सुरस दिल्ली आणि चमत्कारिक आग्रा.

सध्या ब्लॉग लिहिणे जवळ जवळ थांबलेच आहे. ही स्थिती गेल्या वर्षभर असूनही दर वेळेस नवी पोस्ट लिहिताना हे वाक्य सुचतेच, त्याला इलाज नाही. अशा परिस्थितीजन्य पादपूरकांपुढे मी नेहमीच हतबल असतो. असो.नमनालाच डिजिटल घडाभरून डिजिटल शाई सांडून देखील का होईना, यावेळेस नवे सांगण्यासारखे काहीतरी आहे.

तर या डिसेम्बरात दिल्ली-आग्रा भागात गेलो होतो.उत्तर भारतात जाण्याची ही अस्मादिकांची पहिलीच वेळ. काम होते एका दिवसाचे परंतु जरा जिवाची दिल्ली करावी म्हणून ठरवले जरा रजा टाकू आणि इकडे तिकडे चोहीकडे फिरू. मग फिरलो. भोज्ज्याला शिवून परत येण्याइतका वेळ असलेले पर्यटक दिल्ली-आग्र्यात जिथे जिथे म्हणून जातात तिथे तिथे गेलो-बरीच ठिकाणे पहायची राहून सुद्धा गेली पण त्याला नाइलाज होता.म्हणजे वेळेपुढे, थंडीपुढे आणि अस्मादिकांच्या सनातन आळसापुढे. एखादा गेंडा मारून त्याच्या कातड्याचे केलेले असावे असे वाटायला लावणारे एक जाडजूड जॅकेट
इथे भीमथडीवरच खरीदून गेलो म्हणून निभाव लागला. नाहीतर पंडितराज जगन्नाथांच्याच भाषेत सांगायचे झाले तर दिल्लीतील थंडीपुढे इतर कपडे म्हणजे “शाकाय वा स्यात् लवणाय वा स्यात्”.

सांगायचा मुद्दा म्हणजे १) दिल्लीत फिरलो आणि २) आग्र्यात फिरलो. (मग काय लई भारी झाला का बे तू च्यायला?-आमच्या काही मित्रांची सनातन कमेंट) तर पॉइंटाचा मुद्दा क्रमांक १ अंतर्गत फिरलो ते म्हणजे संसद, नॅशनल म्युझियम, राजपथ, चांदणी चौक , लाल किल्ला, पराठे वाली गल्ली,जामा मशीद, कुतुब मिनार, न गंजलेला शुद्ध लोखंडी विष्णुस्तंभ, लोटस टेम्पल,इ.इ. पैकी कुतुब मिनार आणि लोटस टेम्पल इथे अस्मादिकांचा फोटो काही “यवनी/इथलीच नवनीतकोमलांगी” यांनी काढल्यामुळे ती स्मृती अजूनही आमच्या दिलात विराजमान आहे. दिल्ली उर्फ इंद्रप्रस्थात पाऊल ठेवताक्षणीच मनातील हरितात्या जागा झाला. आजपर्यंत जी ठिकाणे फक्त इतिहासाच्या पुस्तकामुळे माहिती होती ती प्रत्यक्ष पाहताना लई मजा आली. ते काही दिवस मी राहायला अवधचा नबाब सुजाउद्दौल्याचा बाप सफदरजंग याच्या थडग्याजवळ ग्रीन पार्क भागात होतो.सर्व महत्वाची ठिकाणे १० किमी च्या परिघात आहेत तिथून. कुठे सफदरजंग मकबरा , कुठे लोधी रोड असे फिरत आणि रात्री आलू पराठा अथवा तंदुरी डिशेस चापत दिल्ली पाहिली.

आता जास्ती पाल्हाळ लावत नाही. पण काही निरीक्षणे नोंदविल्याशिवाय चैन पडली नाही:

१. दिल्ली मेट्रो जगातभारी(ज्याप्रमाणे अक्ख्या पुण्यात जगप्रसिद्ध )
२. सगळीकडे कॅमेरा अलाउड आहे-विनामुल्य अथवा नाममात्र चार्जेस घेऊन-अगदी म्युझियममध्ये देखील!!

माझ्या दृष्टीने दिल्लीवारीचा हाय पॉइन्ट म्हणजे नॅशनल म्युझियम. तसे तर कोलकात्यातील नॅशनल म्युझियम देखील अप्रतिम आहे आणि दिल्लीतल्यापेक्षा मोठेच आहे. दिल्लीतील म्युझियम चा विशेष तो काय? तर-

१ . हडप्पा संस्कृतीच्या नावाखाली नेटवर जें फोटोज पाहायला मिळतात त्यातल्या निम्म्या वस्तू तरी इथे आहेत.
२. दारा शुकोह, तानसेन, मलिक अंबर यांची अस्सल पोर्ट्रेट्स इथे आहेत.
३. ब्राह्मी लिपीतील चिन्हांपासून आत्ताच्या देवनागरी, बंगाली, कन्नड, तमिळ इत्यादी भाषांची लिपी कशी तयार झाली त्याचा तक्ता-प्रत्येक अक्षरासाठी!
४. कोलंबसपूर्वकालीन अमेरिकेच्या संस्कृतीचा स्वतंत्र कक्ष- खास दक्षिण अमेरिकेहून, त्यात देखील मेक्सिकोहून आणलेल्या अनेक वस्तू इथे आहेत.
५. खास नेव्हीचे वेगळे म्युझियम असून मराठा आरमाराशी निगडीत एक जुना नकाशा आहे आणि इ.स.१६७६ साली मराठा नौदलाने ब्रिटीशांचा पराभव केला त्या प्रसंगाचे लहानसे शिल्प आहे.
६.श्री शिवाजी महाराजांचा एक होन आहे!

वरील मुद्दा क्र.१ आणि ६ मुळे माझे सगळे पैसे फिटले. नको तिथे आळशीपणा आणि काहीसे गांडू नशीब असल्याने आयत्यावेळी कॅमेर्याने मान टाकली, सबब होनाचा फोटो काढता आला नाही. पण हडप्पा कक्ष अप्रतिम आहे-निव्वळ अप्रतिम!

मोहेंजो-दारो येथील नर्तकी - फार तर ४ सेमी उंची असेल.

पशुपती सील

हरप्पन स्वयंपाकघरातील भांडी

कासव

दायमाबाद येथील उत्तरसिंधूकालीन प्रसिद्ध रथ

तानसेन

मलिक अंबर

दिल्ली झाली. आता आग्रा भेटीबद्दल थोडेसे. आत्तापर्यंत जें पाहिले ते सर्व सुरस होते. आग्र्यात मात्र सुरस आणि चमत्कारिक दोन्हीही पाहायला मिळाले. त्याचं झालं असं, दिल्लीहून रेल्वे करून गेलो आग्र्याला. ताज महाल आणि आग्र्याचा किल्ला दोन्ही पाहिले, तेथील प्रसिद्ध पंछी पेठाचा “अंगुरी पेठा” हा फ्लेवर घेतला आणि यथेच्छ खाल्ला. दुपारी सव्वा १२ ते संध्याकाळी ५ इतकाच वेळ हाताशी होता, मग म्हटले एका ठिकाणी लई वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. पु ना ओकांच्या तेजोमहालय उर्फ ताजमहालात गेलो आधी.

भगवद्गीतेचे तत्वज्ञान, काश्मीर प्रश्न, यांप्रमाणेच चर्वितचर्वण करून करून निके सत्व नष्ट झाल्यावर निव्वळ चोथा झालेला विषय म्हणजेच ताजमहाल होय. ताजमहाल हे निव्वळ भोगविलासाचे प्रतीक असो, मूळच्या शिवमंदिरावर बांधलेले थडगे असो अथवा काहीही असो, तो बघितला की भारी “च” वाटते. वैभव, डामडौल, भपका किंवा याहीपेक्षा हौसेची व्याख्या ताज महाल पाहून कळते हे मात्र नक्की. इतक्या वेळेस टीव्हीवर ताज पाहणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात काय फरक आहे? जो फरक द्रौपदीसारख्या सौंदर्यवतीचे चित्र पाहणे आणि तिला प्रत्यक्ष पाहणे यात आहे तोच. तिथल्या उद्यानात जरा बसलो, पुन्हा एकदा “अगर फिरदौस बर्रुये जमीं अस्त” चा आंशिक का होईना अनुभव घेतला आणि परतलो. ताज पाहून मला काय वाटले की हौस असावी तर अशी.हौसेला मोल नसते ही म्हण ताज सारख्या वास्तूंमुळेच आली असावी. म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ वगैरे काही नाही वाटले बघून पण हौस के लिये साला कुछ भी करेगा असे इतक्या कटाक्षाने सांगणार्या वास्तू भारतात तरी फारशा नसाव्यात. त्यातच त्याचे महत्व सामावलेले आहे असे मला वाटते.

. तास दीड तासात ताजमहाल पाहून नंतर गेलो आग्र्याच्या किल्ल्यात. आणि मन आपोआपच गेले इ.स.१६६६ च्या मे महिन्यात. किल्ल्यासमोरच श्री शिवाजीमहाराजांचा क्लासिक अश्वारूढ पुतळा आहे तो बघून मराठी मनाला गोड गुदगुल्या झाल्याशिवाय राहत नाहीत. त्याच तंद्रीत मग गेलो पुढे. किल्ला हा वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केला असल्याने बरीच निगा राखलेली आहे. आणि निम्मा भाग लष्कराने व्यापलेला असल्यामुळे बघण्यासारखा भाग थोडाच शिल्लक आहे. कोणत्याही भुईकोट किल्ल्याला असतो/असावा तो खंदक यालाही आहे. जाता जाता वाटेत एक दगडाचा मोठा टब लागतो.तो म्हणे जहान्गीराचा आवडता टब होता.असेलही. त्या काळात २२-२३ कोटी रुपयांचा महसूल असलेल्या साम्राज्याच्या राजाला काय अशक्य होते म्हणा?

जहांगीरचा टब

मग येतो तो..दिवान-ए-आम. मुघल राजाचा नेहमीचा दरबार जिथे भरायचा ती जागा. जोधा-अकबर मध्ये दाखवल्या प्रमाणे मुघल राजा वरती बसायचा आणि बाकीचे सारे खाली मान खाली घालून उभे राहायचे…रीतच होती तशी दरबाराची..त्याच्या मागून एक जिना आणि तिथून मग पहिल्या मजल्यावर दिवान-ए-खास..मुघल सरदारांची वरिष्ठ सभा. अदमासे २० बाय ४०-५० फूट इतकीच जागा आहे ती.

दिवाने खास

त्याची माहिती देणारी कोनशीला जी आहे, ती जरा पहा म्हणजे कळेल चमत्कारिकपणा म्हणजे काय ते. पुरातत्व खात्याने जागोजागी डुलक्या घेतल्या आहेत. अज्ञान, आळस, बेपर्वाई, बेफिकिरी, अनास्था, नालायकपणा इत्यादींचा अर्क म्हणजे त्या कोनशिलेत दिलेली माहिती. असे काय आहे त्यात? नीट पहा. इंग्रजीत दुसर्या परिच्छेदात लिहिले आहे ते असे:

हीच ती कोनशिला जिने माझा मूड खराब केला.

“It was in this Diwan-I_Khas that Shivaji met Aurangzeb in 1666, and tormented by the heat of Agra, fainted and took support of a pillar.” या दिवान-ए-खास मध्ये शिवाजीमहाराज औरंगजेबाला १६६६ साली भेटले आणि आग्र्याचा उन्हाळा सहन न झाल्यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्यांनी एका खांबाचा आधार घेतला.

आं???? महाराज काय मजा म्हणून भेटायला गेले होते का औरंगजेबाला? म्हणे उन्हाळा सहन न झाल्यामुळे चक्कर आली. शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची मूळ साधने जी राजपूत पत्रे, ती सर जदुनाथ सरकार यांनी संकलित करून “Shivaji’s visit to Aurangzeb at Agra” हे पुस्तक प्रकाशित केले. भारत इतिहास संशोधन मंडळात ते विक्रीला आहे देखील. त्या पुस्तकातून काय माहिती मिळते?त्यातील २९ मे रोजीचे पत्र आणि त्याचे विवेचन इतिहासकार ग भा मेहेंदळे यांच्या “Shivaji: His life and times” या पुस्तकातील पान ३२५-३२६ इथे दिलेले आहे.

त्यावरून असे कळते की १२ मे १६६६ रोजी महाराजांना औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त दरबारात बोलावणे होते. मिर्झाराजे जयसिंगचा मुलगा रामसिंग त्यांना घेऊन गेला, परंतु जरा लांबच्या रस्त्याने.त्यामुळे दरबारात जाईपर्यंत महाराजांना उशीर झाला. तोपर्यंत दिवाने आम आणि दिवाने खास या दोन्ही ठिकाणचा दरबार संपून घुसलखान्यातील दरबार सुरु झाला होता. म्हणजे शिवाजी आणि औरंगझेब हा सामना दिवाने खास मध्येदेखील झालाच नाही. पुढे मग महाराज तिथे गेले आणि त्यांनी औरंगजेबाला नजराणा अर्पण केला. त्यांना राजा रायसिंग याच्या मागे आणि ताहीर खान नामक ५०० स्वरांवरील अधिकार्याच्या जागी उभे केले गेले . नंतर इतर सरदारांप्रमाणे महाराजांना विड्याचे पान(पानसुपारी) मिळाले. पण जसवंत सिंग आणि इतर काही सरदारांना मात्र खिलत म्हणजे मानाची वस्त्रे दिली गेली. आपल्या दर्जाप्रमाणे वागणूक न देता फालतू लोकांमध्ये उभे केले आणि योग्य ती वागणूक न देता औरंगझेबाने आपला अपमान केला, या जाणीवेने महाराज चिडले आणि औरंगजेबाकडे क्रुद्ध नजरेने पाहू लागले. ते पाहून त्याने रामसिंगला विचारले की काय झालं म्हणून. तेव्हा महाराज म्हणाले:

” You have seen, your father has seen, and your emperor has seen what a man I am, and yet you have deliberately kept me standing! I cast off your mansab. If you had wanted me to stand, you should have done so properly.”

आणि औरंगजेबाकडे पाठ फिरवून बाहेर जाऊ लागले. रामसिंगाने त्यांचा हात धरला परंतु त्यांनी तो झिडकारून टाकला आणि म्हणाले:

“The day of my death has arrived. Either you kill me or I kill myself. But I am not going to see the emperor again.”

हे ऐकल्यावर औरंगजेबाने मुल्तफत खान, अकिल खान आणि मुखलीस खान यांना पाठवले महाराजांची समजूत काढून त्यांना खिलत द्यावी म्हणून. महाराज त्यावर म्हणाले:

“The emperor purposely made me stand below Jaswant Singh. I decline his mansab and will not be his servant. Kill me if you like, but I won’t wear the khilat i.e. robes of honour”.

आता यात कुठे आला आग्र्याचा उन्हाळा आणि कसलं काय? औरंगजेबाने आपला अपमान केला म्हणून महाराज चिडले होते सबब ते बाहेर पडले. हा असा इतिहास असताना जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करणाऱ्या पुरातत्व खात्याला काय म्हणावे?? त्या कोनशिलेवरील माहिती वाचून बटाट्याच्या चाळीतील एक किस्सा मात्र आठवला.सांडग्याच्या चाळीत दादा सांडगे हे निव्वळ मुलांच्या मनावर हिंसक परिणाम होऊ नये म्हणून शिवाजी-अफजलखान प्रकरण असे सांगतात:

“मावळात भात कशा पद्धतीने पिकवावा यासाठी गोप्रतीपालक शिवाजीजी आणि अफजलजी यांची भेट झाली. शिवाजीजींचे म्हणणे होते की देशी पद्धत चांगली तर अफजलजींचे म्हणणे असे की यावनी पद्धत चांगली. शिवाजीजींनी देशी पद्धतीचे महत्व असे समजावून सांगितले की अफजलजींचे अंत:करण पिळवटून त्यांचे आतडे बाहेर आले. हाही थोर, तोही थोर. दोघांच्या स्मृतीला आपण नम्र वंदन करू.”

प्रस्तुत प्रकार त्यापैकीच तर नसेल? असा विचार क्षणभर तरी का होईना, मनात आला आणि चिकार हसलो. हाच तो आग्र्याचा चमत्कारिकपणा. याला इलाज काय? ती कोनशीला नीट दुरुस्त करणे आणि जगभरच्या पर्यटकांची दिशाभूल थांबवणे. नाहीतर भारताबाहेरील लोकांना आणि भारतीयांनाही कोण शिवाजी आणि तिथे त्याला चक्कर का आली ते कळणारच नाही.

मग काय..परत निघालो, शिवाजी मार्केट मध्ये गेलो आणि एक एकदम बकवास पाणीपुरी खाल्ली, स्टेशन वर गेलो. पाहतो तर रेल्वे लेट होती. मग दुसर्या रेल्वेचे रिजर्व्हेशन केले. वाटेत २ मुली भेटल्यामुळे रिकाम्या गप्पा निवांत मारता आल्या. वापस दिल्लीत पोचलो आणि यात्रा सुफळ संपूर्ण झाली.

Advertisements
This entry was posted in इतिहास-भारत, विविधा. Bookmark the permalink.

12 Responses to सुरस दिल्ली आणि चमत्कारिक आग्रा.

 1. हेरंब म्हणतो आहे:

  लय भारी लिवलंय बेल्लारीकर !! आवडलं..

  आणि हो.. पुरातत्व खातेके माँ की आँख !!!

 2. Aniruddha G. Kulkarni म्हणतो आहे:

  This is brilliant stuff, Nikhil….I wish you went to many other places and wrote about them…best

 3. mayur म्हणतो आहे:

  aaicha ghoda haramkhor Puratattwa khatyachya puchaat lokanchya.

  hyawar kay upay ata?

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   आता काय करायचं…पुरातत्व खात्याला सांगणे आपल्या हातात आहे. उठसूट दंगे करणाऱ्या लोकांना म्हणावं करा काहीतरी. पण त्यापुढे जाऊन म्हटले तरी पुरातत्व खात्याला हे सांगणे गरजेचे आहे हे मात्र नक्की.

 4. सुहास म्हणतो आहे:

  मस्त लिहिलंय…… 🙂

  पुरातत्व खात्याबद्दल काय बोलावं.. जगदंब जगदंब !!!

 5. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

  पुढची पोस्ट “यवनी/इथलीच नवनीतकोमलांगी” किंवा वाटेतल्या दोन मुलींवर येऊ दे! 🙂

  ही पोस्ट मस्त…

 6. Rajeev Upadhye म्हणतो आहे:

  पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर पुण्याची ओळख करून देणारे दोन फलक मुख्य प्रवेशद्वाराजवळ अनेक वर्षे होते. त्यात पुण्याची ओळख म. गांधींच्या खुनाचा प्रयत्न दोनदा झालेले शहर अशी होती, त्याची या निमित्ताने आठवण झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s