा रंग माहिती आहे तर!
शंकराचार्य : अहं वर्णं भवान् रसम् ॥ मला फक्त रंग माहित आहे, पण तुम्हाला चव देखील माहिती आहे!

विस्ताराचा धोका पत्करूनदेखील हे लिहावेसे वाटले – राहवलेच नाही . very hilarious !!

शंकराचार्यांनी लिहिलेली विविध स्तोत्रे तर या सिनेमाची जान आहेत. मंडनमिश्रांची पत्नी शारदा शंकराचार्यांना जेवण वाढत असताना त्यांना अन्नपूर्णेचे स्तोत्र सुचते आणि लगेच शार्दुलविक्रीडीते सुरु करतात: प्रालेयाचलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी | भिक्षां देही कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी || आणि भज गोविन्दं भज गोपालं ची प्रेरणा काशी मिळाली तो सीन तर मोठाच उद्बोधक आहे. शंकराचार्य काशीमध्ये गंगेत स्नान करून येत असताना त्यांना एक वैयाकरणी पाणिनीची “डूकृय” इत्यादी सूत्रे शिकवत असलेला दिसतो आणि लोकांना उपदेश करताना ते स्फूर्त्याधीन होऊन बोलू लागतात: ” भज गोविन्दं भज गोपालं मूढमते | प्राप्ते सन्निहिते न हि न हि रक्षति डूकृयकरणे |”

हि आणखीही अनेक वैशिष्ट्ये आहेत या सिनेमामध्ये. मुख्य म्हणजे संस्कृतचा वापर केल्याने त्या काळाचा फील फारच सुंदर येतो – जर कुणाला संस्कृत कळत नसेल तर इंग्लिश सबटायटल्स आहेत , त्यामुळे भाषेचा अडसर पण नाही येणार.

लिंक्स आहेत:

Advertisements
This entry was posted in सिनेमा. Bookmark the permalink.

12 Responses to आद्य शंकराचार्य आणि संस्कृत सिनेमा !!

 1. Naniwadekar म्हणतो आहे:

  “शंकराचार्यांचे वडील शिवगुरू हे शास्त्रे शिकविण्यात मग्न असतात …”

  शंकराचार्यांचा जन्म त्यांच्या वडिलांच्या मृत्युनन्तर झाला, असा अ‍ुल्लेख ‘अ‍ेक शून्य मी’ पुस्तकातल्या ‘शूरां मी वन्दिले’ लेखात पु लं नी केला आहे.

  भज गोविन्दं भज गोपालं मूढमते –> हे आचार्यांचे मूळचे शब्द आहेत का? पज्झटिका छन्दाच्या प्रत्येक ओळीत ३२ मात्रा हव्यात. (पुनरपि जननं (८) – पुनरपि मरणं (८) – पुनरपि जननी (८) – जठरे शयनम्‌ (८)). मात्र ‘भज गोविन्दं – भज गोविन्दं – गोविंदम्‌ भज – मूढमते’ मधेही शेवटच्या चरणात सहाच मात्रा असल्याचा शोध हे लिहिताना लागला आहे. तेव्हा ही ओळ तीस मात्रांच्या छन्दात (ज्याला मराठीत ‘हरिभगिनी’ आणि हिन्दीत ‘ताटंक’ नाव आहे) बसते. पण तिचा घाट मात्र हरिभगिनीचा अजिबात नाही, तो पज्झटिकेचाच आहे.

  हा सिनेमा दूरदर्शनवर १९८६-च्या सुमारास मी १०-१५ मिनिटे पाहिला होता.

  – नानिवडेकर

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   सिनेमा तरी म्हणतो आहे की शंकराचार्यांच्या वडिलांचा मृत्यू शंकराचार्य लहान असताना झाला म्हणून . विकिपीडिया देखील तेच म्हणतोय.
   असो , मी याबद्दल तरी अजून पक्का पुरावा शोधलेला नाही . पाहायला हवा.
   आणि भज गोविन्दं बद्दल म्हणाल तर बृहत्स्तोत्ररत्नाकर तरी आपण म्हणालात ते शब्द त्यांच्या पाठात देतोच. त्यापेक्षा जुना पाठ मी पाहिला नाही . तो पाठ १९१५ चा आहे . त्यापेक्षा जुना पाठ मी नाही पाहिलेला अजून. बाकी ते शब्द शंकराचार्यांचे नसावेत, अशी शंका का यावी? निव्वळ वृत्तातील गणमात्रांचा हिशेब चुकला तरी आशयापुढे ते क्षम्य आहे. भर्तृहरीच्या शतक त्रयीमधील वामन पंडितांच्या भाषांतरात अशा अनेक चुका दिसून येतील. त्यामुळे आशयाला धक्का लागत नाहीच. गेयता थोडीशी गंडली तरी.
   ह्या सिनेमाबद्दल नेटवर असे वाचले आहे की हा संस्कृतमध्ये बनविलेला पाहिला भारतीय सिनेमा आहे म्हणून. हे खरे आहे का?

 2. Naniwadekar म्हणतो आहे:

  ‘भज गोविन्दम्‌’ हे शब्द शंकराचार्यांचे नसावेत अशी मला शंका आली, अशी तुम्हांला का शंका आली हे कळत नाही. त्यांचे मूळचे उद्‌गार २२ मात्रांचे आहेत का, असा प्रश्न नक्की पडला. ‘आशयापुढे काय क्षम्य आहे’ यावर वेगळी मते असू शकतात. पज्झटिकेत वा इतरत्र पहिली वा शेवटची ओळ कमी-जास्त मात्रांची चालते का, यावरही चर्चा शक्य आहे. (गीत गोविन्दात जयदेवानी अनेकदा २७-२८ मात्रांच्या सूर्यकान्त-साकीच्या चरणांत चौथा पाद कमी मात्रांचा वापरला आहे. ‘सा विरहे तव दीना’ या चरणात बाराच मात्रा आहेत.) पण चर्पटपंजरीची पहिली ओळ ३२ मात्रांची नाही, हा मला नवीनच शोध होता. त्या स्तोत्रांत म्हणे आचार्यांचे स्वत:चे १५-१६ श्लोक आहेत, आणि त्यांच्या १३-१४ शिष्यांनी मिळून १५-१६ श्लोक दिले आहेत. ही माहिती वेबवर उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर-तुकारामाच्या अनेक अक्षरसंख्याक रचनांत छन्दहानी दिसते, आणि वाचकाची अपेक्षाही त्यानुसार ठरते. पण शंकराचार्यांकडून दोन मात्रा खाण्याची मला अपेक्षा नव्हती.

  हर मन्दिर सिंह ‘हमराज़’ यांच्याकडून मिळालेली माहिती अशी : संस्कृतमधे आज़वर तीन चित्रपट झाले आहेत. १९८३ साली ‘आदि शंकराचार्य’ हा पहिला, १९९२ मधे नन्तरचा आणि २००५ मधे शेवटचा. शेवटच्या दोन चित्रपटांची नांवे या क्षणी तरी मला माहीत नाहीत, आणि त्याविषयी फार उत्सुकताही नाही. बसल्या ज़ागी ती माहिती मिळाली तर मी तुम्हाला कळवीनच.

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   चर्पटपंजरीकेबद्दल मी आधी माहिती पाहिली नव्हती, त्याबद्दल आभार.

   >‘आशयापुढे काय क्षम्य आहे’ यावर वेगळी मते असू शकतात

   निदान कवितेत तरी आशयापेक्षा तिच्या बांधणीला अधिक महत्व कोणी दिल्याचे मला माहित नाही. कारण विश्वनाथ म्हणतो – “वाक्यं रसात्मकं काव्यम् |”

   > ज्ञानेश्वर-तुकारामाच्या अनेक अक्षरसंख्याक रचनांत छन्दहानी दिसते, आणि वाचकाची अपेक्षाही त्यानुसार ठरते.

   छंदहानी दिसते हे खरे , महाराष्ट्र सारस्वतात असे विधान आहे, की दिंडी, ओवी, अभंग यांसारखी वृत्ते जुने कवी अनिर्बंध मानून रचना करीत आलेत . एक साधे उदाहरण म्हणजे सुटसुटीत ज्ञानेश्वरी ओवीला मिळालेला एकनाथी ताण . पण वाचकाच्या अपेक्षेचा तिच्याशी काय संबंध? वाचक आशय पाहील की मात्रा जुळवत बसेल? फार तर मात्रा न जुळल्याने जरा किरकिर करेल इतकेच. मग ते शंकराचार्य असोत किंवा कालिदास असो . काव्यरचनेच्या भरात काहीवेळेस असे होते. कारण वृत्त हा शेवटी सांगाडा आहे आणि योग्य ते शब्द अगदी दरवेळेस त्यात चपखल बसतीलच असे सांगता येत नाही.

   आणि संस्कृत सिनेमाच्या माहितीबद्दल आभार.

 3. Nikhil Sheth म्हणतो आहे:

  You may find information about movies in sanskrut here –
  http://en.wikipedia.org/wiki/G._V._Iyer

 4. Naniwadekar म्हणतो आहे:

  पु लं चे मूळ वाक्य असे : ‘पतिनिधनोत्तर काही महिन्यांनी त्याची माता प्रसवली’. ही शंकराचार्यांच्या जन्माची कहाणी नसून त्यांच्या लहान भावाची (वा बहिणीची) कहाणी असू शकेल.

  > निदान कवितेत तरी आशयापेक्षा तिच्या बांधणीला अधिक महत्व कोणी दिल्याचे मला माहित नाही.
  >—

  अर्थ अजिबात न समज़ता कविता आवडल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. वृत्तांची लक्षणे सांगणार्‍या कवितांत आशय दुय्यम असतो. लक्षणरचना किंवा गीत यांना मी कवितेपेक्षा वेगळे मानत नाही. मला तो फरक कळतही नाही. तेव्हा माझ्या मतांचे मूळ माझ्या घोर अज्ञानात आहे. तरी एक शंका मनात आहे. ज़र एखाद्‌या सुनीतातली एक ओळ काढल्यावर ते जास्त आशयघन होत असेल तर कवी ती ओळ काढेल का? मग ते सुनीत राहणार नाही, आणि सुनीत लिहू घेतलेल्या कवीला १४ ओळींच्या बांधणीचे महत्त्व रहात असेलच.

  छन्दबद्‌धता राखून आशय व्यक्त करण्यात कौशल्य आहे. आशय वगैरे भानगडीत रस नसलेले, फक्त कवितेच्या नादासाठी अधूनमधून पद्‌य वाचणारे माझ्यासारखे लोकही आहेत. ‘अमुक गोष्ट लिहायची होती, पण तशी छन्दबद्‌ध रचना सुचली नाही, आणि दुसर्‍या आशयाची रचना सुचली म्हणून कवितेचा रोख बदलला’ अशी निर्मितीप्रक्रियाही शक्य आहे.

 5. निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

  >अर्थ अजिबात न समज़ता कविता आवडल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

  एखादी कविता नादानुकारी असेल तर अर्थाविनादेखील ती आवडू शकते – जसे की वामन पंडितांची फेमस टीपार्टी किंवा रघुनाथपंडितांची चूर्णिका किंवा “सुरलोकाहुनी गंगा खाली ” हा नरहरीचा कटाव. अर्थात निव्वळ नादानुकारी गुणधर्मामुळे आवडण्यापेक्षा sometimes अनुप्रास आणि अर्थ यांच्या एकत्र अनुभूतीमुळे कविता मनात घर करून राहते.

  >ज़र एखाद्‌या सुनीतातली एक ओळ काढल्यावर ते जास्त आशयघन होत असेल तर कवी ती ओळ काढेल का? मग ते सुनीत राहणार नाही, आणि सुनीत लिहू घेतलेल्या कवीला १४ ओळींच्या बांधणीचे महत्त्व रहात असेलच

  मुळात एखादी ओळ काढल्यावर जास्त आशयघन होणारे सुनीत कोण लिहील ? आणि समजा एखाद्या जुन्या सुनीतात तसे कुणाला काही आढळले, तर मूळ कवीच्या डोक्यात ते होते, असे म्हणणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणे आहे. It’s not necessarily true always.

  >अमुक गोष्ट लिहायची होती, पण तशी छन्दबद्‌ध रचना सुचली नाही, आणि दुसर्‍या आशयाची रचना सुचली म्हणून कवितेचा रोख बदलला’ अशी निर्मितीप्रक्रियाही शक्य आहे.

  सहमत आहे.

 6. Naniwadekar म्हणतो आहे:

  १९९२ सालचा संस्कृत सिनेमा – भगवद्‌गीता
  २००५ सालचा संस्कृत सिनेमा – मुद्राराक्षस

 7. निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

  या माहितीबद्दल अनेक आभार.

 8. vijay म्हणतो आहे:

  mudra-rakshas mhanaje mudra-rakshasacha vinod mhanataat to aahe ka ? mala kahi mahiti nahi pan utsukata aahe

 9. निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

  मुद्रा राक्षस हे एक नाटक आहे इ. स. ४ थ्या शतकात विशाखदत्त याने रचलेले. मला तरी इतकेच माहित आहे. मुद्रा राक्षसाचा विनोद जो आपण म्हणालात, त्याबद्दल मला माहिती नाही, पण मी पाहून सांगेन आपल्याला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s