ट्रोजन युद्ध भाग १- पूर्वपीठिका.

बर्याच दिवसांपासून ही ट्रोजन युद्धाची काय भानगड आहे ते बघावे असा बेत होता. त्याआधी कम्प्युटर मध्ये एकदा ट्रोजन नामक व्हायरस घुसला असल्याने ट्रोजन हॉर्सशी चांगलाच परिचय होता. शिवाय आपले महाभारत तसे ग्रीकांचे ट्रोजन युद्ध हे माहिती होते, आणि मेगास्थेनीस सारख्या लोकांनी इलियड व महाभारत यांमधील साम्यामुळे “The Indians have their wn Iliad of 100,000 verses” असे म्हटले होते. २००५ साली आलेला ट्रॉय हा सिनेमा पहिला आणि त्याच्या प्रेमात पडलो-विशेषत: ब्रॅड पिटने साकारलेल्या अकीलीसच्या प्रेमात पडलो आणि उत्सुकता अजूनच वाढली आणि शेवटी नेटवर शोध घेता घेता हाताला लागले ते हे:

http://classics.mit.edu/Homer/iliad.html

http://classics.mit.edu/Homer/odyssey.html

कोणी सॅम्युअल बटलर नामक क्लासिसीस्टने वरिजिनल ग्रीकमधून इंग्रजीमध्ये भाषांतर केलेय. तेच वाचले आणि इतक्या गोष्टी नव्याने कळल्या काय सांगू. माहितीचा एक अपूर्व खजिना डोळ्यांसमोर आल्याचा आनंद झाला. सोबत अनेक विकी लिंक्स देखील मदतीला असल्याने काहीच अडचण आली नाही. ब्राँझयुगीन ग्रीक विश्वाचे पूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभे राहण्यासाठी या सर्व दुव्यांची खूप मदत झाली. आता स्टेप बाय स्टेप बघू कि हे युद्ध कसे झाले-म्हणजे इलियड , ओडिसी वगैरे साधनांत त्याचे वर्णन कसे आहे ते आणि त्याची थोडी कारणमीमांसा.

तर त्यावेळच्या ग्रीसची कल्पना यावी म्हणून हा नकाशा बघा खाली. सगळे मिळून वट्टात पश्चिम महाराष्ट्राएवढाच-(कदाचित अजून थोडासाच जास्त) हा भूभाग आहे-अगदी टीचभर.पण या टीचभर भागात राहणाऱ्या ग्रीक लोकांनी अशा काही खतरनाक काड्या केल्या की त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले.

ब्राँझयुगीन ग्रीस-क्लिक केल्यास मोठा डीटेल नकाशा दिसेल.

काळ आहे साधारण १२०० -१३०० ख्रिस्तपूर्व. अक्ख्या ग्रीस मध्ये ग्रीक भाषिक लोकांची संस्कृती दृढमूल झालेली असून त्यांची खंडीभर नगरराज्ये तयार झालेली होती. काही राज्ये सध्याच्या तुर्कीच्या पश्चिम किनाऱ्यावरदेखील होती. महाभारतकालीन भारताप्रमाणेच एका संस्कृतीची परंतु एका राजाच्या अमलाखाली नसलेली ही अनेक राज्ये पाहता त्यांमध्ये सत्तासंघर्ष होणार हे तर अपरिहार्य होतेच. त्यात मायसिनीचे राज्य सगळ्यात शक्तिशाली होते-त्याच्या राजाचे नाव अ‍ॅगॅमेम्नॉन. त्याचा सख्खा भाऊ मेनेलॉस हा स्पार्टाचा राजा होता. बाकीची सर्व राज्ये मायसिनीचे स्वामित्व मान्य करीत. जो दर्जा पश्चिमेकडे ग्रीस मध्ये मायसिनीला होता, तोच दर्जा पूर्वेकडे ट्रॉयला होता-त्याच्या राजाचे नाव प्रिआम. आता स्पार्टा व ट्रॉय यांच्या वाटाघाटी सुरु असताना ट्रॉयचा धाकटा राजपुत्र पॅरिस आणि स्पार्टाची राणी हेलेन हे दोघे ट्रॉयला पळाले. आपल्या बायकोला परत आणावे आणि पॅरिसला ठार मारावे म्हणून मेनेलॉस अडून बसला होता, तर वहिनीच्या मिषाने ट्रॉयवर कब्जा करत येईल म्हणून अ‍ॅगॅमेम्नॉनने सर्व ग्रीसमधील फौजा जमवून ट्रॉयवर स्वारी केली आणि ट्रोजन युद्ध सुरु झाले जे तब्बल १० वर्षे चालले.

उपलब्ध माहितीच्या आधारे विश्वसनीय वाटण्यासारखी ट्रोजन युद्धाची ही कारणमीमांसा आहे. पण ग्रीक पुराणे याबद्दल असे बोलत नाहीत. आपल्याकडेदेखील पुराणे असोत व रामायण-महाभारत, सगळीकडे कुठल्यातरी देवाचा कसातरी हस्तक्षेप असतोच. त्याचप्रमाणे ग्रीक पुराणांत देखील “झ्युसचा कोप” असेच कारण दिले आहे. शिवाय प्रसंगवशात अनेक देविदेवता काड्या करायला मध्ये येतात ते वेगळेच. आता इलियडची मजा अशी आहे की युद्धाच्या पार्श्वभूमीबद्दल आणि पहिल्या ९ वर्षांबद्दल त्यात काहीच उल्लेख नाही. सर्व साधने शेवटच्या १० व्या वर्षावारच फोकस करतात. त्यामुळे आधीची माहिती विखुरलेली आणि त्रोटक आहे. पण विकिवर जी माहिती दिलीय तीदेखील एकदम रोचक आहे.

महाभारतात प्रत्येक व्यक्तीची एक जन्मकथा आहे आणि प्रत्येक घटनेमागे प्रचंड मोठी कार्यकारणसाखळी आहे. तसेच इथेही. आता होमर म्हणजे ग्रीकांचा व्यास म्हटला जातो, त्यामुळे त्यांच्यासारखेच लांबड त्यानेपण नको का लावायला? मग त्यानेपण मस्त लांबड लावले. पॅरिस हेलेनला घेऊन पळाला. पण का पळाला? तर त्यामागे देवीने दिलेले वरदान आहे. ट्रॉयच्या विनाशाला पॅरिस कारणीभूत होईल, अशी भविष्यवाणी वर्तविल्यामुळे पॅरिस राजकुटुंबापासून दूरवर एक मेंढपाळ म्हणून जगत होता. इकडे अकीलीसच्या आई-वडिलांचा विवाहसमारंभ ऐन रंगात आला होता. त्याची आई थेतिस ही एक अप्सरा होती तर बाप पेलीअस हा मर्त्य मानव होता. या अप्सरेने हा मर्त्य मानवच का निवडला, याची कहाणीपण मजेशीर आहे. या थेतीसवर सर्व देव लाईन मारत असत. पण एक भविष्यवाणी अशी होती, की थेतीस पासून जो मुलगा होईल, तो त्याच्या बापापेक्षा शक्तिशाली होईल. आता ग्रीक देवांत बाप आणि मुलाचे कधीच पटत नसे-मुलगा बहुतेक वेळेस बापाला ठार मारत असे किंवा त्याचा पराभव तरी करत असे. त्यामुळे इतकी हॉट अप्सरा असूनदेखील तिचा कुणाला उपयोग नव्हता-मग झ्यूस वगैरे देवांनी मिळून तिला कोणी मर्त्य मानवांपैकी नवरा मिळवून देण्याचे जुगाड केले आणि तिचे पेलीअस बरोबर लग्न लावून दिले. तर या लग्नाला सर्व देव हजर होते-फक्त एक भांडणाचा देव “एरिस” सोडून. म्हणजे त्याला तिकडे प्रवेश नव्हता-दारावरच त्याला “हर्मेस” नामक दुसऱ्या देवाने अडवले. त्यामुळे एरिस चिडला, आणि त्याने त्याच्या हातातले एक सोन्याचे सफरचंद बाहेरूनच आत फेकले. त्यावर लिहिले होते की “हे सफरचंद सर्वांत सुंदर स्त्रीसाठी आहे”. आता ते सफरचंद पाहिल्याबरोबर तीन मुख्य ग्रीक देवी- हेरा(स्त्रियांची मुख्य देवी), अथीना(कायदा, राजकारण, बुद्धी, इ.इ. सर्व गोष्टींची देवी) आणि आफ्रोडायटी(प्रेमाची देवी) यांच्यात झगडा सुरु झाला- तू भारी की मी भारी? आता आधीच हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा,, त्यातून त्या स्त्रिया देवी, मग या झगड्याचा निकाल लागणे अवघडच होते. पण (सुदैवाने)शेवटी असे ठरले, की पॅरिसच याचा निवडा करेल. मग त्या दैवी सुंदऱ्या गेल्या, इडा नामक झऱ्यात आंघोळ केली आणि पॅरिससमोर नग्न उभ्या राहिल्या. त्याची बिचाऱ्याची ततपप झाली नसती तरच नवल. साधासुधा मेंढपाळ तो, जास्तीतजास्त एखादी गांव की गोरी बघण्याची त्याला सवय. इथे तर प्रत्यक्ष देवी-(त्यापण १ नाही, ३)-त्यासमोर उभ्या होत्या. त्यांनी त्याला विचारले, “बोल , आमच्यापैकी सर्वांत सुंदर कोण आहे?” नुसता बघतच राहिला असेल तो, निर्णय कसला घेतोय? त्याची ती अवस्था बघून प्रत्येक देवीने त्याला आमिषे दाखवली. हेरा म्हणाली, “मी तुला सर्व युरोप आणि आशियाचे राज्य देते”, अथीनाने त्याला लढाईतील कौशल्य आणि इतर गोष्टी ऑफर केल्या, तर कामदेवी आफ्रोडायटीने त्याला आमिष दाखवले, “तू मला मत दिलेस तर जगातील सर्वांत सुंदर स्त्री तुझ्यावर प्रेम करेल”. भाई पाघळले आणि आफ्रोडायटीला मत दिले. त्यामुळे हेलेनचे पॅरिसवर प्रेम बसले. ही झाली पौराणिक मीमांसा. अगदी महाभारत साच्यातील आहे की नाही?

आता युद्ध करायचे निश्चित झाले म्हटल्यावर मायसिनिहून फतवा निघाला आर्मीसाठी. ट्रॉयसारखा प्रबळ शत्रू असता कोण लढावे उगीच म्हणून बरेच लोक लढण्यास नाखूष होते. त्यात ओडीसिअस हा मुख्य होता. त्याला पक्के माहिती होते, की साली ही मोहीम लै वेळखाऊ असणारे. त्यामुळे जेव्हा अ‍ॅगॅमेम्नॉनचे लोक आले, तेव्हा त्याने वेड्याचे सोंग घेतले, शेतात धान्याऐवजी मीठ पेरू लागला. पण त्याचा हा कावा पालामिदेस नावाच्या एका सरदाराने ओळखला आणि ओडीसिअस चा नवजात मुलगा तेलेमॅखोसला त्याने बैलांच्या पुढे टाकले. जर ओडीसिअस खराखुरा वेडा झाला असता तर त्याने त्या बाळावरदेखील बैल नेले असते-पण तो थांबला आणि तेव्हा कळले की तो नाटक करतोय ते. तेव्हा त्याला बरोबर घेतले गेले. अकिलीसची रिक्रूटमेंटदेखील अशीच इंटरेस्टिंग आहे. ओडीसिअस हा बाकीच्या लोकांबरोबर अकीलीसाच्या शोधार्थ हिंडत होता. तेव्हा कळले की तो स्कीरोस नामक एका बेटात आहे. त्याची आई थेतीसने त्याला तिथे लपवून ठेवले होते. असामान्य योद्धा म्हणून अकिलीसची ख्याती सर्वांना माहिती होती आणि आज न उद्या अ‍ॅगॅमेम्नॉनचे बोलावणे त्याला येणार हे थेतीस जाणून होती, (स्टिक्स नामक नदीत तिने त्याचे शरीर बुडविले अशी दंतकथादेखील आहेच) त्यामुळे तिने त्याला स्कीरोस बेटात लपवून ठेवले होते. तिथल्या राजकन्येपासून(तिचे नाव= देईदिमिया ) त्याला निओटॉलेमस नावाचा पुत्रदेखील झाला होता. तर यथावकाश ओडीसिअस आणि बाकीचे लोक त्या दरबारात आले. आता अकिलीस तिथेच वेषांतर करून बसला होता, मग त्याला ओळखावे कसे? तर २ कथा सांगितल्या जातात. एक म्हणजे राजकन्येसाठी काही डाग-दागिन्यांचे प्रदर्शन भरविले गेले आणि ओडीसिअसने मुद्दाम त्यात एके ठिकाणी ढाल-तलवार ठेवली होती. स्त्रीवेशातील अकिलीस तिथे आला आणि बाकीच्या बायका दागिने पाहत होत्या त्याऐवजी शस्त्रांकडे एकटक पाहत बसला, त्यावरून तो अकिलीस हे लक्षात आले. दुसऱ्या कथेनुसार हल्लेखोर आल्याची सूचना देणारे शिंग वाजवले गेले, तेव्हा सगळीकडे पळापळ सुरु झाली, पण अकिलीसने मात्र जवळचा भाला घेतला, तेव्हा तो अकिलीस हे लक्षात आले. अशाप्रकारे अकिलीसपण आपल्या सिलेक्ट सेनेसहित जॉईन झाला.

आता ग्रीक सेनेचा आकार बघू. इलियड च्या दुसऱ्या “बुकात” दिल्याप्रमाणे टोटल ११८६ जहाजे होती. आणि १४२,३२० लोक होते. यांमधील मुख्य लोक कोण कोण होते ते जरा संक्षेपाने बघू:

१. मायसिनीचा अ‍ॅगॅमेम्नॉन- १०० जहाजे. हा पूर्ण मोहिमेचा नेता होता, भालाफेकीत कुशल. हेकेखोर आणि निश्चयी. (त्याच्या नावाची व्युत्पत्तिदेखील तशीच आहे असे म्हणतात)
२. स्पार्टाचा मेनेलॉस- ६० जहाजे. अ‍ॅगॅमेम्नॉनचा सख्खा भाऊ.
३. पायलॉसचा नेस्टॉर- ९० जहाजे. हा सर्वांत ज्येष्ठ योद्धा होता, “सेव्हन व्हर्सेस थिब्स” या लढाईमध्ये त्याने मोठे नाव गाजवले होते. समतोल आणि उपयुक्त सल्ले देण्यासाठी फेमस.
४.अर्गोलीस चा डायोमीड- ८० जहाजे. हा एक तरणाबांड, पराक्रमी गडी होता.
५. सलामीस चा अजॅक्स(ग्रेटर/थोरला अजॅक्स)- १२ जहाजे,अकीलीसचा सख्खा चुलत भाऊ, एकदम सांड, एकंदर वर्णन महाभारतातील भीमाप्रमाणे. अजून एक अजॅक्स होता, कन्फ्युजन नको म्हणून अजॅक्स द ग्रेटर आणि अजॅक्स द लेसर असा शब्दप्रयोग केला जातो. हा लेसर/धाकटा अजॅक्स पण अतिशय चपळ होता.
६. क्रीटचा इडोमेनिअस- ८० जहाजे, लाकडी घोड्यात जे लोक बसले आणि ट्रॉयवर स्वारी केली, त्यांतील मुख्य लोकांपैकी एक.
७. इथाकाचा ओडीसिअस- १२ जहाजे. कुशल योद्धा आणि अतिशय बेरकी. कुठल्याही स्थितीतून मार्ग काढावा तर यानेच. लाकडी घोड्याची आयडिया याचीच. कृष्णाच्या जवळपास जाणारे वर्णन. आधीपासून त्याची जायची इच्छाच नव्हती. त्याचा खोटा वेडेपणा ज्याने उघडकीस आणला, त्या पालामिदेसला नंतर त्याने कपटाने ठार मारले. ओडिसी हे होमरचे दुसरे महाकाव्य त्याच्यावरच आधारित आहे.
८.अकिलीस-५० जहाजे. ग्रीसमधील सर्वश्रेष्ठ योद्धा, अतिशय चपळ. तो आणि त्याचे “मोर्मिडन” नावाचे खुंखार सैनिक अख्ख्या ग्रीस मध्ये फेमस होते. ते मुंग्यांपासून जन्मले अशी आख्यायिका आहे. अकीलीसचा आजा एईकसच्या वेळी एकदा लै मोठा दुष्काळ पडला होता, इतका की प्रजाच नष्ट झाली होती जवळपास, मग त्याने झ्यूसची प्रार्थना केली, आणि झ्युसने मग वारुळातील मुंग्यांपासून या लोकांची उत्पत्ती केली अशी ती कथा आहे.

या तुलनेत ट्रोजन लोकांकडे हेक्टर व सार्पेडन हे भारीतला दोनच योद्धे होते. अर्थात ट्रॉयच्या भुईकोटावर सर्व ट्रोजनांची खूप भिस्त होती.असो.

तर असे हे खासे सरदार आणि सैनिक घेऊन अ‍ॅगॅमेम्नॉन निघाला. नकाशात दाखविलेल्या आव्लीस नामक बंदरात थांबला, अपोलो देवाला बैल व बकऱ्यांचा बळी अर्पण करून जहाजे ट्रॉयच्या वाटेने निघाली. पण वाटेत पुन्हा अनेक वादळे आली आणि बरेच लोक भरकटले- तब्बल ८ वर्षे!!! नंतर परत ८ वर्षांनी सर्वजण आव्लीस बंदरात जमले. आणि इथे एक घटना घडली जिचा पुढे दूरगामी परिणाम होणार होता. अ‍ॅगॅमेम्नॉनला प्रिय हरिणाची शिकार केल्याबद्दल हर्मिस देवतेने कठोर शिक्षा दिली आणि त्यामुळे असे वादळ आले, असे ग्रीकांचा मुख्य भटजी काल्खस म्हणाला. मग यावर उपाय म्हणून चक्क अ‍ॅगॅमेम्नॉनच्या मुलीचा बळी द्यावा अशी मागणी आली!! स्वाभाविकच अ‍ॅगॅमेम्नॉनने नकार दिला. पण इतरांनी मोहीम सोडून देण्याची धमकी दिली, तेव्हा अ‍ॅगॅमेम्नॉनपुढे दुसरा मार्ग उरला नाही. त्याची मुलगी इफिजेनिया तेव्हा वयाने फार काही नव्हतीच. पण तिला आव्लीसला बोलवावे तरी कोणत्या मिषाने? शेवटी तिला सांगण्यात आले, की तिचे अकीलीसबरोबर लग्न लावण्यात येणार आहे. ती बिचारी हुरळून गेली आणि तिला शेवटी ठार मारण्यात आले. त्यामुळे अ‍ॅगॅमेम्नॉनची बायको क्लितिमेस्त्रा हिचा प्रचंड तळतळाट झाला आणि तिने ट्रोजन युद्ध झाल्यावर अ‍ॅगॅमेम्नॉनला ठार मारले- त्या पूर्ण घटनाक्रमावर आधारित orestesiya म्हणून एक नाटकत्रयी Aeschylus या प्रसिद्ध नाटककाराने लिहिलेली खूप प्रसिद्ध आहे.

तर शेवटी एकदाचे ग्रीक सैन्य ट्रॉयला पोचले- त्यांनी त्याला तब्बल ९ वर्षे वेढा घातला. इथेपण भविष्यवाणी होती, की ट्रॉयच्या किनाऱ्यावर पाय ठेवणारा पहिला ग्रीक माणूस जिवंत परत जाऊ शकणार नाही. त्यामुळे लोक तिथे उतरायला घाबरत होते. पण भाई ओडीसिअसने त्यातून परत शक्कल काढली-त्याने जहाजातून ढाल फेकली आणि तिच्यावरच उडी मारली-आहे की नाही आयडिया? ते बघून काही ग्रीकांनी आंधळेपणाने उड्या मारल्या, त्यातला पहिला मग यथावकाश मेला

तर सर्वांना एकत्र करून निघाल्यापासून ८+ युद्धाची ९= तब्बल १७ वर्षे झाली होती. या ९ वर्षांत अकिलीस आणि “थोरल्या” अजॅक्सने लै युद्धे केली. अकिलीसने तर ११ बेटे आणि १२ शहरे ग्रीकांच्या ताब्यात आणली. आणि निर्णायक युद्ध करण्यासाठीची मोठी आर्मी युद्धाच्या १०व्या वर्षातच एकत्र केली गेली. घरी जायच्या इच्छेने कंटाळलेल्या आणि उठाव करू पाहणाऱ्या ग्रीकांना त्यानेच ताब्यात ठेवले होते. प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या(Thucydies ) मते इतका वेळ लागण्याचे कारण म्हणजे पैसा व इतर गोष्टींचा अभाव. ते काही असो, इतकी वर्षे लागली, हे तर नक्कीच.

युद्धाच्या १०व्या वर्षी ग्रीक सैन्यात मोठा प्लेग आला. आणि तिथून अशा काही वेगाने घडामोडी घडल्या की ज्याचे नाव ते. होमरचे प्रसिद्ध इलियड हे महाकाव्य त्या १०व्य वर्षातील घटनांभोवतीच फिरते. त्याचे नाव इलियड आहे , कारण होमर ट्रॉयला ट्रॉय न म्हणता इलीयम म्हणतो, त्यामुळे इलीयमवरचे काव्य ते इलियड असा त्या नावाचा इतिहास आहे. अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे ग्रीक लोकांना ग्रीक असे म्हटलेच नाही कधीही. हेलेन्स, एखीअन्स, आर्गाइव्हज इ.इ. अनेक नावानी होमर ग्रीकांना संबोधतो. ज्याप्रमाणे महाभारतात भारतीय वगैरे न म्हणता गांधार, कुरु, पांचाल, यादव, इ. म्हटले आहे तसेच.

(क्रमश:)

Advertisements
This entry was posted in इतिहास-इतर जग, ग्रीस. Bookmark the permalink.

18 Responses to ट्रोजन युद्ध भाग १- पूर्वपीठिका.

 1. हेरंब ओक म्हणतो आहे:

  जबरीच एकदम बेल्लारीकर !!

  मोठा डीटेल नकाशा कुठे आहे? कुठे क्लिक करायचं?

  >> या थेतीसवर सर्व देव लाईन मारत असत. पण एक भविष्यवाणी अशी होती, की थेतीस पासून जो मुलगा होईल, तो त्याच्या बापापेक्षा शक्तिशाली होईल. आता ग्रीक देवांत बाप आणि मुलाचे कधीच पटत नसे-मुलगा बहुतेक वेळेस बापाला ठार मारत असे किंवा त्याचा पराभव तरी करत असे. त्यामुळे इतकी हॉट अप्सरा असूनदेखील तिचा कुणाला उपयोग नव्हता-मग झ्यूस वगैरे देवांनी मिळून तिला कोणी मर्त्य मानवांपैकी नवरा मिळवून देण्याचे जुगाड केले..

  अति अति अति प्रचंड !!

 2. हेरंब ओक म्हणतो आहे:

  मी आधी दिलेली कमेंट दिसत नाहीये. आठवेल तेवढी पुन्हा टाकतो.

  एकदमच भारी बेल्लारीकर !!

  मोठा डीटेल नकाशा कुठे आहे? कुठे क्लिक करायचं?

  >> या थेतीसवर सर्व देव लाईन मारत असत. पण एक भविष्यवाणी अशी होती, की थेतीस पासून जो मुलगा होईल, तो त्याच्या बापापेक्षा शक्तिशाली होईल. आता ग्रीक देवांत बाप आणि मुलाचे कधीच पटत नसे-मुलगा बहुतेक वेळेस बापाला ठार मारत असे किंवा त्याचा पराभव तरी करत असे. त्यामुळे इतकी हॉट अप्सरा असूनदेखील तिचा कुणाला उपयोग नव्हता-मग झ्यूस वगैरे देवांनी मिळून तिला कोणी मर्त्य मानवांपैकी नवरा मिळवून देण्याचे जुगाड केले..

  अति अति प्रचंड !!

 3. shreenivas612 म्हणतो आहे:

  ha ha ha…
  kadya kelya…
  tyach kadyanchi gharti jhali ani aplyasarkhya itihasvedyanna ashray milala…

 4. nilesh1foru म्हणतो आहे:

  Fantastic….
  Super lyk it…
  I was totaly confued while watching movies Troy, 300 , and dozends of movies where greek history are mentioned….I was always confused abt there backgroud….
  Thnaks for the article….
  .
  .
  .
  After reading this article I get question in my mind ….
  Where are the sons of our gods ? Exept Ganpti we hardly know any son of any god…infact there is no record any son of any god… Isn’t it ?
  Anyway… Keep writing….
  I am big fan of hollywood movies and in many movies they describes the God of Love,War,Dead, ……ect.ect……….Exactly how many gods the greeks have ? 🙂

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   Thanks Nilesh 🙂

   There are sons of Gods in our mythology also:

   Ganesh, Kartikeya, Ayyappa, and all Pandavas including Karna. It’s Just that
   we don’t perceive them as ‘sons of Gods’ in general.

   As for the number of Greek Gods, take a look at this link.

   http://en.wikipedia.org/wiki/List_of_Greek_mythological_figures#Immortals

   seems that Gods, i.e. immortals are of 13 types. Of these, the 12 Olympians are the most important, with Zeus as their head.
   This Olympian pantheon has a close resemblance with Rig Vedic pantheon as well, where the leader of the Gods is Indra.

  • aruna म्हणतो आहे:

   शंकराचे पुत्र गणपति आणि कार्तिकेय. ब्रह्म्देवाची मुलगी सावित्री, आणि विष्णूचे कृष्णावतारात अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि ईतर मुले होती.रामावतारात लव आणि कुश.मरुत म्हणजे वायूचे भीम आणि हनुमान. (हनुमान शंकराचा पुत्र असल्याचे पण काही प्रवाद आहेत.) आपले देव रक्षसांशी लढायचे. आपसात लढलेले जास्त ऐकीवात नाही.

   • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

    बरोबर, आपले देव राक्षसांशी लढायचे, आपापसात लढल्याचे उल्लेख मलापण नाही सापडले. ग्रीकांच्यात आणि आपल्यात तोच मेन फरक आहे: त्यांच्या पुराणकथांत देव-राक्षस असा झगडा मी नाही वाचला कमीतकमी इलियडमध्ये/ओडीसिमध्ये तरी.

 5. aruna म्हणतो आहे:

  very good work Nikhil. and comprehensive too. the story of Ulyssis and his journey back home also is very interesting. the word odissiy gets it’s meaning -a very long journey frought with all kinds of difficulties, from the journey back of odissius

 6. aruna म्हणतो आहे:

  आपले देव हे देव होते. त्यांनी आपले देवपण बर्‍याच प्रमाणात राखले होते. इंद्र हा देवांचा राजा पण त्याचे इंद्रपद तपस्येने मिळवलेले. म्हणून तो स्खलनशील!

 7. full2dhamaal म्हणतो आहे:

  मस्त लिहिले आहे.

  दुसरा भाग जरा टाका की राव..

 8. panseaditya म्हणतो आहे:

  निखील भाऊ, दुसरा भाग टाका की लवकर !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s