दि अगस्ती कोड (भाग १)

स्थळ : अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातील भाषाशास्त्र विभाग.

वक्ता: मायकेल विट्झेल.

“सर्वप्रथम या कॉनफरन्सला आल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. प्रोटो-इंडो-युरोपियन भाषांचा इतिहास हा जागतिक इतिहासातील एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे हे तर आपण जाणताच. आज दहाव्या जागतिक भाषाशास्त्र कॉनफरन्सच्या निमित्ताने एक अतिशय महत्वाचा शोध मी आपल्यापुढे मांडू इच्छितो, ज्याने पूर्ण मानवी संस्कृतीच्या इतिहासातील एका अतिशय महत्वाच्या कोड्याचे उत्तर अखेर मिळेल आणि बऱ्याच गोष्टींची समीकरणे बदलतील.. बर्नोफ, माक्स मुल्लर, विलियम जोन्स आणि जेम्स प्रिन्सेप यांच्या काळापासून आज जगात इतकी कल्पनातीत प्रगती झाली की शेवटी ह्या महागूढाची आपण उकल करू शकलो.”

श्रोत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली. नक्की विट्झेल ला काय म्हणायचे होते? त्याचा विषय म्हणजे प्रोटो-इंडो-युरोपीय भाषा हा होता. या विषयाचा संशोधक होणे म्हणजे काटेरी मुकुट घातलेला राजा होणे होते. इतकी अनिश्चितता, स्थळ-काळाचा इतका विस्तृत पल्ला आणि त्यावर अवलंबून असलेली अगणित सांस्कृतिक समीकरणे म्हणजे शुद्ध वैताग होता. पण या विषयात नवा शोध लावणे म्हणजे जणू मानवी संस्कृतींच्या इतिहासावरला काळाचा पडदा काढून टाकणे होते- प्रोटो इंडो युरोपियन भाषेचे आणि पर्यायाने आर्य लोकांचे मूळ स्थान शोधणे हे प्राचीन इतिहास, पुरातत्वशास्त्र आणि भाषाशास्त्र यांसामोरचे सर्वात मोठे आव्हान होते. त्यामुळे यात थोडीशी जरी प्रगती झाली तरी जगाच्या एका अति प्राचीन परंपरेचा उलगडा होईल हे स्पष्ट होते- ज्या भाषेच्या शाखा होऊन त्यांचे रूपांतर पुढे संस्कृत, ग्रीक आणि लातिनमध्ये झाले, आणि जगातील साधारण ६ अब्ज लोकांपैकी निम्म्यापेक्षा जास्त लोक ज्या भाषेपासून उत्पन्न झालेली कोणती तरी एक भाषा बोलतात, त्या भाषेचे मूळ स्थान म्हणजे मानवी संस्कृतीचे मूळ स्थान सांगण्यासारखेच होते.

पारशी लोकांच्या अवेस्तामधील वर्णिलेले मूळ स्थान “आर्यांना वेजो”, हिंदू पुराणांमधील आर्यांचे मूळ स्थान म्हणून उल्लेखिलेला सोन्याचा मेरू पर्वत यांचे खरे स्थान कळेल म्हणून लोक कान टवकारून बसले होते. उतार ध्रुवापासून ते उत्तर प्रदेशापर्यंत हरेक प्रदेश हाच आर्यांचे मूळ स्थान असे लोक ठासून सांगत- ते आता संपणार होते. या रहस्यभेदाची बरोबरी करू शकेल असे एकच रहस्य होते ते म्हणजे बुडालेल्या अटलान्तीस बेटाचा शोध होय. पण हा शोध त्यापेक्षाही जबरी होता.

विट्झेल सांगत होता,

“माझ्या नवीन संशोधनानुसार आर्य लोकांचे मूळस्थान हे आजच्या अफगानिस्तान मध्ये असून ते भारतात – म्हणजेच सिंधू नदीच्या खोर्यात द्रविड लोकांच्या संपर्कात साधारण इ स पू २००० मध्ये आले असावेत. इतर संशोधकांच्या तुलनेत या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावे आहेत ते मी सांगेनच….. ”

श्रोत्यांमध्ये खळबळ उडाली. म्हणजे आर्यांचे मूळ स्थान हा तसा अतिशय चावून चावून चोथा झालेला विषय असला तरी या ना त्या करणाने कायम चर्चेत राहणारा विषय होता. श्रोत्यांमध्ये जगभरचे भाषा शास्त्रज्ञ बसलेले होते. काही संस्कृतवाले, काही तमिळवाले, काही आदिवासी भाषांचे अभ्यासक तर काही निव्वळ तुलनात्मकरीत्या भाषांचा अभ्यास करणारे. हा आर्यांचा प्रश्न म्हणजे एक एकदम कठीण कोडे होते- भाषाशास्त्रातील गोर्डियन नॉटच जणू. गेल्या २०० वर्षांत हा प्रश्न उपस्थित झाल्याबरोबर शेकडो लोकांनी- त्यात हौसे, गवसे आणि नवसे तसेच खरोखरचे अभ्यासू हे सर्व होते- त्यात लक्ष घातले. काहींची मते एकदम हास्यास्पद होती- पाहताक्षणी त्यातला फोलपणा जाणवत असे. तर काहींची मते व्यवस्थित अभ्यासाअंती बनविलेली असत- पण तरीही ह्या कोड्याची उकल करण्यात कुणालाही यश आले नव्हतेच. नाही म्हणायला एक “आर्यन बेल्ट” तयार करण्यात संशोधकांना यश आले होते- एक असा प्रदेश जिथे आर्यांचे मूळ स्थान असण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. तो एक अतिशय मोठा भूप्रदेश होता- उत्तरेस कझाखस्तान पासून ते दक्षिणेस इराणपर्यंत, पश्चिमेस तुर्की ते पूर्वेस पंजाबपर्यंत. याहीपुढे जाऊन कोणी त्या प्रदेशात मंगोलिया देखील समाविष्ट करीत- पण एवढ्या मोठ्या गवताच्या ढिगात ही आर्यांची सुई नेमकी होती तरी कुठे? ते न कळले तरी विविध विचारसरण्या शिरोधार्य मानून त्यांच्या आधारे लोकांची मने भडकावणे हाच धंदा असलेले कितीक लोक कान टवकारून विट्झेलचे भाषण ऐकत होते.

विट्झेल सांगत होता,

” ऋग्वेदामध्ये घोड्याचा उल्लेख वारंवार येतो. त्याउलट एवढ्या मोठ्या सिंधू संस्कृतीमध्ये कुठेही घोडा आढळत नाही. इ स पू १७०० च्या आधी भारतात घोड्याचे अवशेष मिळाले नाहीत-त्यामुळे घोडा हा प्राणी भारतात आर्य लोकांनी बाहेरून आणला असे म्हणावे लागते..प्रोटो-इंडो-युरोपियन भाषेची शब्दसंपदा मुख्यत्वेकरून पशु पालन करणाऱ्या आणि भटके जीवन जगणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीशी निगडित आहे, त्यामुळे पंजाबच्या सुपीक जमिनीत आर्यांचे मूळ स्थान असणे अशक्य आहे…..याउलट जर प्रोटो-द्राविडी भाषेशी शब्दसंपदा पहिलीत तर शेतीशी निगडित असे बरेच शब्द सापडतील. त्यामुळे द्राविडी संस्कृती ही मूळ भारतातीलच आहे असे म्हणावे लागते…”

द्रविडवादी लोक “जितं मया”अशा अविर्भावात होते.तोच पुढचा मुद्दा चर्चेला घेतला गेला.

“आणि जर ऋग्वेदाचा बारकाईने अभ्यास केला, तर त्यामध्ये असे दिसून येईल, की बाहेरून आल्याचा आर्यांच्या बाबतीत कुठेही उल्लेख नाही- शिवाय त्यात उत्तर भारताचा-विशेष करून पंजाब- तपशीलवार उल्लेख
आढळतो.दास आणि दस्यू यांना जरी काळे म्हटले असले, तरी कण्व ऋषी देखील काळेच होते असे नमूद आहे…म्हणजे निव्वळ काळेगोरेपणाच्या आधारे आर्य आणि अनार्य असा भेदभाव करणे चुकीचे आहे..”

आता तर आर्य हे मूळ भारतातलेच, अशी भूमिका असलेले लोक देखील चक्रावले. या बाबाला नक्की काय म्हणायचे आहे हेच त्यांना नक्की कळेना. कारण कोणत्याच एका पक्षाला निरपवाद पाठींबा मिळेल, असे त्या संशोधनातून निष्पन्न होत नव्हते..त्यामुळे शेवटी उथळ लोकांनी तिथून लक्ष काढून घेतले आणि “निके सत्व” निवडणे सुरु झाले.

अनेक मुद्दे चर्चेला घेतले गेले- ब्राहुई भाषेचा उगम आणि संस्कृत भाषेतील ट, ठ, ड, ढ, ण या व्यंजनांचा इतिहास, हे मुद्दे विशेष करून गाजले. ब्राहुई भाषेचा विषय निघताच तमिळनाडू मधील संशोधक दंडपाणी अय्यर यांनी विट्झेल च्या मुद्द्याला पाठींबा दिला. त्यांचेही म्हणणे असेच होते की ब्राहुई भाषा ही मूळ द्रविड भाषेपासून ३०००-४००० वर्षांपूर्वी वेगळी झाली आणि नंतर आर्य लोकांच्या प्रभावामुळे त्या भाषेची पीछेहाट झाली, आणि नंतर द्रविडभाषिक लोक दक्षिणेत स्थिरावले.

पण या मुद्द्यावर महाराष्ट्रातील श्याम देशपांड्यांनी जोरदार हरकत घेतली. त्यांचे म्हणणे असे की एका ब्राहुईवरून बाकीच्या भाषांच्या इतिहासाची सरणी लावणे म्हणजे मूर्खपणा आहे. त्यासाठी मुळात ब्राहुई भाषा किती जुनी आहे, आणि तमिळपेक्षा प्रोटो द्राविडी भाषेशी तिचे साम्य किती आहे, हे तपासले पाहिजे. अय्यर आणि देशपांडे यांचा वाद सुरु झाला आणि बाकीचे पाहत बसले- अगदी विट्झेल देखील-कारण द्राविडी भाषांचा त्याचा इतका अभ्यास नव्हता. शेवटी अस्को पर्पोला आणि इरावतम महादेवन या प्रख्यात द्रविड भाषाशास्त्रज्ञांनी मध्यस्थी केली आणि मगच तो वाद शमला.

संस्कृत भाषेतील ट, ठ, ड, ढ, ण या व्यंजनांचा इतिहास पाहताना तर अजूनच खतरनाक वाद झाले. दिल्लीच्या राहुल पांडे यांचे म्हणणे असे पडले की निव्वळ ती व्यंजने असल्याने संस्कृत मध्ये द्राविडी भाषांकडून आली असे म्हणणे म्हणजे अतिशयोक्ती आहे, कारण नुरीस्तानी भाषेत देखील ती व्यंजने आहेत. पण अय्यर पुन्हा एकदा पेटले आणि त्यांनी सप्रमाण दाखवून दिले की ती व्यंजने फक्त द्राविडी भाषा आणि संस्कृत पासून विकसित झालेल्या भाषांमध्येच पाहायला मिळतात आणि इंडो-युरोपियन भाषांचा इतिहास पाहता ती व्यंजने म्हणजे द्राविडी भाषांकडून केलेली आयात आहे. दोघेही आपापल्या मुद्द्यापासून जाम हटेनात- बी बी सी च्या पत्रकारांची चांगलीच धांदल उडाली त्या वादाला “कव्हरेज” देताना.

शेवटी कॉनफरन्स संपली, पण उत्तरापेक्षा प्रश्न जास्ती निर्माण करूनच. जगभरातील दैनिके, मासिके आणि संशोधन जर्नल्स यांमध्ये या विषयावरील लेखांचा खच पडला- कधी नव्हे ते चेन्नई टाईम्सच्या पेज ३ वर “Retro look for a Retroflex-rich language” या शीर्षकाखाली तमिळ सिने तारकांनी १९५०-६० च्या वेशात पोजेस दिल्या. द्रविडवादी पत्रांत पुन्हा एकदा हिंदी विरोधी लेख सुरु झाले. तथाकथित बहुजनवाद्यांचा प्रचार शिगेला पोहोचला- परकीय आर्य लोकांनी आता भारत सोडण्याची वेळ आली आहे, बहुजनांनी आता जागे व्हावे, परकीय अफगाणी गुलामगिरी झुगारून द्यावी अशा अर्थाचे मथळे, पोस्टर्स सगळीकडे झळकू लागली.

लोक एक्साईट झाले होते- पण सामान्य लोकच नाही, तर संशोधक देखील. भारतातील आपापल्या क्षेत्रातील प्रथितयश संशोधक म्हणून पांडे, देशपांडे आणि अय्यर यांची गणना होत असे.विट्झेलच्या संशोधनातील त्रुटी जरी नजरेसमोर असल्या, तरी त्याचा निष्कर्ष सहजी नाकारून देण्या सारखा नव्हता खासच. तिघांना कुठे तरी जाणीव होत होती, की कुठे तरी काही तरी अजून बाकी आहे आणि आपण ते करू शकतो.पण पुढील १-२ वर्षांत काही घटना अशा घडल्या की त्यांचे तिघांवर दूरगामी परिणाम होणार होते…(क्रमश:)

Advertisements
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s