दि अगस्ती कोड (भाग ३)

ते प्रेत अय्यरच्या अगदी जवळ पडले होते. तिघांचीही भीतीने एकदम बोबडी वळली होती. काय करावे ते कुणालाच सुधरत नव्हते. तशाच अवस्थेत काही काळ गेला. तिघेही जवळच्या झाडावर चढून बसले. थोड्या वेळाने कोणी जनावर आसपास नाही अशी खात्री झाल्यावर मग खाली उतरले. आता त्यांची भीड थोडी चेपली होती. कुतूहलाने ते प्रेत न्याहाळू लागले. त्याच्या सर्वांगावर ओरखडे आणि गळ्याजवळ दातांनी चावे घेतल्याचे दिसत होते. जखम तशी फार काही जुनी नव्हती. फार तर तासाभरापूर्वी तो माणूस मेला होता. त्याने कपडे काही फार घातले नव्हते. एक धोतरच काय ते त्याच्या अंगावर होते फक्त. आणि जानवे.

ते रक्तमाखले जानवे पाहताना अय्यरला कळेना- ह्या इतक्या निबिड जंगलात हा एकटा माणूस काय करत होता ? थोडेसे वर चढून गेल्यावर त्याला एक पिशवी दिसली- त्यातील वस्तू इतस्तत: विखुरलेल्या होत्या. एक तांब्याची ताटली, एक कमंडलू, थोडा तांदूळ आणि ३०-४० रुपये. नक्कीच हा कुण्या देवळाचा पुजारी असावा. त्याने ती पिशवी उचलली आणि बाकीच्या दोघांना दाखवली.

“हे काय?” दोघांनी एकदमच विचारले.

“देखो, ये आदमी पुजारी था यहीके किसी मंदिर का | पास मे जो आदिवासी बस्ती है वही के लोगोंको पूछना पडेगा |”

तिघे परत फिरले. साधारण २ तास चालून गेल्यावर तोडा आदिवासींची एक वस्ती होती, तिथे गेले.

“नांगळ ओरु इरंद मनिदनै पार्त्तोम.” (आम्ही एका मेलेल्या मनुष्यास पाहिलोत.)

“एंगे?” (कुठे)

“अन्द पेरिय मलैक्कु अरुगिल.” ( त्या मोठ्या डोंगराच्या जवळ).

“अवर वाद्दियारा?” (ते पुजारी काय?) (तमिळभाषेत मराठीभाषेप्रमाणे त्रयस्थ व्यक्तीचा उल्लेख एकेरी कधीही होत नाही.)

“आमांग”. (हो)

“हैयो! हैयैयो! कडवुळे काप्पाट्रु!! (अरे बापरे, देवा वाचव )

अय्यरने पुढे जरा खोदून खोदून विचारले असता मुखीयाने माहिती सांगितली. त्या डोंगरावर एक कालीमातेचे मंदिर होते. गेल्या ६ महिन्यात याआधी ३ पुजार्यांचा असाच भीषण अंत झाला होता. बहुतेक तो कोणी नरभक्षक वाघ असावा. टोळीमधील काही लोक त्याला पाहिल्याचा दावा करीत होते. त्याला मारण्याचा प्रयत्न करून देखील काही होत नव्हते.वनखात्याला सांगितले असता ते लोक देखील आले होते, परंतु वाघ बराच हुशार निघाला. त्यांच्या सापळ्यांना त्याने काही दाद दिली नव्हती आणि राजरोस डरकाळ्या फोडत तो अख्खे रान घुमवत होता. आदिवासी हळूहळू हे मानू लागले होते की तो देवीचा वाघ आहे आणि आपल्या पापाचा बदला तो घेतो आहे. अजून तरी त्याची आदिवासींच्या मुख्य वस्तीवर हल्ला चढवण्याची हिम्मत झाली नव्हती, परंतु ते सावध होते.

दुपारी टोळीतील बाकीचे लोक त्या डोंगरापाशी जाऊन त्या पुजार्याचे शव घेऊन आले आणि त्याला अग्नी दिला. त्या रात्री तिघेही आदिवासींच्या वस्तीवरच थांबले. जेवणे झाली. भात आणि चिकन असा मेनू होता. चिकन पाहताच अय्यर ने तोंड फिरवले. मुखिया हसला आणि त्याला भात वाढण्याची सूचना केली. जेवणानंतर तांदळाची बियर पिता पिता मुखिया त्या तिघांना एकेक गोष्टी सांगू लागला. पांडेने वाघाबद्दल विचारले.

“पुलि इरंदाल नाम महिऴच्चियडैवोम. आनाल एन्न सेय्वदु? पुलि कैयिल वरवे वरादु” (वाघ मेला तर आम्ही सुखी होऊ, पण काय करावे, वाघ हाती लागतच नाही.)

“तो फिर क्या करेंगे? ऐसेही बैठे रहेंगे?”

“अप्प? नींगळे एदावदु सेय्वीर्हळा? (मग? तुम्हीच काही करता कां?)

मुखियाच्या या सवालावर पांडे गप्प झाला. शेकोटीच्या ठिणग्यांकडे पाहत तिघेही बसून होते. बराच वेळ एकमेकांकडे पाहत शेवटी देशपांडे बोलला,

“नावू होगतेवी.” (आम्ही जातो).

“यल्लीगे होगता इदिरा नीवु?” (कुठे जाणार तुम्ही?)

“नाळे मंदिरल्ली होग बर्तेनी. स्वल्प नोडतीने. हुलीगागी बंदूक कोडी.” (उद्या मंदिरात जाऊन येतो, पाहतो काय आहे ते. वाघासाठी बंदूक द्या).

मुखियाला काही बोलायची संधी न देताच देशपांडे त्याच्यासाठीच्या झोपडीत निघून गेला. त्याच्याकडे क्षणभर पाहत मुखिया निघून गेला. अय्यर आणि पांडे दोघेही देशपांडेच्या झोपडीत गेले.

“निम्मा तली तिरगेदा” अय्यर म्हणाला.

“अबे पागल झाला तू देशपांडे! तुझं डोकं ठिकाणावर आहे का?”. पांडेने त्याचीच री ओढली.

“देखो भाई. नर्मदेच्या खोर्यात राहताना मला याची सवय झाली आहे. ही काय भानगड आहे ते मी पाहणार म्हणजे पाहणारच. ”

“आदरे नी स्वत: यारु भाविसुत्तीया?” (तू स्वत: ला कोण समजतोस?)

” ना सामान्य मनशा. आदरे अवरिगे सहाय माडबेकू. नर्मदेच्या खोर्यात आणि आधी देखील मी स्वत: शिकार केली आहे. अजून काही लोक बरोबर घेतले तर काही अडचण येणार नाही. आणि तुम्ही येणार असाल तर या नाहीतर मी तसाच जाईन.”

“भडका मत देशपांडे! आमाला तू काय समजलास? आमी येनार मंजे येनारच. मी तर स्वत: माओवाद्यांबरोबर राहिलो आहे. मला नको सांगू तुझं कौतुक.”

“नीवु अल्ली होदरे ना वब्ना येनु माडली? मै अकेला क्या करुंगा?”

देशपांडे हसला. ते तिघेही हसू लागले. “3 fools aren’t we!” पांडे म्हणाला.

“लाख मोलाची गोष्ट बोललास”.

सूर्य उगवला. पांडे, देशपांडे आणि अय्यर या त्रिकूटाबरोबर मुखियाने ५ बंदूकधारी लोक दिले होते आणि त्यांना देखील ३ बंदुका दिल्या होत्या.अय्यरला याची सवय नव्हती. तो अजूनही घाबरलेलाच होता. पण शेवटी त्याने मनाचा हिय्या केला आणि त्यांची तुकडी निघाली. सुमारे २ तास चालल्यावर तो डोंगर आला.

“हुली! हुली!” एक आदिवासी ओरडला.

“एंगे?”

“इंगे”. त्याने एका पायाच्या ठशाकडे बोट दाखविले.

“हुली इप्पोमुतू इंगे “. (वाघ आत्ताच आहे इथे)

सावधपणे ते डोंगर चढू लागले. कुठे कसलीही चाहूल येत नव्हती. आदिवासी जरा घाबरले होते- हे त्रिकुट देखील जरा भेदरले होते. जंगलात नेहमीपेक्षा जरा जास्तच शांतता होती. कुठेतरी काहीतरी गडबड आहे हे सर्वांना जाणवत होते. पण पोटातले ओठावर आणायला मात्र सगळे कचरत होते. इतक्यात एका मोठ्या डरकाळीचा आवाज त्यांच्या कानावर पडला. सगळे जिथे जागा मिळेल तिथे लपून बसले. हे तिघे बाकीच्यांपासून जरा बाजूलाच पडले होते आणि त्यांना ते लक्षातच आलं नाही.
त्यांनी कानोसा घेतला. जरा स्थिरस्थावर वाटताच ते पुढे सरकू लागले. तोपर्यंत बाकीचे आदिवासी मागेच राहिले होते. बराच वेळ काही ऐकू न आल्याने ते जरा निर्धास्त झाले होते. हळू हळू मुंगीच्या पावलांनी जात जात ते शेवटी डोंगर माथ्यावरच्या त्या मंदिरासमोर पोहोचले.

अय्यरने तोपर्यंत इकडे तिकडे पाहून घेतले. बाकीचे कोणीच दिसत नव्हते. दगडी पायऱ्या आणि दगड खोदून बनवलेले मंदिर. पुढे एक पाणवठा. तिघेही पायऱ्या चढून जातात तोच कुणाची तरी चाहूल लागली-पण वाघ तरी नक्कीच वाटत नव्हता. दगडी भिंतीवर कुणा माणसाची सावली पडली होती. जीव मुठीत धरून तिघेही मंदिरात गेले. पाहतात तर काय आश्चर्य! तो भला थोरला वाघ रक्ताच्या थारोळ्यात कालीमातेच्या मूर्तीसमोर मारून पडला होता आणि त्याच्या पोटात एका आदिवासीने भाला खुपसलेला होता. त्यांना पाहताच त्याने तो भाला काढला आणि त्यांच्याकडे तो पाहू लागला.

तिघेही आ वासून त्याच्याकडे पाहू लागले. तो होताच तसा नजरेत भरण्यासारखा. मूळचा गव्हाळ वर्ण रापलेला, भव्य कमावलेले शरीर, मोठी दाढी, मोठा केशसंभार.
एक धोतरासारखे वस्त्र कमरेला लपेटलेले आणि एक उत्तरीय. वस्त्रे जुनी आणि जीर्ण दिसत होती. पोट पुढे आले होते. अशा या ढेरपोट्या म्हाताऱ्याने एक भलाथोरला वाघ कसा काय मारला, हे त्यांच्या अजूनही पचनी पडत नव्हते. त्याला आदिवासी म्हणावे तर तोडा लोकांपेक्षा त्याचे कपडे बरेच वेगळे होते. आणि त्याची वेशभूषादेखील खेड्यातील लोकांपेक्षा वेगळी होती- जुन्या पद्धतीची होती.

त्या रहस्यमय म्हातार्याकडे तिघे पाहत राहिले. शेवटी अय्यरने सुरुवात केली-

“वणक्कम!”

त्याने अय्यर कडे पाहिले. “वण…क्कम आगत्ता..”

आता पांडे आणि देशपांडेनी कान टवकारले. तमिळ बोलता बोलता एक संस्कृत वाटणारा शब्द कसा काय आला? ते ऐकू लागले.

“निन्गळ एंगे?” (तुम्ही कुठे असता?) अय्यरने विचारले.

“एत्तीरा..” (तिकडे). त्याने दक्षिणेला बोट दाखविले.

देशपांडे आता सरसावला. त्याला एक शंका आली होती.

“दोमो वेहो?” (घर कुठे आहे?) त्याने उत्तरेला बोट दाखवले.

“इल्ले येनु माडतिरा ?” (इकडे काय करताय?)

” युस्मा…येनु?” (तुम्ही काय करताय?) त्याने उलट प्रश्न विचारला.

आता तर तिघे अजूनच बुचकळ्यात पडले. त्याची भाषा म्हणजे तमिळ, कन्नड आणि संस्कृतचे एक विचित्र मिश्रण होते. संस्कृत चा वास आल्याबरोबर तिघांनी संस्कृत सुरु केले.

“भवत: किं नामधेयं?”

काही क्षण त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही आणि मग तो नुसताच हसला.

“भवान अत्र किं करोति?”

पांडे कडे रोखून पाहत काही वेळाने तो हळू हळू एकेक शब्द उच्चारू लागला.

“हुईली..क्रन्देती..महत..साम्मारती..” (वाघ आला होता त्याला मारले).

“भवान क:”?

“एग्झ्ह…घेन्ह…घेन्ह..” ( मी जाणतो ).

त्याच्या तोंडची अवेस्तन पेक्षा जुनी भाषा ऐकून तिघे रोमांचित झाले. आत्तापर्यंत पाहिलेल्या पैकी ह्याची भाषा सर्वात जुनी आणि विचित्र होती. याच्या टोळीची काही जर माहिती कळली, तर इंडो-युरोपियन भाषाशास्त्रात मोठी क्रांती घडणार होती. त्याच्या भाषेत प्रोटो-द्राविडी तसेच वैदिक संस्कृतपेक्षा देखील जुने शब्द होते. जीवाचे कान करून ते त्याचे बोलणे ऐकत होते .

“तू..क्वोये?” त्याने विचारले.

“वयं वैयाकरणिन: |” अय्यर उत्तरला.

त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मग थोड्या वेळाने तो म्हणाला

“तू..ह्मेण?” आणि मग स्वत:शीच म्हणाला..”यु”.

“किद?” मूर्ती कडे बोट दाखवून तो विचारता झाला.

एक भले मोठे प्रश्नचिन्ह तिघांच्या चेहऱ्यावर उमटले.

“जेनेज..” (देवी) पांडे उत्तरला.

” हुली इरांत, रुंबा नल्ला. धन्यवाद!” (वाघ मारल्या बद्दल धन्यवाद) अय्यर म्हणाला.

तो एकदा गडगडाटी हसला आणि त्या तिघांकडे एक दृष्टीक्षेप टाकून आला तसा निघून गेला. ते तिघे मात्र अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. वाघाचा विचार त्यांच्या मनातून आता पुरता गेला होता आणि त्याची जागा त्या विचित्र आदिवासीने घेतली होती. ते भान हरपून तिकडे उभे होते तेवढ्यात बाकीचे ५ जण तिथे आले.
त्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. त्यांनी तिघांना विचारले की वाघाला कोण मारले? कारण वाघाची जखम ही एका भाल्याने केली होती आणि तिघांकडे बंदुका होत्या.

अय्यरने त्या रहस्यमय म्हातार्याचे वर्णन त्यांना सांगितले तर त्यापैकी कुणीही त्याला या भागात आधी कधीच पाहिले नव्हते आणि त्याच्या सारख्या इतर लोकांनापण कधी पाहिले नव्हते. पण महत्वाची गोष्ट ही होती की नरभक्षक वाघ आता मेला होता, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही . वाजत गाजत सर्वजण वस्तीपाशी आले आणि मुखियाने ती हकीकत ऐकल्यावर त्या तिघांचा मोठा सत्कार केला आणि त्यांचे मनापासून आभार मानले. रात्री मोठी मेजवानी ठेवली होती. पण तिघांपैकी कुणाचेच लक्ष तिथे लागत नव्हते. मुखियाच्या लक्षात ते आले.

” पाहुणे, तुम्हाला आमची मेजवानी आवडली नाही का? वाघाला मारल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत.”

“नाही अय्या. तिकडे दोड्डमलैवरती आम्हाला एक अतिशय विचित्र माणूस भेटला होता. त्याने तो वाघ मारला. आम्ही काहीच नाही केलं.”

त्याचे वर्णन ऐकल्यावर मुखियादेखील विचारात पडला.

“इतके पावसाळे पाहिले मी, पण अशी कोणतीही टोळी मी कधीही पाहिली नाही. या रानात तरी असे कोणीच लोक नाहीत.”

बराच वेळ विचारूनही मुखिया काही सांगेना- खरे तर त्यालाही तीच उत्सुकता लागली होती. तेव्हा त्यांनी तो नाद सोडला. तोडा टोळीचे आभार मानून तिघांनी त्यांचा निरोप घेतला.

परतीच्या प्रवासात तिघे बोलू लागले.

“तू सांग पांडे तो कसा होता ते. आदिवासी सारखा फार काही वाटत नव्हता.” देशपांडे म्हणाला.

“त्याच्या भाषेत प्रोटो-द्राविडी आणि प्रोटो-इंडो-युरोपीय शब्द देखील होते. द्राविडी शब्द वेद्दा भाषेसारखे आणि बाकीचे तर वैदिक पेक्षा जुने . मला तर असा वाटत होतं की जणू ब्राँझ युगातील भारतात मी गेलोय.” अय्यर म्हणाला.

“अबे त्याला तर मूरत म्हणजे काय तेपण माहिती नव्हतं.” पांडे म्हणाला.

प्रत्येकाकडे काही ना काही निरीक्षणे होती, पण त्याच्या भाषेचे स्थान कोणते आणि काल कोणता? हे प्रश्न सर्वात अवघड होते. ह्या भाषेत द्राविडी आणि इंडो-युरोपीय या भाषाकुलातील इतक्या जुन्या शब्दांची रेलचेल होती, की या भाषेचे स्थान कदाचित वैदिक संस्कृत पेक्षाही महत्वाचे ठरले असते.पण मग त्या मुखीयाला देखील माहिती नाही आणि आधीच्या भाषाशास्त्रज्ञांपैकीदेखील कोणीही अशी भाषा अस्तित्वात असल्याचे लिहिलेले नाही. पण पुरेशी माहिती हाती आल्याखेरीज काही उघड करायचे नाही असे तिघांनी ठरवले.

यथावकाश म्हैसूर आले. म्हैसूर ते पुणे रेल्वे प्रवासात देशपांडे एक पुस्तक वाचत बसला होता. प्राचीन तमिळ साहित्यातील अगस्त्य ऋषींना असलेले महत्व हा त्या पुस्तकाचा विषय होता. त्यात विन्ध्य पर्वत ओलांडून अगस्त्य कसे दक्षिणेस गेले, वेलीर लोकांना त्यांनी द्वारकेतून कसे दक्षिणेत वसवण्याच्या कामी सहाय्य केले, हे सर्व वाचत असताना त्याच्या डोक्यात एक विचार आला.

>> पुस्तकात दिलेली अगस्त्य ऋषिंची बरीच चित्रे आणि मूर्तींचे फोटो अगदी त्या म्हातार्याप्रमाणेच दिसतात, तंतोतंत चेहरा आणि अगदी वाढलेल्या पोटासकट!

चल काहीही!

>>पण त्याला तू कुठला विचारले असता त्याने उत्तरेकडे बोट दाखवले!

मग काय झालं?

>>तो मुखिया पण म्हणाला की आम्ही अशा कुणाला पाहिला नाही कधी म्हणून!

कदाचित..नसेल पाहिला..असेल कोणीतरी विचित्र माणूस..

>> त्याने आपलं नाव नाही सांगितलं! त्याला तो प्रश्न कळून देखील!

उम्म….होय.

>>त्याची भाषा तर वैदिक संस्कृत पेक्षा जुनी आहे!

….होय हे खरंय…फार जुनाट आणि विचित्र बोलत होता काहीतरी. मूळ संस्कृतसारखी असेलही, पण प्रोटो द्राविडी कितीतरी शब्द होते त्यात! आश्चर्यच आहे!

>> त्याला मूर्तीपूजा माहीत नव्हती!

…………..

विचार करून देशपांडेचे डोके बधीर झाले…तो रोमांचित झाला..काय आपण खरेच त्यांना भेटलो? अगस्त्य ऋषींना? द्वारकेतून ज्यांनी वेलीर क्षत्रियांना दक्षिणेत वसविले त्यांना? विन्ध्य पर्वताचं गर्वहरण करणाऱ्या अगस्त्यांना? वातापी राक्षसाला पचविणाऱ्या आणि अक्खा सागर पिऊन टाकणाऱ्या अगस्त्यांना?

त्याने हे अय्यर आणि पांडे दोघांनाही सांगितले. जें समजायचे ते तिघेही समजून गेले होते. तिघांनी मिळून प्रोटो इंडो युरोपीय आणि प्रोटो द्राविडी भाषांच्या सरमिसळीचा काळ त्या ऐकलेल्या भाषेच्या आधारे काढला आणि सध्याच्या रूढ काळापेक्षा तो कितीतरी जुना आहे, हे सिद्ध केले. त्यांच्या पेपरची जगभरात खूपच वाहवा झाली. काही शब्दांची व्युत्पत्ती त्यांनी जी मांडली होती, ती सर्वांनी मान्य केली- रूढ असलेल्या कोणत्याही पद्धतीने ते शब्द स्पष्ट करता येत नव्हते. तशा शब्दांना त्यांनी अगस्त्य शब्द असे नाव दिले-जें प्रोटो इंडो इराणियन आणि प्रोटो द्रविडीयन यांचे मिश्रण होते- पण अंदरकी बात अर्थातच कुणालाही कळली नाही- कधीच.

(समाप्त)

ता.क. 1:- हुश्श! अखेरीस संपली ही कथा. ४-५ महिन्यापूर्वी पहिला भाग लिहिला, तेव्हापासून रुतून बसलीये मनात. ती आज पूर्ण झाली. आता मोकळं वाटतंय..

ता.क. 2:- आदिवासी आणि तिघे भाषाशास्त्रज्ञ या संभाषणातील तमिळ वाक्यांमध्ये व्याकरणदृष्ट्या पाहता बऱ्याच त्रुटी होत्या. त्या सूचित करून सुधारणा सुचवल्याबद्दल मिसळपाव.कॉम वरील सदस्य श्री. हैयो हैयैयो यांचे मनापासून अभिनंदन! त्यांनी सांगितलेली वाक्ये मराठी भाषांतरासाहित अपडेट केलेली आहेत.

Advertisements
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

4 Responses to दि अगस्ती कोड (भाग ३)

  1. Mansoor म्हणतो आहे:

    khhupach chhaan…..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s