ट्रोजन युद्ध भाग ३.१- अकिलीसचे शेवटचे पराक्रम व मृत्यू.

ग्रीक एपिक सायकल- पार्श्वभूमी.

मागील भागात पाहिल्याप्रमाणे हेक्टरच्या मरणानिशी इलियड संपते, तर ट्रॉयचा पाडाव झाल्यानंतर ओडीसिअस त्याच्या घरी इथाका येथे १० वर्षांनंतर पोहोचतो तो १० कालखंड ओडिसीमध्ये आलेला आहे. पण मधल्या काळात ज्या सर्वांत महत्त्वाच्या घटना घडल्या, त्यांचे ओडिसीमध्ये अगदीच संक्षिप्त रूपात वर्णन येते. मग यांमधल्या काळासाठी अजून माहिती कुठे मिळणार? एपिक सायकल या नावाने एकत्रित प्रसिद्ध असलेली पाचसात काव्ये आहेत. आता त्यांपैकी कुठल्याही काव्याचे हस्तलिखित मिळालेले नाही, त्यामुळे आधीचे इलियड वाचून एक्साईट झालेल्यांना हा मोठा केएलपीडीच आहे. परंतु परम सुदैवाने यांचा सारांश कुणा एव्तिखियस प्रॉक्लस नामक वैयाकरणीने इ.स. दुसर्या शतकात काढलेला असल्याने सारांशरूपाने का होईना, वर्णने वाचावयास मिळतात. नंतरच्या अनेक काव्यनाटकांमध्ये जे उल्लेख मिळतात त्यांवरूनही या मधल्या सर्वांत महत्त्वाच्या पार्टची कथा थोडी रीकन्स्ट्रक्ट करता येते.

ट्रोजन युद्धाशी संबंधित जुन्या काव्यांना एकत्रितपणे एपिक सायकल असे म्हटले जाते. त्याबद्दल थोडेसे लिहिणे इथे अवश्यमेव आहे. इलियड अन ओडिसी सोडून बाकीच्या काव्यांचे रचयिते होमर सोडून दुसरे कवी आहेत. इलियड अन ओडिसी धरून एकूण काव्ये खालीलप्रमाणे:

सायप्रिआ: युद्धाची पहिली नऊ वर्षे कव्हर करते. कवी स्टॅसिनस. ११ अध्याय.

इलियडः युद्धाचे दहावे वर्ष, हेक्टरच्या मरणापर्यंत. कवी होमर. २४ अध्याय.

एथिओपिसः हेक्टरच्या मरणानंतर अॅमेझॉन पेन्थेसिलिआ आणि इथिओपियन मेम्नॉन व शेवटी अकिलीसच्या मरणापर्यंत. कवी आर्क्टिनस. ५ अध्याय.

लिटल इलियडः अकिलीसच्या मरणानंतर ट्रोजन घोडा तयार करण्यापर्यंत. कवी लेश्चेस. ४ अध्याय.

इलियू पर्सिसः ट्रॉयचा ग्रीकहस्ते झालेला विनाश. कवी आर्क्टिनस. २ अध्याय.

नोस्तोई: ट्रॉय नष्ट केल्यावर ग्रीक आपापल्या घरी परततात. आगामेम्नॉन व मेनेलॉस अनुक्रमे मायसीनी व स्पार्टाला परततात तिथपर्यंत. कवी आगियास अथवा युमेलस. ५ अध्याय.

ओडिसी: ओडिसिअस इथाकाला घरी परततो आणि त्याची राणी पेनेलॉपच्या स्वयंवरास जमलेल्या सर्वांचा मुडदा पाडतो तिथपर्यंत. कवी होमर. २४ अध्याय.

टेलेगॉनी: ओडीसिअसच्या अजून काही मोहिमा आणि त्याच्या मृत्यूपर्यंत. कवी एव्गाम्मॉन. २ अध्याय.

ही सर्व काव्ये आज फक्त प्रॉक्लसने काढलेल्या सारांशामुळे माहिती आहेत. रचनाकाल होमरच्या नंतर शेदोनशे वर्षे असावा.पण मधल्या एथिओपिस ते इलियू पर्सिस पर्यंतच्या काव्यांमधील कथाभागच मुख्य आहे यात दुमत नसावे. तस्मात नेमका हाच कथाभाग पोस्टहोमेरिका किंवा फॉल ऑफ ट्रॉय नामक तब्बल १४ बुकांचे काव्य अस्तित्वात असल्याचे नेटवर पाहताना कळाले, तेव्हा जीव भांड्यात पडला. मधल्या सर्व घटना अगदी इत्थंभूत अन सविस्तर दिलेल्या असल्याने ते वाचायला मजा आली. एपिक सायकलचा सारांश अन यात काही ठिकाणी अंतर्विरोध आहे पण त्यातल्या त्यात सुसंगत व्हर्जन लिहिण्याचा माझा प्रयत्न असेल.

तर आता काव्याकडे जाऊ. हे काव्य सध्याच्या तुर्की देशातील स्मिर्ना नामक पश्चिम किनार्‍यावरील बंदरात राहणार्‍या क्विंटस स्मिर्नियस नामक कवीने इ.स. ३५० च्या आसपास लिहिलेले आहे.

http://www.theoi.com/Text/QuintusSmyrnaeus1.html

इथे याचे इंग्रजी भाषांतर वाचावयास मिळेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवीचे नाव लॅटिन स्टाईल असले तरी काव्य मात्र ग्रीक भाषेत लिहिले आहे. याचीही शैली उत्तम आहे. होमरची मजा यात नाही असे बरेच लोक म्हणतात पण मला तरी भाषांतर वाचताना मजा आली. अर्थात प्राचीन ग्रीक भाषा मला येत नसल्याने माझा निर्णय भाषांतरकाराच्या कौशल्यावर अवलंबून आहे हे स्वयंस्पष्टच आहे. असो.

अ‍ॅमेझॉन वीरांगना राणी पेन्थेसिलिआचा महत्पराक्रम.

हेक्टरच्या अंत्यविधीच्या वर्णनापाशी इलियड संपते तिथून पुढे हे काव्य सुरू होते. १२ दिवसांच्या सुतकानंतर त्याचा अंत्यविधी झाला, तोपर्यंत युद्ध करायचे नाही असे उभयपक्षी ठरले होते. तो कालावधी पार झाल्यावर पुढे युद्ध सुरू झाले. अकिलीसच्या पराक्रमामुळे ट्रोजनांची भीतीने गाळण उडाली होती. त्याने ट्रोजनांची कशी चटणी उडवली, नदीत घुसून कसे ट्रोजनांना मारले, हेक्टरचे प्रेत रथाला बांधून कसे सगळ्यांसमोरून फरपटत नेले, हे आठवून ट्रोजन अजूनही भीतीने थरकापत होते.

त्यातून त्यांना दिलासा मिळाला तो पेन्थेसिलिआ नामक अॅमेझॉन राणीमुळे. ती ट्रॉयमध्ये राजा प्रिआमच्या भेटीस आली आणि ट्रोजनांच्या बाजूने युद्ध करण्याचा इरादा जाहीर केला. इथे हे अॅमेझॉन नक्की काय प्रकर्ण होते ते सांगणे अवश्यमेव आहे. अॅमेझॉन हा शब्द प्राचीन ग्रीक पुराणांत फक्त स्त्रीयोद्ध्यांच्या राज्याला उद्देशून वापरला जातो. त्यांच्याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. पुराणांत अनेक उल्लेख सापडतात त्यानुसार सिथिया नामक प्रांतात यांचे वास्तव्य असे. सिथिया म्हणजे काळ्या समुद्राजवळचा मध्य आशियाचा भाग समजला जातो. तत्कालीन ग्रीक जगताच्या सीमारेषेजवळ हा भाग होता. यांच्या राज्यात फक्त आणि फक्त स्त्रिया असत आणि वंशसातत्यासाठी वर्षातून एकदा त्यांची टोळी पुरुषांशी संबंध ठेवायला बाहेर पडत असे. गर्भ राहून मुलगी झाली, तर तिला वाढवले जाई आणि मुलगा असेल तर एक तर जन्मतःच त्याची हत्या तरी केली जाई किंवा गुलाम तरी बनवले जाई. काही ठिकाणी या गुलामांशीही या स्त्रिया संबंध ठेवीत असे नमूद आहे. त्यांच्याबद्दलची सर्वांत फेमस दंतकथा म्हणजे भालाफेक आणि तिरंदाजी नीट करता यावी म्हणून त्या उजवा स्तन कापून टाकत. तत्कालीन शिल्पांमध्ये मात्र असे काही दिसत नाही.

इलियडमध्येही ‘पुरुषांप्रमाणे लढणार्या’ म्हणून अॅमेझॉन योद्ध्यांचे वर्णन आलेले आहे. बहुतेक वेळेस त्या ज्ञात जगताच्या सीमारेषेवर असलेल्या दिसतात. पण तुर्की आणि अन्यत्र काळ्या समुद्राच्या आसपास जी उत्खनने झाली तिथे “कुर्गन” म्हणजेच मृतदेह पुरून त्याभोवती चबुतरे उभारले जात ते सापडले आहेत. जितकी कुर्गन्स सापडलीत त्यांपैकी किमान एकचतुर्थांश तरी स्त्री योद्ध्यांची आहेत. योद्ध्यांची आहेत असे म्हणण्याचे कारण मृतदेहासोबत धनुष्य-तलवार इ. शस्त्रे पुरलेली आहेत. त्यामुळे ग्रीक पुराणांतील दंतकथांना काहीएक आधार नक्कीच होता हे स्पष्ट होते. काही टोळ्यांमधील मातृसत्ताक रिवाजांचा उगम या अॅमेझॉन समाजात असावा असाही तर्क लढवला जातो. या विषयावर बरेच संशोधन झालेले आहे ते विकीवर आणि अन्यत्र पाहता येईलच. इंग्रजीतही त्यामुळे लढाऊ अन धट्ट्याकट्ट्या स्त्रीस ‘अॅमेझॉन’ म्हणण्याचा प्रघात आहे.

तर अशी ही थर्मोडॉन प्रदेशाची अॅमेझॉन राणी पेन्थेसिलिआ ट्रोजन युद्धात ट्रोजनांच्या बाजूने सहभाग घेण्यास आली. पण तिला असं काय नडलं होतं यायला फुकाफुकी? तर तिच्या राज्यात एकदा हरणाची शिकार करायला पेन्थेसिलिआ तिच्या बहिणी अन सहकार्यांबरोबर गेली होती. पेन्थेसिलिआने हरणावर फेकलेला भाला गफलतीने तिच्या हिप्पोलाईट नामक बहिणीला लागून ती जागीच खलास झाली. आता परत जावे तरी पंचाईत, कारण लोक म्हणणार की राज्यलोभाने पेन्थेसिलिआने आपल्या बहिणीचा काटा काढला. तिच्यासाठी तत्कालीन रिवाजानुसार प्रायश्चित्त म्हणून “सन्मानाने मृत्यू” हा एकच मार्ग उपलब्ध होता. अन युद्धात वीरगती मिळवण्यावाचून दुसरा सन्मानाचा मार्ग तो कुठला? आपल्या जवळच ट्रोजन युद्ध चाललेय हे तर तिला ठाऊक होतेच. मग आपल्या बरोबर १२ मुख्य सहकारी अन अजून सेना घेऊन ती ट्रॉयराज प्रिआमकडे आली. तिच्या बरोबर क्लोनी, पॉलिमूसा, डेरिनो, एव्हान्द्रे, अन्तान्द्रे, ब्रेमूसा, हिप्पोथो, हर्मोथो, अल्किबी, देइमाखिआ, अँटिब्रोटे अन थर्मोदोसा या मुख्य सहचारिणी होत्या.
ट्रॉयच्या रस्त्यांमधून आपापल्या रथ-घोड्यांवर मोठ्या डौलात बसून येणार्या या महिला चमूकडे सर्व ट्रोजन लोक मोठ्या आश्चर्याने पाहत होते. फुल चिलखत घातलेल्या, हातात तलवार-भाले वागवणार्या अन पुरुषासारखे ताकदवान शरीर असलेल्या पण त्याचबरोबर सौंदर्यात कुठेही कमी नसलेल्या त्या अॅमेझॉन्सना पाहून ट्रोजनांना कळायचं बंद झालं. प्रिआमने पेन्थेसिलिआचे स्वागत केले अन मेजवानी दिली, शिवाय तिला बर्याच महागड्या भेटवस्तूही दिल्या. बदल्यात तिनेही ट्रोजनांच्या शत्रूंचा नायनाट करण्याचे आश्वासन दिले. अकिलीसलाही आपल्या भाल्याने ठार मारून ग्रीकांची जहाजे पेटवते असे भरघोस आश्वासन तिच्याकडून ऐकल्यावर प्रिआम लैच खूष झाला. पण ते ऐकून हेक्टरपत्नी अँद्रोमाखी खिन्नपणे स्वतःशीच म्हणाली, “माझा नवरा हिच्यापेक्षा लाख पटीने श्रेष्ठ होता युद्धात आणि त्यालाही अकिलीसने मारला. हिचा काय घंटा पाड लागणारे त्याच्यापुढे?”

जेवण झाल्यावर पेन्थेसिलिआ झोपली. झोपेत तिचा बाप स्वप्नात येऊन तिला म्हणाला की मोठा पराक्रम गाजवशील उद्या. ते पाहून पेन्थेसिलिआ एकदम खूष झाली. आन्हिके उरकून चिलखत अंगावर चढवून उजव्या हातात एक परशू आणि डाव्या हातात भाला घेऊन ती जोषातच लढायला बाहेर पडली. तिला पाहून बाकीच्या ट्रोजन सेनेलाही स्फुरण चढले आणि तिच्या नेतृत्वाखाली ट्रोजन सैन्य चढाई करून येऊ लागले. पेन्थेसिलिआच्या नेतृत्वाखाली ट्रोजन सैन्य एकदम चढाई करून येताना ग्रीकांनी पाहिले आणि त्यांना एकदम आश्चर्य वाटले. साहजिकच आहे म्हणा, परवापरवापर्यंत अकिलीसाचा अ उच्चारला तरी ट्रॉयच्या भिंतीआड दडणारे ट्रोजन्स एकदम इतके चेकाळले तर चर्चा तर होणारच.

मग युद्धाला तोंड लागले आणि पेन्थेसिलिआ आणि तिच्या बरोबरच्या अॅमेझॉन सैन्याने कत्तलखाना सुरू केला.
पेन्थेसिलिआ: हिने मोलिऑन, पर्सिनूस, एलिसस, अँटिथेउस, हिप्पाल्मस, एलासिप्पस या ग्रीकांना आपल्या भाल्याने ठार मारले.
देरिनो: हिने लाओगोनस नामक ग्रीकाला मारले.
क्लोनी: हिने मेनिप्पस नामक ग्रीकाला यमसदनी धाडले.
ते पाहून पॉदार्केस नामक ग्रीक योद्धा पुढे आला आणि त्याने क्लोनीच्या ओटीपोटात भाला खुपसला. तिची आतडी बाहेर आली आणि ती मरण पावली. ते पाहून पेन्थेसिलिआ पेटली आणि तिने त्याच्या उजव्या हातात खोलवर भाला खुपसला. त्यामुळे शीर उघडी पडली आणि तीतून रक्ताचे कारंजे उडू लागले. पॉदार्केस असह्य वेदनेने कळवळला आणि थोडे अंतर मागे पळून मरण पावला.

यानंतर क्रीटाधिपती इडोमेनिअसने ब्रेमूसाच्या छातीत भाला खुपसून तिचा प्राण घेतला आणि एव्हान्द्रे व थर्मोडोसा या दोघींना मेरिओनेसने अनुक्रमे छातीत व नितंबांत भाला खुपसून ठार मारले.धाकट्या अजॅक्सने डेरिनोच्या गळा व खांद्यांमधील भागात भाला खुपसून मारले, तर डायोमीडने अक्लिबी आणि देरिमाखिया या दोघींची मुंडकी उडवली.
अॅमेझॉन सैन्य सोडूनही अन्य मारामार्या चालल्याच होत्या. स्थेनेलस नामक ग्रीकाने काबिरुस नामक ट्रोजनाला मारले. ते पाहून पॅरिस चिडला आणि त्याने स्थेनेलसवर एक बाण सोडला. स्थेनेलसने तो चुकवला आणि एव्हेनॉर नामक ग्रीकाला जाऊन लागला. एव्हेनॉर कोसळला व मेला. मेगेस नामक ग्रीक योद्ध्याने इटिमॉनस आणि हिप्पासस या दोघा ट्रोजनांचे प्राण घेतले. त्याने हे दोघे सोडूनही लै लोक मारले.

अशाप्रकारे सगळी बोंबाबोंब चालू होती. पेन्थेसिलिआवर ग्रीक योद्धे झेपावत होते आणि तिचा आवेश पाहून मागे हटत होते. ती कुणालाही आटपत नव्हती. एखाद्या सिंहिणीने गायी माराव्यात तशी ती त्यांच्यावर झेपावत होती. आपल्या घोड्यावर बसून परशू परजत ती ग्रीकांना भाल्याने असे काही मारत होती की शिशिरऋतूतील पानगळीप्रमाणे ग्रीक योद्धे पटपट मरत होते. तिने ग्रीकांना खिजवले, “कुत्र्यांनो, प्रिआमला दिलेल्या त्रासाचा पुरेपुर बदला मी घेणारे!!सगळ्यांना कोल्ह्याकुत्र्यांकडून खाववेन. कुठे गेले तुमचे योद्धे? कुठे गेला डायोमीड, कुठे गेला तो सांड अजॅक्स आणि कुठाय तो सर्वशक्तिमान अकिलीस??? एकाच्या अंगात दम नाही. थू:तिच्यायला!!”

पेन्थेसिलिआने शौर्याची कमाल चालवली होती. तिच्या शौर्याने प्रेरित होऊन ट्रोजन सैन्यानेही ग्रीकांची चटणी उडवणे सुरू केले होते. ट्रॉयच्या बुरुजांवरून तिचा व तिच्या सैनिकांचा पराक्रम पाहून पाहून तिसिफोनी नामक ट्रोजन म्हैला एकदम चेकाळली. सर्व बायकांना हाकारून म्हणाली,”पाहिलं काय त्या बायका कशा लढताहेत ते!! पुरुष झक मारले त्यांच्यापुढे. चला, आपणपण जाऊ लढायला.” असे म्हणून चिलखत वैग्रे घालून त्या बायका लढायला निघणार एवढ्यात थिअॅनो नामक ट्रोजन त्यांना म्हणाला, “बायांनो, काय मूर्खपणा चालवलाय हा आँ? हातात कधी तलवार तरी धरलीय का याआधी, चाललाय लढायला एकदम ते? त्या अॅमेझॉन बायकांचं सोडा, त्यांना रोजची सवय आहे लढायची. पुरुष काय लढेल असं लढतात त्या. त्यांच्यासाठी हे नेहमीचंच आहे सगळं. पण तुमच्या अंगात दम आहे का जरा तरी? चला गप आत जा. आणि तसेही आपलं सैन्य आज जिंकतंय, बायकांनी लढण्याजोगी परिस्थिती अजून आलेली नाही.”
थिअॅनोचे बोलणे बायकांना पटले आणि त्या ट्रॉयच्या बुरुजांवर बसून लढाई पाहू लागल्या.

अकिलीसकडून पेन्थेसिलिआचा वध.

हे सर्व चालू असताना थोरला अजॅक्स आणि अकिलीस मात्र लढाईत नव्हते. पॅट्रोक्लसच्या कबरीपाशी दोघेही दु:ख करीत बसले होते. पण पेन्थेसिलिआने ग्रीकांची कत्तल उडवली आणि ग्रीक आपापल्या जहाजांकडे पळून येऊ लागले आणि जहाजे जाळण्याइतपत ट्रोजन्स जवळ येतात तोपर्यंत थोरला अजॅक्स अकिलीसला म्हणाला, “अबे आवाज ऐकलेस काय? लै लोकांचे आवाज यायला लागलेत. काय भानगड आहे बघू चल लौकर. न जाणो ट्रोजन्स आपल्या जहाजांपर्यंत पोचले आणि जहाजे पेटवून दिली तर लोक शिव्या घालतील की आपल्या दोघांचा उपयोग काय म्हणून, तेव्हा चल लौकर.”

त्यानंतर दोघेही चिलखत घालून युद्धाला निघाले. त्यांना पाहताच ग्रीक सैन्याचे मनोबळ क्षणार्धात वाढले आणि पुनश्च नव्या जोमाने कापाकापी सुरू झाली. अजॅक्सने देइओखस आणि हिल्लस व युरिनोमस या ट्रोजनांना मारले, तर अकिलीसने आन्तान्द्रे, पॉलिमूसा, अँटिब्रोटे, हिप्पोथो, हर्मोथो या अॅमेझॉन योद्ध्यांना मारले. या दोघांना पाहताच पेन्थेसिलिआ पेटली आणि त्यांना सामोरी गेली. तिने अकिलीसवर एक भाला फेकला, पण तो त्याच्या ढालीला तटून खाली पडला. दुसरा भाला तिने अजॅक्सवर फेकून मारला आणि म्हणाली, “अरे जवळ या असे!! भिता की काय मला? तुम्ही दोघे स्वतःला कितीही मोठे समजत असला तरी मीही काही कमी नाहीये, खरेतर कुणाही पुरुषापेक्षा माझं बळ जास्तच आहे, काय समजलेत!!!”

तिची वल्गना ऐकून दोघेही तुच्छतेने हसू लागले. अजॅक्सवर फेकलेला भाला त्याच्या पायाला बांधलेल्या चांदीच्या पॅडला लागून तटला. अजॅक्सला काही झाले नाही, पण त्याने पेन्थेसिलिआचा नाद सोडला आणि अन्य ट्रोजनांमागे तो निघाला. आता अकिलीस विरुद्ध पेन्थेसिलिआ असा सामना होणार होता. अकिलीस तिला म्हणाला, ” ए मूर्ख बाई, कशाला उगीच वेडेपणा करतीयेस? माझा पराक्रम तुला ठाऊक नाही का? मी मारलेल्या ट्रोजनांच्या मृतदेहांचे ढिगारे पाहिले नाहीस काय? मरायची इतकीच घाई असेल तर ठीके.”

असे म्हणून अकिलीसने तिच्यावर एक भाला फेकला तो बरोब्बर तिच्या छातीत घुसला. लालभडक रक्त एखाद्या कारंजागत उसळले आणि पेन्थेसिलिआ कोसळली. रागाच्या भरात अकिलीसने तिच्या घोड्यालाही भाल्याने ठार मारले. अकिलीस तिला घोड्यावरून खाली ओढायच्या बेतात असताना तिच्या मनात विचार चालू होता, पुन्हा लढावे की अकिलीसपाशी अभयदान मागावे? पण काही न बोलता ती वीरगतीस प्राप्त झाली. पेन्थेसिलिआ कामी आलेली पाहताच ट्रोजन घाबरले आणि सरळ ट्रॉयच्या भिंतींमागे लपले.
मेलेल्या पेन्थेसिलिआकडे बघून अकिलीस म्हणाला,”कुत्रे खातील तुला आता फाडून! कुणी सांगितलं होतं माझ्याशी लढाई करायला?” पण त्यानंतर मेलेल्या शत्रूचे चिलखत काढून घेत असताना अकिलीसने तिचे हेल्मेट काढले आणि तो स्तब्ध झाला. पेन्थेसिलिआ तरुण आणि सुंदर होती. तिच्या चेहर्याकडे पाहताना अकिलीस तिच्या प्रेमातच पडला, भान विसरून एकटक तिकडे पाहू लागला. बाकीचे मॉर्मिडन सैनिकही तिच्याकडे पाहत होते. आपल्या बायकाही अशाच सुंदर असाव्यात, असे त्यांना क्षणभर तिच्याकडे पाहून वाटले. अकिलीसला तिला मारल्याबद्दल अतीव दु:ख झाले.

तेव्हा थर्सितेस नामक एक ग्रीक अकिलीसला चिडवू लागला, “मूर्खा, लंपटपणाचा कहर आहे हा. जरा तरी कंट्रोल करशील की नाही? वेळकाळप्रसंग काही आहे की नाही? डोकं बाजूला ठेवू नको. कोण कुठली अॅमेझॉन आणि तिच्यासाठी इतकं पागल व्हायचं कारणच काय??” हा थर्सितेस आगाऊ म्हणून प्रसिद्ध होता. इलियड बुक २ मध्येही आगामेम्नॉनला तो असाच बोलला तेव्हा ओडीसिअसने धमकी दिल्यावर मगच गप्प बसला होता.

पण इथे गाठ अकिलीसशी होती. थर्सितेसचे बोलणे ऐकून अकिलीस इतका चिडला की त्याने जोरात त्याच्या कानफडात मारली. झटका असह्य होऊन रक्त ओकत थर्सितेस जमिनीवरच कोसळला. त्याचा जबडाच बाहेर आला. ते पाहून बाकीचे ग्रीक म्हणाले, “बरी अद्दल घडली. अंगात नाही दम आणि उगीच राजामहाराजांशी पंगे घ्यायचे, मग असंच होणार.” घडवून आणला. पण अकिलीसचा राग अजूनही शमला नव्हता. “मर साल्या कुत्र्या! आपल्या कर्माने एकदाचा मेलास ते बरंच झालं.” पण डायोमीड चिडला, कारण थर्सितेस त्याचा सख्खा चुलतभौ होता. आता अकिलीस आणि डायोमीड यांच्यात भांडणे होणार इतक्यात लोकांनी समेट घडवून आणला.

आता पेन्थेसिलिआला पाहून आगामेम्नॉन आणि मेनेलॉस हे दोघेही प्रभावित झाले होते. प्रिआमकडून एक दूत आला तेव्हा त्याच्याकडे तिची आणि अन्य अॅमेझॉन योद्ध्यांच्या डेड बॉडीज सुपूर्द केल्या गेल्या. प्रिआमचा बाप लाओमेडॉन याच्या कबरीशेजारीच त्यांचे दहन करून चबुतरा उभारला गेला. इकडे ग्रीकांनीही पॉदार्केसचा अंत्यविधी केला आणि थर्सितेसची डेड बॉडी कॉमन खड्ड्यात टाकून दिली.

पॅरिस आणि पॉलिडॅमसची बाचाबाची

या भागात पेन्थेसिलिआ मेल्यानंतरचे वर्णन आले आहे. तिच्या मरणानंतर ग्रीक लोक अकिलीसची वाहवा करीत होते, तर ट्रोजनांची अवस्था अजूनच बिकट झाली होती. ट्रॉयच्या तटाबाहेर आपल्या रथातून फिरणार्या अकिलीसकडे पाहून त्यांना भीतीने कापरे भरत होते. राजा प्रिआमच्या महालात भरलेल्या महासभेत थिमोएतेस नामक म्हातारा ट्रोजन म्हणाला, “ट्रोजनांनो, मी आता हे युद्ध जिंकायची आशा सोडली आहे. आपला सर्वांत मोठा चँपियन हेक्टर होता त्याला अकिलीसने मारले. इतकी शूर पेन्थेसिलिआ राणी, पण तिलाही अकिलीसकडून मरण आले. आता आपण काय करायचं यापुढं? पळून जायचं की या निर्दय ग्रीकांपुढे अशीच लढत द्यायची? अकिलीस रणमैदानात असेतोवर आपला त्यांच्यापुढे टिकाव लागणे अशक्य आहे.”

त्यावर प्रिआम उत्तरला, “भावा, टेन्शन नको घेऊ. इथिओपियाहून मेम्नॉन आणि त्याचे अगणित काळे सैनिक आता आपल्या मदतीला येणार आहेत.
( हा इथिओपिया म्हणजेच आत्ताचा इथिओपिया-इजिप्तच्या दक्षिणेस असलेला. ग्रीक भाषेत एथिओप म्हणजे जळक्या तोंडाचा, म्हणजेच काळा.)
मेम्नॉनने मला तसं वचनच दिलंय. काही दिवसांत येतील ते. मेम्नॉन आला की आपले कष्ट संपतील, काळजी नसावी. तेवढी जरा अजून कळ काढा.”

पण पॉलिडॅमसचा त्यावर विश्वास बसला नाही. “मेम्नॉन जरी आला, आणि जरी त्याने भरमसाट वचने दिली असली आणि त्याची सेना कितीही मोठी असली तरी ते सगळे इथे फुकट मरणार आहेत. ग्रीकांचे सामर्थ्य आजपर्यंत जेवढे पाहिले त्यावरून मला असेच वाटते. ते एक असो. पण आपण इकडून पळून जाणे किंवा ग्रीकांशी मरेतोवर लढणे हे दोन्ही पर्याय अव्यवहार्य आहेत. त्यापेक्षा मी अजूनही सांगतो ते ऐका. त्या हेलेनला ग्रीकांच्या ताब्यात परत द्या. तिच्याबरोबर जितका खजिना आला होता त्याची दामदुप्पट करून त्यांना परत द्या. अख्खे ट्रॉय शहर या बयेपायी जळण्याअगोदर मी म्हणतो तसे करा. हेक्टरनेही जर माझा सल्ला तेव्हा ऐकला असता तर तो अजूनही जिवंत असता.”

यावर सर्व ट्रोजनांनी मनातल्या मनात संमती दर्शवली, पण पॅरिस व हेलेनच्या भयाने कोणी तोंड उघडेना. पण पॅरिस मात्र त्याला सर्वांदेखत शिव्या घालू लागला- साहजिकच आहे म्हणा, हेलेनपायी पागल झालेल्याकडून दुसरी अपेक्षा तरी कशी ठेवणार? “लढाईची वेळ आली की पळून जाणार्या भित्रटा, तुझ्या अंगात काही दम नाही. मी आणि बाकीचे पुरुष चिलखते चढवून लढाई करून पराक्रम गाजवू, लेकिन वो तो तुमसे ना हो पायेगा. महालात बस नुसता बुळग्यागत तू, सैन्याचे मन खच्ची करण्यावाचून तुला दुसरं येतंय तरी काय!!!”

आता मात्र पॉलिडॅमसची सटकली. चोर तो चोर आणि वर शिरजोर???? “अरे भ्याडा, पराक्रम कशाशी खातात तुला ठाऊक तरी आहे का? पराक्रम म्हणे! हाड!! तुझ्या एकट्यासाठी आम्ही सगळेच काय, अख्खे ट्रॉय शहर नष्ट झाले तरी तुला त्याची पर्वा नाही आणि वर पराक्रमाच्या गोष्टी करतोस!! घंट्याचा पराक्रम.”
हा बाण मात्र पॅरिसच्या वर्मी लागला. सदसद्विवेकबुद्धी जागृत होऊन त्याच्या हट्टापायी ट्रॉयला सहन कराव्या लागलेल्या हालांची आठवण झाली आणि काहीच न बोलता तो गप्प बसला.

इथिओपियन योद्धा मेम्नॉनचे शौर्य आणि उच्च नैतिक संस्कार आणि नेस्टॉरपुत्र अँटिलोखसचा मृत्यू

पण त्यानंतर लगेच काही दिवसांतच मेम्नॉन त्याची सेना घेऊन आला. ती सेना लै मोठी होती आणि स्वतः मेम्नॉनदेखील भलादांडगा होता. ट्रॉय शहरात प्रवेश करणार्या इथिओपियन सैनिकांना पाहून ट्रोजनांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रिआमला मेम्नॉन भेटल्यावर हाय-हॅलो झाले अन भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. मेम्नॉनने इथिओपियाहून ट्रॉयकडे येतानाच्या प्रवासाची कहाणी साद्यंत प्रिआमला सांगितली. त्याने पाहिलेल्या विविध देशांची व टोळ्यांची वर्णने, तसेच गाजवलेले पराक्रम ऐकून प्रिआम एकदम सुखावला. त्याने मेम्नॉनला एक वाईन प्यायचा कप भेट दिला आणि म्हणाला, “आयला तू तर लैच जबरी दिसतोयस. ग्रीकांची चटणी उडवशील यात काही शंका नाही.”
मग मेम्नॉनबरोबर सर्व सैन्याला प्रिआमने मेजवानी खिलवली. प्रिआमने दिलेला सुरेख नक्षीवाला कप हातात घेऊन निरखून बघत मेम्नॉन म्हणाला, “उगीच भरमसाट वचने देत बसत नाही आता. मी जरा जेवून झोपायला जातो. जास्त वाईन प्याली आणि जागरण केलं की शरीरातली ताकद नष्ट होते. प्रत्यक्ष लढाईत जे होईल ते खरे. लढाईच निर्णय करेल माझ्या पराक्रमाचा.”

मेम्नॉनचा हा नम्रपणा पाहून प्रिआमला सुखद आश्चर्य वाटले. मेम्नॉन तसा लै संस्कारी होता. “यथेच्छसि तथा कुरु |” असे म्हणून दोघेही आपापल्या शामियान्यात झोपायला गेले. बाकीची सेनाही विश्रांती घ्यायला पांगली.

दुसर्या दिवशी पहाट झाल्याबरोबर सगळे ट्रोजन्स आणि इथिओपियन्स उठले. आन्हिके वगैरे उरकून चिलखते चढवून लढाईला तयार झाले. काळ्या इथिओपियन लोकांमुळे ट्रॉयच्या दरवाजांतून जणू काळे ढगच बाहेर यावेत तसे दिसत होते. ट्रॉयसमोरचे मैदान त्यांनी लगेच भरून गेले.

ते पाहून ग्रीकांना आश्चर्य वाटले. आत्ताच तर कुठं ती अॅमेझॉन राणी मेली होती, आणि इतकी आर्मी कुठून आली? पण थोड्याच वेळात ग्रीकही तयार झाले. ग्रीक सेनेच्या अग्रभागी अकिलीस आपल्या रथात बसून निघाला. लगेच लढाईला तोंड लागले.

ग्रीक अन ट्रोजन लोक एकमेकांवर कोसळू लागले. पण आज पराक्रमाची कमाल केली ती इथिओपियन सेनेने. भालाफेक अन रणगर्जनांनी वातावरण भरून गेले. आज पहिले बळी अकिलीसच्या नावावर होते. थॅलियस आणि मेन्तेस या दोघा ट्रोजन सेनापतींना आणि त्यांच्यासोबत अनेक सैनिकांना त्याने आपल्या भाल्याने हेदिससदनी धाडले. ट्रोजनांची एक फळी अकिलीसच्या हल्ल्यापुढे लगेच कोलमडली.

इकडे मेम्नॉनदेखील फुल्ल फॉर्मात होता. छातीत भाला खुपसून फेरॉन आणि एरेउथस या दोघा ग्रीकांना त्याने ठार मारले. ते पाहून नेस्टॉरपुत्र अँटिलोखस चिडला आणि त्याच्यापुढे आला. अँटिलोखसने नेम धरून मेम्नॉनच्या एका इथिओपियन सहकार्याला ठार मारले. ते पाहून मेम्नॉन अँटिलोखसच्या जवळ आला. एक मोठा धोंडा उचलून अँटिलोखसने मेम्नॉनच्या डोक्यावर आपटला, पण दणकट मजबूत हेल्मेटमुळे मेम्नॉन बचावला. त्याला झाले काहीच नाही, फक्त हेल्मेटला धोंडा आदळून खण्ण्ण्ण्णकन आवाज झाला. मग मेम्नॉनने अतिशय खवळून जाऊन अँटिलोखसच्या छातीत भाला खुपसला आणि त्याला ठार मारले.

आपला मुलगा रणभूमीवर पडल्याचे पाहून नेस्टॉर अतिशय दु:खी झाला. थ्रासीमिदेस नामक आपल्या दुसर्या मुलाला हाकारले, “थ्रासीमिदेस!!! लौकर इकडे ये. तुझा भाऊ पडलाय इकडं, त्याचा बदला घे! नाही आलास तर तू माझा मुलगाच नाहीस!!”

ते ऐकून थ्रासीमिदेस धावत लढाईत पुढे आला. फेरेउस नामक योद्धा त्याच्या मदतीला आला आणि ते दोघे मेम्नॉनचा सामना करायला पुढे गेले. पॉलिम्नियस नामक ट्रोजनाला फेरेउसने मारले, तर लाओमेडॉन नामक ट्रोजनाला थ्रासीमिदेसने लोळवले. सोबत स्वतः वृद्ध नेस्टॉरही मेम्नॉनचा सामना करायला पुढे आला इतक्यात मेम्नॉन त्याला म्हणाला, “हे वृद्ध राजा, तू माझ्यापेक्षा वयाने लै मोठा आहेस. मी तुझ्याबरोबर लढलो तर तो बरोबरीचा सामना तर होणार नाहीच, शिवाय मला लाज वाटेल. मला माझ्या तोडीच्या योद्ध्याशी युद्ध करूदे. अगदी अनिर्वाहपक्ष म्हणून मी तुला मारण्याच्या अगोदर तू मागे जा कसा!” कापाकापी आणि संधिसाधूपणाच्या कहाण्यांनी भरलेल्या या ट्रोजन युद्धात असे सुसंस्कृत क्षण बाकी विरळाच.

मेम्नॉनचे वक्तव्य ऐकून नेस्टॉरने परत जरा टिवटिव केलीच-“माझ्या वयाकडे पाहू नको, अजूनही माझ्यात बराच दम आहे” इ.इ.इ. पण शेवटी थ्रासीमिदेस, फेरेउस आणि इतरांना घेऊन मागे हटला. हेलेस्पाँट खाडीकडे तोंड करून मेम्नॉन आता ग्रीकांची चटणी उडवण्यात मग्न झाला. त्याला हळूहळू लढाईचा ज्वर चढत होता. त्याचे खंदे सहकारी अल्किओनेउस, निखियस, मेनेक्लस, क्लिडॉन, अॅलेक्सिप्पस हेही त्याला समर्थ साथ देत होते. मागे हटता हटता नेस्टॉरने मेनेक्लसला ठार मारले. ते पाहून मेम्नॉन चिडून ग्रीकांचे शिरकाण करू लागला, त्याने ग्रीक सैरावैरा पळू लागले.

शेवटी नेस्टॉरने अकिलीसची मदतीसाठी याचना केली. “अकिलीस, माझ्या पोराला मेम्नॉनने मारला रे!! त्याचं प्रेत कुत्र्यांनी खाण्याअगोदर त्याचा बदला घे.” अँटिलोखस मेला हे ऐकून अकिलीसला लै दु:ख झाले आणि तो इतर ट्रोजनांचा पाठलाग सोडून सरळ मेम्नॉनसमोर आला.

अकिलीस-मेम्नॉन युद्ध, मेम्नॉन मरण पावतो.

अकिलीस विरुद्ध मेम्नॉन ही लढाई अख्ख्या ट्रोजन युद्धात भारी आहे. अतिशय गाजलेल्या हेक्टर-अकिलीस फायटीपेक्षा हिचे वर्णन जबराट आहे. अकिलीसला इतकी टफ फाईट अजून कोणीच दिली नव्हती.

मेम्नॉनने एक भलामोठा धोंडा हातात घेऊन अकिलीसवर फेकला, तो त्याने ढालीवर अडवला. अकिलीसने मेम्नॉनच्या उजव्या खांद्यात भाला खुपसून जखम केली, पण त्यातून लगेच सावरून मेम्नॉनने अकिलीसच्या हाताला भाला भोसकून रक्त काढले! आणि त्यानंतर म्हणाला,”लै बढाई मारत होतास नै रे अकिलीस? तू इथून जित्ता परत जाणार नाहीस, माझ्याकडून मरशील. ट्रोजनांची इतक्या निर्दयपणे कत्तल करून तू काय लै भारी झालास वाटलं काय तुला? मूर्ख कुठला! मीही देवपुत्र आहे. तू आता मरणार हे नक्कीच!”

अकिलीस खवळून उत्तरला, “अरे ए, डोक्यावर पडलायस काय? तुझ्यापेक्षा हजारपटीने भारी आहे मी. मला च्यालेंज देण्याची तुझी हिंमत झालीच कशी? हेक्टरने माझ्या भावाला-पॅट्रोक्लसला मारले तेव्हा त्याचा बदला त्याला मारून मी घेतला. माझा मित्र अँटिलोखसला तू मारलंस, त्याचाही बदला मी नक्कीच घेणार! तुझ्या छातीत मी भाला खुपसणार हे नक्कीच!! पण ते सोड. मूर्ख पोरांसारखं आपण आपल्या वडिलांची कीर्ती आणि खानदानाची माहिती का सांगतोय? काळच ठरवेल काय होईल ते.”
लढाईला पुन्हा तोंड लागले. दोघांनी आपापल्या तलवारी उपसल्या आणि एकमेकांवर झेपावले. दोघांनाही कधी खांद्यांवर, कधी ढालींवर तर कधी छातीवर असे सतत घाव लागत होते.

बराच वेळ त्यांची आपसांत लढाई सुरू होती. कधी दगडधोंडे तर कधी तलवारींनी त्यांचे घणाघाती युद्ध सुरू होते. दोघांनीही मारलेल्या सैनिकांच्या प्रेतांनी पूर्ण रणभूमी भरून गेली. अखेरीस मेम्नॉनच्या बरगडीच्या खालच्या बाजूस अकिलीसची तलवार आत घुसली आणि महापराक्रमी मेम्नॉन कोसळला. त्याचे इथिओपियन सहकारी भयाने गार झाले. मृतांचे चिलखत चोरून मॉर्मिडन सैनिक आणि त्यांच्यासोबत अकिलीस ट्रोजनांवर झेपावले. ट्रोजन पळू लागले. मेम्नॉनचे प्रेत घेऊन इथिओपियन लोकही पळाले.
तोपर्यंत सूर्यास्त झाला होता. मेम्नॉनसाठी त्याचे इथिओपियन सहकारी आणि ट्रोजन्स विलाप करीत होते, तर अँटिलोखससाठी ग्रीकही शोक व्यक्त करीत होते. मेम्नॉनचे थडगे बांधून झाल्यावर इथिओपियन्सही परत गेले असावेत. कवी क्विंटस म्हणतो त्याप्रमाणे त्या विलाप करणार्या सर्वांचे पक्ष्यांत रूपांतर झाले.

अकिलीसचा पॅरिसकडून वध

नेस्टॉरच्या सेनेतले लोक मरण पावलेल्या अँटिलोखससाठी शोक करीत असताना अकिलीस तिथे उभा होता. सूडाच्या भावनेने त्याचे शरीर पेटले होते. तो ट्रोजनांवर झेपावला. सिमोइस आणि खँथस या ट्रॉयच्या दोन्ही बाजूंनी वाहणार्या दोन्ही नद्यांचे पाणी त्याने मारलेल्या माणसांच्या रक्ताने लाल झाले. घाबरून ट्रोजन सैरावैरा पळत सुटले. अगदी तटबंदी व दारांपर्यंत जाऊन त्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. दारांच्या बिजागर्या हलवून खिळखिळ्या करणे आणि आडण्यांवर धडका देण्याचा देखील त्याने सपाटा लावला!! जर त्याने एखादे जरी दार तुटले असते तर अख्ख्या युद्धाचा निकाल तेव्हाच लागला असता, पण ट्रोजनांच्या सुदैवाने तसे काही झाले नाही.

ते पाहून ट्रॉयचा संरक्षक देव अपोलो तिकडे आला आणि अकिलीसला म्हणाला, “ट्रोजनांपासून मागे हट. ते माझ्या संरक्षणाखाली आहेत.”

यावर अकिलीस चिडून उत्तरला,”त्या उर्मट ट्रोजनांचे संरक्षण कशाला करतोस? तू सांगितलंस म्हणून मी काही मागे हटणार नाही. आता गप घरी जा नैतर देव असलास तरी मार खाशील माझ्याकडनं.” आणि तसाच इतर ट्रोजनांचा पाठलाग करू लागला.

यावर अपोलो म्हणाला, “साला हा अकिलीस फारच उर्मट आहे पण डोक्यावर पडलेला आहे. पण हा आता लौकरच मरणारे, त्याला त्यापासून स्वतः झ्यूसही वाचवू शकणार नाही.”

त्यानंतर पॅरिसने लपून अकिलीसच्या घोट्यात बाण मारला. काही व्हर्जन्सप्रमाणे स्वतः अपोलोनेच बाण मारला. ते काही असो, पण अकिलीसला बाण मारणाराने भ्याडपणे लपून बाण मारला होता एवढे नक्की. बाण लागताक्षणी असह्य वेदनेने कळवळत अकिलीस खाली कोसळला. सगळीकडे नजर टाकत, डोळ्यांवाटे आग ओकत ओरडला:
“कोण बाण मारला मला त्यानं पुढं यावं फक्त एकदा. क्षणार्धात भाल्याने त्याची आतडी बाहेर जमिनीवर लोळवतो..समोरासमोर माझ्याशी लढायची कुणाचीही लायकी नाही. सगळे एकजात भित्रट आहेत. बाण मारणार्यानं फक्त पुढे यावं. ऑलिंपस पर्वतावरच्या देवांपैकी कुणी असला तरी चालेल. खरं तर मला शंकाच येतेय की अपोलोनेच माझा घात केलाय. माझ्या आई थेटिसनं सांगितलं ते खरंच होतं तर- ट्रॉयच्या स्कीअन दरवाजासमोर मी दयनीयपणे मरेन म्हणून.”

असे म्हणून त्याने असह्यपणे दुखत असूनही त्याने घोट्यातून बाण उपसून काढला. अकिलीस जखमी झाला तरी भीतीने ट्रोजन्स त्याच्या जवळ यायला घाबरत होते. तसाच तो पुन्हा उठून उभा राहिला आणि हळूहळू अंगात भिनलेल्या विषामुळे सामर्थ्य कमी कमी होत असतानाही त्याने भाला फेकून ऑरिथाऑन नामक ट्रोजनाच्या कपाळात भाला खुपसून त्याच्या मेंदूचे तुकडेतुकडे केले. हिप्पोनूस नामक ट्रोजनाच्या भुवईखाली भाला खुपसून आतपर्यंत आरपार नेला. डोळ्यांची बुबुळे जमिनीवर कोसळून हिप्पोनूस हेदिसघरी गेला. अल्काथूस नामक ट्रोजनाची जीभ दुभंगून जबड्यात भाला खुपसून त्याला ठार मारले. भाला शेवटी त्याच्या कानातून बाहेर डोकावू लागला.

लै ट्रोजन्स अकिलीसच्या अंगावर धावून आले. जितके चढाई करून आले त्यांपैकी बर्याच जणांना तर त्याने मारलेच, शिवाय पळून जाणार्यांपैकीही अनेकांना कंठस्नान घातले.
पण शेवटी त्याचे शरीर थंड पडू लागले. तरीही भाल्याचा आधार घेत त्याने गर्जना केली, “ट्रोजन भित्रटांनो, मेल्यानंतरही माझ्या भाल्यापासून तुमची सुटका नाही. या विनाशाची किंमत तुम्हांला पुरेपूर चुकती करावी लागेल!!!”

हे ऐकून अकिलीस अजूनही फिट आहे असे वाटून ट्रोजन्स घाबरले. शेवटी एखाद्या पर्वताचा कडा जमिनीवर आदळावा तसा अकिलीस जमिनीवर कोसळला आणि गतप्राण झाला. तो मेल्यावरही आत्यंतिक भीतीपोटी एखादा सिंह मेल्यावर जशी मेंढरे इ. जवळ येत नाहीत तसेच ट्रोजन सैनिकही त्याच्या जवळ येत नव्हते.

अकिलीस पायात बाण लागून कसा मेला याबद्दलची सर्वांत प्रसिद्ध कथा म्हणजे त्याची आई थेटिसने लहानपणी त्याला स्टिक्स नामक नदीत बुडवले होते-फक्त टाचा-घोटे वगळता- त्यामुळे त्याचे अख्खे शरीर अभेद्य झाले होते. फक्त टाच हा एकच कमकुवत भाग राहिला होता. तस्मात एखाद्या गोष्टीचा/माणसाचा एकच पण घातक ठरणारा वीक पॉइंट असेल तर त्याला ‘अकिलीस हील’ असे म्हणावयाचा प्रघात आहे. हा वाक्प्रचार इंग्लिशमध्ये प्रसिद्ध आहे.

Advertisements
This entry was posted in इतिहास-इतर जग, ग्रीस. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s