ट्रोजन युद्ध भाग ३.२- अकिलीसच्या शवाभोवतीची लढाई, अंत्यविधी व फ्यूनरल गेम्स. जजमेंट ऑफ आर्म्स आणि थोरल्या अजॅक्सची आत्महत्या.

अकिलीसच्या शवाभोवतीची तुंबळ लढाई- थोरल्या अजॅक्सचा महापराक्रम आणि ओडीसिअसची समर्थ साथ.

अकिलीस मृतावस्थेत पडला तरी ट्रोजन सैनिक घाबरून त्याच्या जवळ येत नव्हते. पण मग पॅरिसने त्यांना ओरडून धीर दिला, “आजवर ट्रॉयचे अन ट्रोजन लोकांचे सर्वांत जास्त नुकसान करणारा अकिलीस अखेर एकदाचा मेला! कुत्रीगिधाडे खातील त्याला फाडून. आज एकतर लढाईत जिंकू किंवा मरू. अकिलीसला हेक्टरच्याच रथाला बांधून नेऊ फरपटत, मग ट्रोजन बायका येऊन त्याला फुल शिव्या घालतील. माझा बाप म्हातारा राजा प्रिआम आणि बाकीची शीनियर मंडळीदेखील खूप आनंदित होतील. तेव्हा चला, याचे प्रेत नेऊ ट्रॉयमध्ये.”

हे ऐकल्यावर ट्रोजनांना जरा हुरूप आला आणि ग्लॉकस, आगेनॉर, एनिअस या ट्रोजन सेनापतींनी अकिलीसच्या शवाला गराडा घातला. पण अकिलीसचा चुलतभाऊ थोरला सांड अजॅक्स अकिलीसच्या डेड बॉडीची इज्जत राखायला पुढे आला. कुणालाही क्षणभराची उसंत घेऊ देईना. आपली सात थर कातडी अन आठवा थर ब्राँझचा असलेली भलीथोरली ढाल आणि लांब भाला घेऊन त्याने फुल्ल कापाकापी सुरू केली. आपल्या पोळ्याभोवती कुणी माणूस आला तर त्याला चहूबाजूंनी नांग्या मारून हैराण करावे तसे ट्रोजन्स अजॅक्सला भिडू लागले आणि त्या माणसाने माश्यांची पर्वा न करता त्यांचे पोळे कापून त्यातून मध काढावा तसा अजॅक्स एकेका ट्रोजनाला ठार मारू लागला. त्याने पराक्रमाचा सपाटा लावला होता. आगेलाउस नामक ट्रोजनाला छातीत भाला खुपसून त्याने ठार मारले. त्यानंतर थेस्टॉर, ऑकिथूस, आगेस्ट्रॅटस, आगानिप्पस, झोरस, नेस्सस, एरिमास यांना एकापाठोपाठ एक हेदिससदनी पाठवले. एरिमासला मारल्यावर ग्लॉकस चिडला, कारण तो त्याचा सहकारी होता. त्याने अजॅवर नेम धरून भाल्याचा वार केला. अजॅक्सची ढाल भेदून भाला आरपार गेला पण अम्गातल्या चिलखतामुळे त्याला काही झाले नाही. मग ग्लॉकसने त्याला शिव्या घातल्या, “स्वतःला लै मोठा समजतोस काय रे आँ? पण आज तू माझ्या हातून मरणार एवढे नक्की!!!”

त्यावर अजॅक्सनेही शाब्दिक वाराची यथास्थित परतफेड केली,” अरे फाटक्या, तुझी लायकी ती काय आणि माझ्याशी असं बोलतोस!!!तो हेक्टर तुझा बाप होता त्यालाही मी आटपलो नाही. डायोमीडच्याही बरोबरीने मी लढलोय. तू म्हणजे किस झाडकी पत्ती! अकिलीसच्या शवाभोवती माश्यांसारखे पडलेल्या ट्रोजनांतच तूही आता जमा होशील. मी काही तुला जिवंत सोडणार नाही.”

असे म्हणून अजॅक्सने भाल्याने ग्लॉकसचा प्राण घेतला. अकिलीसच्या शवाभोवतीची ट्रोजनांची गर्दी जरा मागे हटली. ग्लॉकस पडल्याचे पाहून एनिअस नव्या दमाच्या सेनेसकट तिथे आला. पण युद्धात अजॅक्सने एनिअसच्या उजव्या हातातून भाला आरपार खुपसला. असह्य वेदनेने कळवळत एनिअस लढाईतून मागे हटला. त्याच्या जखमेला जळवा लावून उपचार केले गेले.

वीज चमकावी तसा अजॅक्स भाला शत्रूच्या अंगांगांत खुपसत होता. आता त्याच्या मदतीला इथाकानरेश ओडीसिअसदेखील आला. दोघे खुंदल खुंदल के लढाई करू लागले. मायनालुस, अॅटिम्नियस आणि प्रोटियस या तिघा ट्रोजनांना ओडीसिअसने एकमेकांलगतच लोळवले. अल्कॉन नामक ट्रोजनाने ओडीसिअसच्या उजव्या गुडघ्याजवळ भाला खुपसून रक्त काढले खरे, पण त्या जखमेची पर्वा न करता ओडीसिअसने तसेच अल्कॉनची ढाल भेदून आरपार भाला खुपसून त्याला ठार मारले.

जखमा होऊनही दिसणारा ओडीसिअसचा पराक्रम पाहून इथाकाहून आलेले ग्रीक सैनिकही पुढे झाले. अकिलीस आणि अजॅक्स यांच्या शौर्यामुळे तेही त्या दोघांप्रति एकदम एकनिष्ठ होते. ट्रोजनांची चटणी उडवू लागले. ट्रोजन सैन्यात हलकल्लोळ उडलेला पाहताच थोरल्या अजॅक्सवर बाण मारावा म्हणून पॅरिस बाण लावून आपल्या धनुष्याची प्रत्यंचा ताणून सोडणार इतक्यात अजॅक्सने चपळाई करून एकदम शिताफीने एक भलाथोरला धोंडा सरळ पॅरिसच्या डोक्यावर नीट नेम धरून फेकला. नेम अचूक लागला. पॅरिसला कळायचं बंद झालं. त्याच्या डोळ्यांपुढे एकदम अंधारी आली आणि तो जागीच कोसळला. हातातून धनुष्य खाली पडले, बाणांचा भाताही मोकळा झाला, त्यातले बाण इतस्ततः पडले. मरायचाच, पण थोडक्यात वाचला हेल्मेटमुळे. पॅरिसला बाकी ट्रोजनांनी तत्परतेने मागे नेले म्हणून वाचला, नैतर उससे तो ना हो पाता ये सब.
ते पाहून अजॅक्स रागाने म्हणाला, “कुत्र्या, मरण्यापासून आज वाचलास तू!!पण लौकरच कुणा ग्रीक योद्ध्याकडून तुझे मरण निश्चित आहे. मीच मारला असता आत्ता तुला, पण अकिलीसच्या शवाची अब्रू कायम राखण्याचं महत्त्वाचं काम आहे मला.”

अजॅक्सच्या आवेशाला घाबरून ट्रोजन सैन्य पळत सुटले. पार ट्रॉयपर्यंत गेले तेव्हा त्यांचा पाठलाग करण्याचा नाद त्याने सोडून दिला आणि मृतदेहांनी खचाखच भरलेले मैदान तुडवत तो परत आला. इतकी प्रेते मैदानभर पडली होती, की येताना एकदाही त्याच्या पायाचा स्पर्श जमिनीला झाला नाही!

अखेरीस अकिलीसचे पार्थिव त्याच्या शामियान्यात परत आणले गेले.

अकिलीसचा अंत्यविधी.

(अकिलीसच्या थडग्यासमोर अलेक्झांडर)

अख्खे मॉर्मिडन सैन्य आणि अन्य ग्रीक राजेमहाराजे त्याच्या शवाभोवती विलाप करू लागले. साहजिकच होतं म्हणा ते. गेल्या दहा वर्षांत ११ शहरे आणि १२ बेटे ग्रीकांच्या ताब्यात आणून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणारा, नवव्या वर्षाच्या शेवटी ग्रीक सैन्य उठाव करून परत जाण्याच्या बेतात असताना त्यांचे मन वळवणारा, जिवाला जीव देणारा आणि लढाईत देवांनाही न आटपणारा असा हा ट्रोजनांचा कर्दनकाळ हेदिसच्या घरी कायमचा निघून गेल्यावर आयत्यावेळी ब्रह्मास्त्र विसरलेल्या कर्णासारखीच ग्रीकांची अवस्था झाली होती. “आता आपलं काही खरं नाही, ट्रोजनांकडून आपण मारले जाऊ” या विचाराने ग्रीक अजूनच हमसून हमसून रडत होते. समुद्रापलीकडे असलेल्या आपल्या बायकापोरांची आठवण येऊन त्या शोकाला अजूनच उठाव मिळत होता.

सर्व मॉर्मिडन सैनिक रडत होते. अजॅक्स आणि शीनियर मॉर्मिडन सेनापती फीनिक्स या दोघांनी मुक्तकंठाने विलाप केला. पाठोपाठ आगामेम्नॉनही एकदम ब्रेकडाऊन झाला तेव्हा पुत्रवधाचे दु:ख वागवत असलेल्या शहाण्या नेस्टॉरने त्याला समज दिली, “बाबारे, शोक तर आपण नंतरही यथावकाश करूच. अगोदर अकिलीसच्या शवाला नीट आंघोळ घाला. प्रेताला असं कितीवेळ सडवणार?”

मग मॉर्मिडन लोकांनी अकिलिसची डेड बॉडी नीट स्वच्छ केली. सगळे रक्त आणि जखमा नीट धुवून काढल्या आणि नवीन पोषाख घातला.अकिलीसने युद्धात मिळवलेली आणि अकिलीस व आगामेम्नॉन यांमधील युद्धास कारण ठरलेली ब्रिसीसही इतर गुलाम स्त्रियांसह शोक करू लागली, कारण अकिलीस तिला गुलामासारखे वागवत नव्हता, तर उलट पत्नीचा दर्जा दिला होता.ब्रिसीसने शोकापायी आपल्या छातीला नखाने लाल होईस्तवर ओरखडे काढले.

त्यानंतर समुद्रातून अन्य अप्सरांसह अकिलीसची अमर आई थेटिस आली आणि शोक करू लागली. “माझी इच्छा नसतानाही एका मर्त्य मानवाशी माझं लग्न लावून दिलं. ते एक असोच, पण पेलिअसदेखील आता बघता बघता म्हातारा झाला. पण त्याच्यापेक्षाही अकिलीसचं दु:ख मला जास्त वाटतं. माझ्या मुलाची कीर्ती दिगंतात पोचेल असं झ्यूसनं वचन दिलं होतं ते पाळलं, पण त्याचं आयुष्य अगदीच कमी ठेवलं!!!!”

थेटिस असा विलाप करीत असताना कॅलिप्सो नामक दुसर्या एका अप्सरेने तिला धीर दिला, “बाई गं, धीर धर. अगं मी अमर असले तरी माझाही मुलगा मेलाच की. त्याचं दु:ख मी आजवर वागवतेय. आणि काळजी करू नकोस, ट्रोजन्स आता थोड्या दिवसांतच नष्ट होतील.”
असे नानापरीचे समजुतीचे बोल अप्सरा एकमेकींना ऐकवीत होत्या. त्यातच रात्र झाली आणि सर्व ग्रीक झोपी गेले, पण थेटिस जागीच होती. साहजिकच आहे म्हणा, मुलगा मेल्यावर कुठली आई स्वस्थ बसू शकेल?

दुसर्या दिवशी सकाळी ग्रीक लोक उठले आणि आन्हिके आटपून जवळच्या इडा पर्वताहून लाकूडफाटा आणण्याच्या कामाला लागले. स्वतः आगामेम्नॉन आणि मेनेलॉस या खाशांचे हुकूम होते की भरपुर लाकूडफाटा आणा-जेणेकरून अकिलीसच्या पार्थिवाचे लौकर दहन होईल-आणि तोही जल्द अज जल्द. तो सर्व लाकूडफाटा आणला. चितेच्या मध्यभागी अकिलीस, सभोवती कामी आलेल्या अनेक योद्ध्यांचे चिलखत ठेवले. त्यांवर अनेक ट्रोजन योद्ध्यांचा आणि त्यांसोबत अनेक घोड्यांचाही बळी दिला गेला. शिवाय बळी दिलेले अनेक बैल, मेंढ्या व डुकरे हेही बाजूस मांडण्यात आले.गुलाम स्त्रियांनी अनेक कपडे आणले, तसेच सोने व अॅंबरपासून बनलेले अनेक बहुमोल दागदागिने व रत्ने ठेवण्यात आली. स्वतः ब्रिसीसने अकिलीसच्या पार्थिवावर काही सदरे ठेवले. मॉर्मिडन प्रथेप्रमाणे पॅट्रोक्लसच्या वेळेस जसे आपापल्या केसांची एक बट कापून प्रेतावर ठेवण्यात आली, तसेच याही वेळेस प्रत्येक मॉर्मिडन सैनिक व कमांडर लोकांनी आपापले केस भादरून अकिलीसच्या प्रेतावर ठेवले. ब्रिसीसनेही आपल्या केसांच्या बटा त्या पार्थिवावर ठेवल्या. शिवाय तेलाचे अनेक बुधले त्यावर ओतण्यात आले. त्यासोबतच अनेक जार भरून मध, वाईन आणि शिवाय सुगंधी वासाची द्रव्येही ओतली गेली.
अशा जय्यत तयारीनंतर स्वतः झ्यूसदेवाने अकिलीसवर ऑलिंपस पर्वतावरून अँब्रोशिया ऊर्फ अमृत ओतले आणि उत्तर व पश्चिमेच्या वार्यांना अकिलीसच्या चितेवर वाहण्याची आज्ञा केली. स्वतः झ्यूसच्या आज्ञेनुसार मग अकिलीसची चिता धडाधडा पेटू लागली.

जेव्हा अखेरीस अग्नीने सर्व आहुतींचा घास घेतला, तेव्हा मग उरलेल्या हाडांवर वाईन टाकून मॉर्मिडन लोकांनी ती विझवली. चितेच्या मध्यभागी असलेली अकिलीसची हाडे ओळखण्यात त्यांना काहीच अडचण आली नाही. एखाद्या राक्षसासारखी मोठी होती आकाराने. मॉर्मिडन लोकांनी सर्व हाडे ताब्यात घेतली आणि मध व गायींची चरबी त्यांभोवती ठेवली. पॅट्रोक्लसच्या अस्थी ज्या बरणीत होत्या त्याच बरणीत अकिलीसची हाडेदेखील ठेवण्यात आली आणि दहनस्थळी एकदम एका टोकाला त्यावर एक चबुतरा उभारण्यात आला.

इकडे अकिलीसच्या रथाचे अमर घोडेदेखील मालकासाठी झुरत होते. पण त्यांना आता मर्त्यलोकात थोडे दिवसच काम होते. ते झालं की परत देवलोकात त्यांची रवानगी होणारच होती.नंतर समुद्रातून वरुणदेव पोसायडन वरती आला आणि त्याने थेटिसला पुन्हा दिलासा दिला. त्याने समाधान पावून थेटिस आपल्या अप्सरा मैत्रिणींसोबत पुन्हा समुद्रतळाशी निघून गेली. पोसायडनसुद्धा अदृश्य झाला आणि शोक करत ग्रीक सैन्य पुन्हा जहाजांपाशी आले.

अकिलीसचे फ्यूनरल गेम्स.

यथावकाश रात्र झाली अन सर्वजण झोपून गेले. दुसर्या दिवशी सकाळी ग्रीक सैन्य तयार झाले तेव्हा डायोमीड सर्वांना उद्देशून म्हणाला, “ग्रीकहो, अकिलीस मेला म्हणून आपल्या लढण्यात कसलीही उणीव शत्रूला दिसता कामा नये. चिलखत,शस्त्रे,रथ-सगळं घेऊन या, विजयश्री आपली वाट पाहतेय!”

यावर थोरला अजॅक्स म्हणाला, “डायोमीड, तू म्हणतोस ते सोळा आणे सच आहे. लढलं तर पाहिजेच. पण रीतिरिवाज भी तो एक चीज है! अकिलीस परवापरवाच मेला, त्याचे फ्यूनरल गेम्स खेळण्याची वेळ झालीये आता. अकिलीसची आई थेटिस स्वतः मला म्हणाली की ती इथे येऊन जातीने जिंकणार्यांना बक्षिसे देणारे म्हणून.”

डायोमीडने याला रुकार दिल्यावर समुद्रातून थेटिस आली. सर्व योद्ध्यांमध्ये तिने तिच्याकडच्या भेटवस्तू मांडल्या आणि ग्रीकांमधील व्हॉलंटियर लोकांना पाचारण केले. तिचे स्वागत करायला वृद्ध नेस्टॉर पुढे आला.

नेस्टॉर वृद्ध असल्याने पळापळी किंवा भोसकाभोसकी करू शकत नसे, पण योग्य वेळी योग्य सल्ले देण्यात त्याचा कुणीच हात धरत नसे. स्वतः आगामेम्नॉनसुद्धा त्याचा प्रचंड आदर करीत असे. तो सभेत गाणे गाऊ लागला.

“देवी थेटिस दिली झ्यूसदेवाने | त्या राजा पेलिअसाला |
खाल्ली मेजवानी देवांनी | आनंद मोठा सगळा झाला |
पुत्र झाला महान तिला | म्हणती लोक पाहू अकिलीसाला |
बारा शहरे नष्टवी ऐसा | आहे कुणी त्याच्या तोडिला रं जी जी रं जी ||
अॅस्टेरोपायुस स्येनुस आणिक | पॉलिडोरस, ट्रॉयलस लियाकॉनाला |
मारले झडकरी शत्रु अनेक | लाल केले खँथस नदिला |
मारि हेक्टर पॅट्रोक्लसाला | चढे घोडियानिशी वधले त्याला |
पेन्थेसिलिआ ये, मेम्नॉनहि आला | मारि तल्वार, फेकुनि भाला |
ऐक थेटिस देवी नीट | गातो अकिलीसाला जी रं जी जी ||
महाचपळ जैसी वीज | ग्रीकलोकीं अन्य कवण न तेज |
अतुर्बळी जैसा झ्यूस | शत्रुतोंडा आणी फेस |
रथ हाकी अकिलीस जैसा | अपर न करू धजावे तैसा |
नेलियसाचा नेस्टॉर गाई | अकिलीसकवना, आइक त्याचे आई ||”

नेस्टॉरच्या चपखल शब्दयोजनेमुळे सर्व ग्रीक भारावून गेले आणि स्वतः थेटिसने खूष होऊन नेस्टॉरला अकिलीसच्या रथाचे घोडे भेट दिले. शुक्रिया शुक्रिया म्हणत नेस्टॉर हळूहळू आपल्या जागेवर जाऊन बसला.

आता फ्यूनरल गेम्सचे इव्हेंट जाहीर झाले. पहिला इव्हेंट होता रनिंग रेसचा. थेटिसने रेस जिंकणार्याला दहा गायी तर सहभागी झालेल्या प्रत्येकाला एक वासरू असे बक्षीस जाहीर केले. ही गुरे स्वतः अकिलीसने इडा पर्वतावर ट्रोजनांच्या हातून हिसकून आणली होती.

थोरला अजॅक्स, त्याचा भाऊ ट्यूसर आणि धाकटा अजॅक्स हे तिघे रनिंग रेससाठी तयार झाले. आगामेम्नॉनने त्यांना रेसचा अंतिम फिनिशिंग पॉइंट दाखवला. मुख्य चुरस होती धाकटा अजॅक्स आणि ट्यूसर यांच्यामध्ये. रेस सुरू झाल्यावर कधी ट्यूसरचे चाहते त्याला चीअर करत होते, तर कधी धाकट्या अजॅक्सचे सपोर्टर त्याला चीअर करत होते. पण धावता धावता मध्येच ट्यूसरचा पाय एका झुडुपात अडकला आणि घोट्याला जखम झाली. शिरा तटाटून रक्त आले. असह्य वेदनेने तो खाली कोसळला. त्याचा चीत्कार ऐकून त्याचे मित्र धावत धावत तिथे आले आणि त्यांनी त्याला बाजूला नेले. जळवा लावून उपचार करण्यात आले. त्यानंतर काही औषधी उटणी लावून मग पोटीस बांधले गेले आणि त्याचे दुखणे जरा कमी झाला. इकडे धाकटा अजॅक्स तराट पळतच होता. रेस अपेक्षेप्रमाणे तोच जिंकला आणि बक्षीसादाखलच्या दहा गायी घेऊन आपल्या शामियान्याकडे गेला.

आता पुढचा इव्हेंट होता कुस्ती!!! शड्डू ठोकत तरुण आर्गिव्ह पैलवान डायोमीड आणि यवनकेसरी थोरले अजॅक्सअण्णा सलामीकर हे दोघे मैदानात आले.मैदानात आल्याबरोबर लगेच कुस्तीला तोंड लागले. बराच वेळ कोणीच कुणाला आटपेना. मग अखेरीस अजॅक्सने डायोमीडच्या शरीराभोवती आपली वज्रमिठी घातली. पण त्या विळख्यातून डायोमीड लगेच सुटला. त्याने आपली मांडी अजॅक्सच्या खाली ठेवून त्याला उचलले. जरा वर उचलून मग आडवे केले आणि खांद्याला एक झटका देऊन अजॅक्सला बाजूस फेकले आणि त्यासोबत स्वतःही खाली पडला. ग्रीकांमध्ये एकच चीत्कार उठला. पण अजॅक्स चिडला आणि त्याने डायोमीडला परत गर्जना करून आव्हान दिले आणि ते दोघेही पुन्हा एकमेकांना भिडले. एकमेकांना कधी ढकलताहेत, कधी उचलू पाहताहेत, पण कोणीच कुणाला आटपेना. डायोमीड अजॅक्सच्या मांड्या उचलून त्याला फेकू पाहत होता, तर अजॅक्स आपल्या वजनाचा वापर करून रेटू पाहत होता. डायोमीडला त्याने कधी उजवीकडे, तर कधी डावीकडे गरगरा फिरवले. लोक कधी अजॅक्सच्या नावाचा, तर कधी डायोमीडच्या नावाचा जयजयकार करीत होते. अखेर एकदाचा डायोमीड खोपचीत घावल्याबरोब्बर अजॅक्सने त्याच्या कमरेला विळखा घालून उचलले आणि एखादा दगड फेकावा तसे सरळ जोरात फेकून दिले. एकदम घाप्पकन आवाज झाला. तरी डायोमीड लगेच उठून उभा राहिला आणि ते तिसर्यांदा भिडणार एवढ्यात नेस्टॉर म्हणाला, “लोकहो थांबा. आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही किती भारी आहात ते. उगीच ताकद वाया घालवू नका.”

मग दोघेही थांबले. त्यांनी आपापल्या कपाळीचा घाम पुसला आणि एकमेकांचे एक चुंबन घेतले. मग थेटिसने त्या दोघांना प्रत्येकी दोन अशा चार बायका भेट दिल्या. त्या चारही बायका सुंदर होत्या. त्यांच्याकडे दोघेही क्षणभर पाहातच राहिले. अकिलीसने लेस्बॉस बेटावर हल्ला केला होता तेव्हा तिकडून त्या पकडून आणल्या होत्या. त्यांना घेऊन दोघेही आपापल्या जहाजांकडे निघून गेले.

पुढचा इव्हेंट होता बॉक्सिंग!! क्रीटाधिपती इडोमेनियस उभा राहिला. बॉक्सिंगकलेत त्याचे प्रावीण्य सगळ्यांना ठाऊक असल्याने त्याला आव्हान द्यायला कोणीच उभे राहिले नाही. कोणीच च्यालेंज देईना म्हटल्यावर थेटिसने त्याला पॅट्रोक्लसचा रथ आणि घोडे भेट दिले. तेव्हा मॉर्मिडन कमांडर फीनिक्स म्हणाला,”ग्रीकहो, इडोमेनियस बॉक्सिंगमध्ये जगातभारी आहेच. त्यासाठी त्याला बक्षीस मिळालं हे ठीकच झालं, पण तुम्हा तरुण पोरांसाठी बॉक्सिंगचे अजून एक बक्षीस आहे. या पुढं! अकिलीसच्या आत्म्याला जरा बरं वाटू दे!”

तरीही कोणी पुढे येईना म्हटल्यावर नेस्टॉर उभा राहिला आणि शिव्या घालू लागला, “च्यायचे भित्रे साले! आजकालची तरुण पोरं ही अशीच! मी तरुण असताना काय बॉक्सिंग खेळायचो, एकदा एकाला सर्रळ आडवा केला होता बुक्क्या मारमारून!! अरे कुणाच्यात काही दम आहे की नाही??????”

त्या शिव्यांचा परिणाम होऊन एकजण पुढे आला. त्याचे नाव एपियस. हा प्राणी पॅट्रोक्लसच्या फ्यूनरल गेम्सच्या वेळीही लढला होता बॉक्सिंगमध्येच. तो पुढेही येणार आहे. यानेच तो विख्यात ‘ट्रोजन हॉर्स’ बनवला होता. हाही विना आव्हानाचे बक्षीस घेऊन जाणार एवढ्यात अकॅमस नामक ग्रीक योद्धा त्याला च्यालेंज म्हणून उभा राहिला. बॉक्सिंगला लगेच तोंड फुटले. दोघेही एकमेकांना तुल्यबळ होते. बॉक्सिंग जोरात सुरु झाले. त्यांची अंगे घामाने, तर तोंडे रक्ताने निथळत होती. बैलाच्या कातड्याचे ग्लोव्ह्ज घालून दोघेही एकदम कुतून ठोसे मारत होते. घाम आणि रक्त मिसळून गालांना एक वेगळाच केशरट रंग प्राप्त झाला होता. अकॅमसने एपियसच्या भुवईजवळ पार हाडापर्यंत जाईल इतक्या जोरात एक ठोसा मारला. त्याला प्रत्युत्तर म्हणून एपियसनेही अकॅमसच्या कपाळावर ताकदीने एक ठोसा दिला. त्याच्या आघाताने तो जमिनीवर पडला.तरी अकॅमस लगेच उठला आणि त्याने एपियसला डोक्यावर एक ठोसा दिला. नंतर एपियसने आपल्या डाव्या हाताचा ठोसा सरळ भुवईवर, तर उजव्या हाताचा ठोसा अगदी जीव खाऊन नाकावर मारला. अकॅमस सटपटला, पण तरीही सावरून लढू लागला. पण एकूण रागरंग पाहून ग्रीक ओरडू लागले बास करा म्हणून. मग त्यांनी हातमोजे काढले, घाम टिपला आणि एकमेकांचे एक चुंबन घेऊन लढाई संपवली. थेटिसने त्यांना प्रत्येकाला एक चांदीचे मोठे भांडे भेट दिले आणि पॉदालिरियस नामक वैद्याने त्या दोघांवर उपचार केले.

नंतरचा इव्हेंट होता धनुर्विद्येचा. धाकटा अजॅक्स आणि थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ ट्यूसर हे दोघे उभे राहिले. मायसीनीराज आगामेम्नॉनने दूरवर एक हेल्मेट ठेवले आणि त्यात पिसे खोवून ठेवली. जो बाण मारून फक्त पिसांचा वेध घेऊन त्यांना हेल्मेटपासून वेगळे करेल तो जिंकेल असा साधा हिशेब होता. पहिल्यांदा धाकटा अजॅक्स सज्ज झाला. त्याने बाण मारला पण तो हेल्मेटला लागून ब्राँझचा टण्णकन आवाज झाला. मग ट्यूसरने बाण मारला तो बरोब्बर पिसाचा वेध घेऊन पलीकडे गेला. बक्षीस म्हणून थेटिसने त्याला प्रिआमपुत्र ट्रॉइलसचे चिलखत भेट दिले.

पुढच्या इव्हेंटमध्ये लोखंडाचा एक मोठ्ठा दांडा दूरवर फेकायची स्पर्धा होती. बर्याच लोकांनी प्रयत्न केला-पण फेकणे तर दूरच, कोणीही तो दांडा धड उचलूही शकले नाही. थोरला अजॅक्स मात्र पुढे आला, आणि लीलया तो दांडा आपल्या हातात पेलून त्याने दूरवर भिरकावला. मग थेटिसने त्याला अकिलीसने मारलेल्या मेम्नॉनचे चिलखत भेट दिले. ते चिलखत पाहून अन्य ग्रीकांनी आश्चर्य व्यक्त केले. मेम्नॉन स्वतःदेखील एकदम सांड होता. त्याच्या चिलखताचा साईझ अजॅक्स सोडून अजून कुणालाच आला नसता. अजॅक्सने ते चिलखत पाहिले आणि आनंदाने हसला. जणू त्याच्यासाठीच बनवले असावे असे वाटण्याइतपत ते त्याला फिट होत होते. ते चिलखत आणि तो दांडा दोन्हीही घेऊन अजॅक्स आपल्या जहाजापाशी गेला.

अजूनही बरेच इव्हेंट बाकी होते. लांब उडीच्या स्पर्धेत आगापेनॉर हा ग्रीक पहिला आला. थेटिसने त्याला सिक्नस नामक योद्ध्याचे कवच भेट दिले.

नंतर छोटा भाला ऊर्फ जॅव्हेलिन फेकण्याच्या स्पर्धेत युरिआलसने भाला इतरांपेक्षा लैच लांब फेकला. लोक म्हणू लागले, की कुणी धनुर्धारी इतक्या लांबवर बाणही फेकू शकणार नाही तितक्या लांबवर युरिआलस भाला फेकतो. मग थेटिसने त्याला चांदीचे बनलेले एक तेलाचे भांडे भेट दिले.

पुढे थोरला अजॅक्स उठून उभा राहिला, “हाय का कोण माझ्याशी कुस्ती खेळणार?” पण कोणीच पुढे आले नाही. अजॅक्सचे टरारून फुगलेले स्नायू पाहूनच लोकांना कळायचं बंद झालं. तरी लोक युरिआलसच्या नावाने चीअर करू लागले, पण युरिआलस म्हणाला, “बाकी कोणीही असता तरी ठीक होतं, पण अजॅक्सबरोबर मी लढू शकत नाही. मला जिवंत रहायचंय की बे शेवटी!!”

हे ऐकून लोक मोठ्याने हसले आणि अजॅक्सच्या अंगावर मूठभर मांस चढले. कोणीच आव्हान न दिल्याने थेटिसने त्याला दोन टॅलेंट भरून चांदी दिली. ती घेऊन तो जात असताना त्याच्या उंच्यापुर्या आकृतीकडे पाहून तिला क्षणभर अकिलीसची आठवण झाली आणि तिने एक हुंदका दिला.

पुढचा इव्हेंट होता रथांच्या शर्यतीचा. मेनेलॉस, पॉलिपोएतेस,युरिपिलस, युमेलस, थोआस हे लोक पुढे आले. रेडी-स्टेडी-गो चा नारा झाल्यावर रथांतून जे सुसाट सुटले की त्या उठलेल्या धुळीपुढे कुणालाच काही दिसेना. जणू उडावे तसे त्यांच्या रथांचे घोडे पळत होते. शर्यतीत मेनेलॉस पहिला आल्याबद्दल थेटिसने त्याला एक सोन्याचा कप दिला. थोआस आणि युरिपिलस हे शर्यतीच्या दरम्यान रथावरून पडून त्यांना जखमा झाल्या होत्या त्यांवर वैद्यबुवा पॉदालिरियसने उपचार केले.

रथांच्या शर्यतीनंतर आता एकेकट्याने घोड्यावर बसून करायच्या रेसचा इव्हेंट होता. स्थेनेलस, इतर काही जण आणि खुद्द यवनराज आगामेम्नॉन हे त्यात भाग घेऊन प्रचंड वेगाने दौडू लागले. प्रत्येकाच्या हातात चाबूक होता. लोक कधी “स्थेनेलस! स्थेनेलस!” तर कधी “आगामेम्नॉन! आगामेम्नॉन!” असे ओरडू लागले. स्थेनेलसचा घोडा बहुतेक रेस जिंकलाच असता, पण त्याला रेस ट्रॅकचा परिसर तितकासा परिचित नसल्याने तो मार्गापासून भरकटला. मग आगामेम्नॉनने रेस पूर्ण केली आणि तो पहिला आला. पण तरी शेवटीशेवटी स्थेनेलसने घोडा असा दामटवला की तो चक्क दुसरा आला!! तरी तो जरा खट्टूच होता, पहिला नंबर आला नसल्यामुळे. लोकांनी आगामेम्नॉनसोबतच स्थेनेलसचीही तोंडभरून स्तुती केली. मग थेटिसने आगामेम्नॉनला पॉलिडोरसचे चांदीचे चिलखत दिले, तर स्थेनेलसला अॅस्टेरोपाइउसचे जड हेल्मेट, दोन भाले आणि लेग-गार्ड दिले. इतर सर्वांनाही अनेक तर्हेच्या भेटी तिने दिल्या. इकडे अकिलीसचे प्रेत ट्रोजनांपासून वाचवताना झालेल्या जखमेमुळे या स्पर्धांत भाग घेता येत नसल्याने ओडीसिअस मात्र खट्टू होऊन हे सर्व पाहत होता.

जजमेंट ऑफ आर्म्स- अजॅक्स व ओडीसिअसची बाचाबाची, अकिलीसची शस्त्रे ओडीसिअसला मिळतात.

आता अकिलीसच्या स्मरणार्थ फ्यूनरल गेम्स खेळून झालेच होते. आता राहिले होते ते म्हणजे त्याच्या शस्त्रांचे वाटप. ग्रीक विश्वकर्मा असलेल्या व्हल्कन ऊर्फ हेफायस्टस देवाने बनवलेली ती जबरी ढाल, तलवार, भाला आणि कवच सर्व ग्रीकांना दिसतील अशी ठेवल्यानंतर अकिलीसची आई थेटिस म्हणाली, “अकिलीसच्या प्रेताची विटंबना रोखण्यात ज्या ग्रीकाने सर्वांत जास्ती पराक्रम गाजवला त्याने पुढे यावे! त्यालाच ही शस्त्रास्त्रे बक्षीस म्हणून मिळतील.”

असे म्हटल्याबरोबर थोरला अजॅक्स आणि इथाकानरेश ओडीसिअस हे दोघेही उठून उभे राहिले आणि आपणच सर्वांत जास्ती पराक्रम गाजवल्याचा दावा करू लागले. अजॅक्स म्हणाला, “क्रीटाधिपती इडोमेनियस, सर्वज्ञानी नेस्टॉर आणि महाराज आगामेम्नॉन या तिघांनी याचा निर्णय घ्यावा. त्या दिवशी युद्धात नक्की काय घडले, हे त्यांना ठाऊक असेल.” ओडीसिअसही म्हणाला, “यांचा निर्णय नि:पक्षपाती असेल असा मलाही विश्वास आहे.”

आता आली का पंचाईत! ग्रीकांमधील दोन सर्वांत प्रबळ योद्ध्यांमध्ये या मुद्द्यावरून फूट पडू पाहत होती. ते नेस्टॉरच्या लक्षात आले आणि तो आगामेम्नॉन व इडोमेनियसला म्हणाला, “हा तर लैच बाका प्रसंग आला आपल्यावर. आता या दोघांमध्ये जो जिंकेल त्याच्या आनंदाला पारावार राहणार नाही कारण अकिलीसची शस्त्रे त्याला मिळतील. पण जो हरेल तो आपल्यावर नाराज होईल आणि युद्धाला तयार होणार नाही. आणि त्यात परत हे दोघेही ग्रीक सेनेतील महान वीर आहेत. दोघांपैकी कुणाचीही नाराजी ओढवणे आपल्या फायद्याचे नाही. त्यामुळे मी सांगतो ते ऐका, आपण पकडून आणलेले ट्रोजन कैदी आहेत त्यांनाच करूदे हा निर्णय. म्हणजे पाहुण्याच्या काठीने साप मारल्यागत होईल.”

हा बेरकी सल्ला ऐकून आगामेम्नॉन लै खूश झाला. “लै भारी रे नेस्टॉर!! नामी शक्कल शोधून काढलीस! असेच करूया.” त्या तिघांची मसलत संपल्यावर त्यांनी जाहीर केले की हा निर्णय ते ट्रोजन कैद्यांवर सोपवतील.

यावर थोरला अजॅक्स रागाने एकदम चिडून लाल झाला आणि ओडीसिअसला म्हणाला, “हरामखोरा, तुझी लायकी काय आणि माझ्याशी बरोबरी करू पाहतोस? अकिलीस मेला तेव्हा सगळ्यांसमोर त्याचे प्रेत तूच ओढून आणलेस असा तरी तुझा दावा नाहीये ना? अरे भित्र्या, तुझी तर युद्धाला यायचीसुद्धा तयारी नव्हती. लपून बसला होतास बिळात घाबरून!! तुला ज्यानं आणलं इथं त्या पालामिदेसलाही तू कपटानं ठार मारलंस! तुझ्या अंगात शौर्य काहीच नाही, नुस्ती दगाबाजी भरलीये. तुझ्या सल्ल्यापायी फिलोक्टॅटेसला लांबवर सोडून यावं लागलं आम्हाला. (हे कॅरेक्टर नंतर येईल. हे महत्त्वाचं आहे.) युद्धात हेक्टरचा समोरासमोर सामनादेखील तू कधी केला नाहीस. त्याला घाबरलास एकदम. मी मात्र त्याचा जिगरीनं सामना केला. अरे, इतका शूर असतास तर सर्व जहाजांच्या मध्यभागी तुझं जहाज कशाला लावलंयस? जहाज जळण्याची भीती आहे म्हणून? मी मात्र अगदी एका टोकाला जहाज लावलंय माझं. कशाचीही भीती नाही मला. हा वाद लढाईच्या वेळेस झाला असता, तर माझं शौर्य बघूनच या वादाचा निकाल लागला असता. इथं मात्र लोकांना गंडवून पराक्रमी वीरांच्या मांदियाळीत जागा घेऊ पाहतोयस? अकिलीसचं चिलखत तर तुझ्या अंगालाही येणार नाही. तुझ्या कमकुवत हातांत त्याचा भालाही पेलवता येणार नाही. पण मला मात्र ते एकदम फिट्ट बसेल. युद्धात मी तुझे प्राण वाचवले होते तरी तुला त्याची आठवण नाही.
पण आपण उगीच भांडतोय कशाला? तुझा भाला घेऊन ये. काय तो कंडका पाडू एकदाचा. चल ये!!! थेटिसनं हे बक्षीस लढाईतल्या कौशल्यासाठी ठेवलंय, तोंडाची नुस्ती वाफ दवडण्यासाठी नाही.”

हे ऐकून ओडीसियस पेटला. “तू नुसताच सांड आहेस पण तुझा मेंदू गुडघ्यात आहे. नुस्ता पराक्रम घेऊन काय चाटायचाय? डोकं नसेल तर सगळं व्यर्थ आहे. इतके ताकदवान बैल असतात, पण माणूस फक्त डोक्याच्या बळावर त्यांना वेसण घालतो. माझ्या बुद्धिचातुर्यावर विसंबूनच मला ग्रीक सैन्यात घेतलं गेलं. जेव्हा बलवान योद्धे कारणाशिवाय झुंजत होते तेव्हा त्यांना मी योग्य शब्द वापरून शांत केलं. शब्दांची ताकद अपरंपार आहे. जेव्हा जेव्हा काही विशेष मोहीम काढायची असे तेव्हा तेव्हा मी कायम पुढे असायचो. माझं जहाज मी कडेला लावलं नाही ते घाबरलो म्हणून नव्हे, तर आगामेम्नॉनला मदत असावी म्हणून. तुझ्यागत वेडेपणाने एकीकडे गेलो नाही. हेक्टरलाही मी कधी घाबरलो नाही, उलट कायम लढण्यात पुढे असायचो. इतकेच नव्हे, तर वेष बदलून भिकार्याच्या फाटक्या कपड्यांत मी स्वतः धाडस करून ट्रॉयमध्ये गेलो आणि त्यांचे मनसुबे जाणून घेतले. बाकी कुणाच्यातही इतकी डेरिंग नव्हती. मला देवांनी ताकद आणि डोकं दोन्हीही दिलंय. आणि अकिलीसच्या प्रेताभोवतीच्या लढाईत तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त माणसं मीच मारलीत.”

अजॅक्स परत उत्तरला, “तू लढलास तरी अकिलिसच्या प्रेताजवळ नाही-दुसरीकडेच कुठेतरी लढत होतास. मी सर्वांचे पाय जायबंदी केले आणि पळून जाणार्यांच्या पाठीत भाले खुपसले म्हणून अकिलीसचे प्रेत वाचू शकले. ट्रोजन पळाले ते माझ्या पराक्रमामुळेच. आलाय मोठा मला सांगणारा.”

ओडीसिअस उत्तरला, “अजॅक्स, लढाई असो अथवा सल्लामसलत, मी तुझ्यापेक्षा कुठल्याही प्रकारे कमी नाही. इतर कुणाही ग्रीकापेक्षा माझी बुद्धी तेज आहे आणि ताकदही तुझ्याइतकीच आहे. पॅट्रोक्लसच्या फ्यूनरल गेम्सच्या वेळची आपली कुस्ती आठवते ना? मी तुझ्या तोडीस तोड होतो.”

अशाप्रकारे त्यांचे भांडण सुरू राहिले. ट्रोजन कैद्यांनी दिलेल्या निर्णयानुसार अकिलीसची शस्त्रास्त्रे ओडिसिअसला देण्यात आली. त्याला अतिशय आनंद झाला. मात्र अजॅक्सला प्रचंड दु:ख झाले.तो जागीच एखाद्या पुतळ्यागत उभा राहिला. त्याच्या मित्रांनी व सहकार्यांनी त्याला कसेबसे जहाजांकडे नेले.

रात्र झाल्यावर सर्व ग्रीक झोपले, पण अजॅक्सचा डोळा लागला नव्हता.

थोरल्या अजॅक्सची आत्महत्या.

अजॅक्सची हालत खराब झाली होती. झोप-जेवण-बाई यांपैकी कशाचीच शुद्ध त्याला राहिली नव्हती. अकिलीसची शस्त्रे न मिळाल्याचा अपमान त्याच्या इतका जिव्हारी लागला होता की तो रागाने नुसता पागल झाला होता. कधी त्याला वाटे की सगळ्या ग्रीकांची जहाजेच पेटवून देऊ तर कधी वाटे की तलवारीने त्या ओडीसिअसचे सगळे अवयव एकेक करून कापून काढू. त्याच तावात त्याने चिलखत चढवले, हातात तलवार घेतली आणि रागारागाने तो वाट फुटेल तिथे जाऊ लागला. त्याच्या तोंडाला फेस आला होता. एखाद्या जनावरासारखा गळ्यातून गर्जनेचा आवाज तो काढत होता. त्याचा एकूण रागरंग पाहून लोकांची भीतीने गाळण उडाली.

हळूहळू पहाट झाली. ग्रीक लोक झोपेतून जागे झाले, पण अजॅक्स त्या वेडाच्या भरातून अजून बाहेर आला नव्हता. ग्रीक सैनिक समजून तो मेंढ्यांना मारत सुटला होता. त्याने मारलेल्या मेंढ्यांच्या रक्ताने मैदान लाल झाले. लै मेंढ्या त्या वेडाच्या भरात झ्यूसला प्यार्या झाल्या. ग्रीकांना मारल्याच्या समजुतीत अजॅक्स अजूनच उन्मादात कापाकापी करत सुटला होता.

अखेर मेनेलॉस आगामेम्नॉनपाशी आला आणि म्हणाला, “भावा, अजॅक्स ठार वेडा झालाय. तो आपली जहाजे पेटवेल किंवा एकेकाला तंबूत घुसून मारेल. च्यायला, देवांची अवकृपा तरी किती असावी आपल्यावर! त्या थेटिसला तरी हे असलं बक्षीस ठेवायची गरज काय होती? आणि तो ओडीसिअसही शहाणा, आपल्यापेक्षा मोठ्या वीराशी कशाला उगीच स्पर्धा करावी?”

आगामेम्नॉन उत्तरला, “अबे अजॅक्सला नको दोष देऊ, देवच यात दोषी आहेत. साला आपलंच नशीब फुटकं.”

इकडे खँथस नदीजवळच्या झुडुपांत धनगर लोक भीतीने दडून बसले होते. मोठ्याने आरोळ्या ठोकत सांड अजॅक्स त्यांची मेंढरे मारत होता, त्यामुळे त्यांना बिचार्यांना कळायचं बंद झालं होतं. अखेरीस एक मेंढा मारून अजॅक्स त्यावर पाय ठेवून विकट हसून (तो ओडीसिअस आहे असे वेडाच्या भरात समजून) म्हणाला, “मर हरामखोरा! कुत्री आणि घारी तुझा फडशा पाडतील. अकिलीसचं कवचही तुला शेवटी वाचवू शकलं नाही तर! स्वतःपेक्षा भारी माणसाशी उग्गीच स्पर्धा केली की असंच होणार. मर तू इथंच. घरी तुला बायकापोरं भेटणार नाहीत किंवा म्हातारे आईबापही दिसणार नाहीत. तुझ्या देशापासून दूर कुत्री आणि गिधाडे तुझा फडशा पाडतील.”

पण नंतर सकाळच्या त्या उजेडात त्याला त्या अगणित मेलेल्या मेंढ्यांचे मृतदेह दिसल्याबरोबर कळून चुकले की आपण इतका वेळ रागाच्या भरात काय केले ते. ते कळाल्यावर अजॅक्स एकदम स्तंभित झाला. डोंगरात अडकलेला एखादा धोंडा असावा तसा तो जागीच उभा राहिला. एक पाऊल पुढे टाकेना की मागे येईना. मग तो स्वतःशीच शोक करू लागला, “अरेरेरेरे, देव माझा इतका तिरस्कार का बरे करतात? त्यांनी माझे डोके फिरवल्यामुळेच या गरीब बिचार्या निष्पाप मेंढ्यांना मारले मी. त्या हरामखोर ओडीसिअसचे तळपट होवो!! सर्व ग्रीक सैन्याचीही वाट लागो! लढाईतून आगामेम्नॉनला धडपणी परत न जावो! मरूदेत सगळे. जगण्यात आता राम राहिला नाही. खर्या शूर लोकांचा आता ग्रीक सैन्यात सन्मान केला जात नाही. कमअस्सल लोकांचीच चलती आहे सध्या. त्यामुळेच ओडीसिअसला अकिलीसचे कवच मिळाले. मरूदे तेच्यायला, यांच्यात रहायचंय कुणाला? मला तसेही हे लोक विसरलेत, माझे कुठलेच पराक्रम त्यांच्या लक्षात नाहीत.”

असे नानापरीचे बोलून शेवटी हेक्टरने भेट दिलेली तलवार अजॅक्सने आपल्या गळ्यात घुसवली आणि स्वतःचा प्राण घेतला. तो धराशायी झाला. जमिनीवर त्याच्या रक्ताचे पाट वाहू लागले.

अजॅक्स पडलेला पाहून ग्रीक सैन्य तिथे धावत आले. पण भीतीने कोणी त्याच्या जवळ जाईना. बर्याच जणांनी डोक्यावर माती ओतली आणि मोठ्याने विलाप करू लागले. अजॅक्सचा सावत्र भाऊ आणि प्रख्यात धनुर्धारी ट्यूसर तिथे आला. अजॅक्सला पडलेले पाहताक्षणी तलवार उपसून तोही स्वतःचे प्राण घेऊ पाहत होता, पण लोकांनी त्याचा हात आवरला. तो शोक करू लागला, “भावा, तू अचानक असा कसा वेडा झालास? ट्रोजनांना दु:खापासून दिलासा मिळावा आणि ग्रीक मरावेत अशीच ईश्वरी योजना आहे की काय कोण जाणे. आता लढाईत लढताना कुणाचेही डेरिंग राहणार नाही. संकटापासूनची ग्रीकांची ढाल आता राहिली नाही. आईबाबांना तोंड कसे दाखवू आता परत सलामीसला जाऊन? तू मेल्यावर माझीही आता हीच जागा.”

ट्यूसर रडत असतानाच अजॅक्सची गुलाम पण नंतर पत्नी झालेली टेकमेसा तिथे येऊन विलाप करू लागली. हिच्यापासून अजॅक्सला युरिसाकेस नामक पुत्रही झाला होता. सर्व बाबतींत तो बापासारखा होता. त्याचा जन्म इथेच ट्रॉयजवळ झाला होता-या शेवटच्याच वर्षात. “गुलाम असूनही तू मला राणीसारखं वागवलंस! सलामीसला परत गेल्यावर तू मला राणी म्हणून घोषित करणार होतास, पण हाय! ते आता शक्य नाही. बाळ युरिसाकेस आता पोरका झाला. बाप मेला की पोरक्या पोराचे हाल कुत्रा खात नाही. मीही आता कुणाची तरी गुलामच होईन बहुतेक. तू मेलास, माझं आता काहीच शिल्लक नाही राहिलं.”

ते ऐकून आगामेम्नॉन तिला म्हणाला, “बाई, ट्यूसर आणि मी जित्ते आहोत अजून. तुला कसल्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही एवढं लक्षात घे. तुझा पूर्वीप्रमाणेच सन्मान केला जाईल.”

अजॅक्स मेल्याचे ओडीसिअसलाही दु:ख झाले. तो म्हणाला, “ग्रीकहो, राग बहुत बुरी बला है. रागामुळेच अजॅक्स शेवटी कुणा ट्रोजनाकडून नव्हे, तर स्वतःच्याच हाताने मरण पावला. कुठे विजय मिळवावा म्हणून नाही, कुणा स्त्रीसाठी, शहर अथवा अन्य धनसंपत्तीसाठीही मी स्पर्धेत उतरलो नाही. माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न नसता तर मी स्वतःच्या हाताने ती शस्त्रास्त्रे अजॅक्सला भेट दिली असती. असे भावनेच्या आहारी जाणे योग्य नाही. शहाण्या माणसाने सर्व आघात धीराने सोसले पाहिजेत, स्वतःच्याच लोकांचा असा रागराग करू नये.”

हा शोक चालू असताना शेवटी नेस्टॉर म्हणाला, “लोकहो, आपल्या दु:खांना अंत नाही असेच दिसतेय. अकिलीस, माझा मुलगा अँटिलोखस आणि अजॅक्स हे तिघेही काही दिवसांच्या अंतराने पटापट लागोपाठच वारले. इतरही अनेक ग्रीक हेदिससदनी गेले. पण दु:ख उगाळण्यात अर्थ नाही. अजॅक्सचे अंत्यविधी बाकी आहेत अजून. ते करा चला.”

अजॅक्सचे प्रेत त्यांनी स्वच्छ धुवून जखमा आणि रक्त नीट पुसून काढले आणि त्याला नवीन वस्त्र परिधान केले. मग ग्रीकांनी इडा पर्वताहून अनेक झाडे तोडून लाकूडफाटा आणला. तो अजॅक्सच्या प्रेताभोवती नीट मांडला. भोवती त्याने मारलेल्या शत्रूंची चिलखते मांडून ठेवली. अनेक गायी व मेंढ्याही ठेवल्या. अनेक अंगरखे, अँबर रत्ने, चांदी, हस्तिदंत, आणि तेलाचे अनेक बुधले ठेवले. शिवाय बाकीही अनेक वस्तू ठेवल्या आणि मग शवास अग्नी दिला.

भडाडा अग्नी पेटला. अजॅक्सचे पार्थिव त्यात दहन झाल्यावर ग्रीकांनी वाईनने आग बुजवली. अजॅक्सची हाडे एकत्र करून एका सोन्याच्या बरणीत ठेवली आणि जवळच र्होएटियम नामक शहराजवळ एक मोठ्ठा चबुतरा बांधला. हे सर्व झाल्यानंतर ग्रीक आपापल्या जहाजांत गेले आणि रात्रीचे जेवण करून झोपायच्या तयारीला लागले. पण अजॅक्स गेल्याचे दु:ख सगळ्यांनाच झाले होते. इलियडमध्ये तर अजॅक्सचा उल्लेख कायम ‘बुलवार्क ऑफ द एखिअन्स’ अर्थात ग्रीकांची संरक्षक भिंत असाच येतो. अकिलीसखालोखाल ग्रीकांमध्ये तोच सर्वश्रेष्ठ योद्धा होता शिवाय अकिलीसचा तो चुलतभाऊही होता. अजॅक्स मेल्याचा फायदा घेऊन ट्रोजन रात्री चढाई करतात की काय अशा चिंतेत रात्र कशीबशी पार पडली.

(अजॅक्सचे थडगे)

मी देताना क्विंटस स्मिर्नियसची व्हर्जन दिलीय पण एपिक सायकल अन अन्य संदर्भांत काही वेगळ्या व्हर्जन्सही आहेत. त्यानुसार अजॅक्सने वेडाच्या भरात दोन मेंढ्यांना आगामेम्नॉन अन मेनेलॉस समजून ठार मारले. अजॅक्सला पश्चात्ताप झाल्यावर त्याने हेक्टरने भेट दिलेली तलवार आपल्या काखेत खुपसून आरपार नेली आणि स्वतःचा प्राण घेतला. एका अल्टरनेट व्हर्जनप्रमाणे थोरल्या अजॅक्सला ट्रोजन काही करू शकत नसल्याने त्यांनी त्याला चहूबाजूंनी माती थापून हलता येईनासे केले आणि तो शेवटी अन्नपाण्याविना तळमळत मरण पावला. शिवाय प्राचीन ग्रीक कवी पिंडार याच्या मते ओडीसिअसला शस्त्रे देण्याचा निर्णय ग्रीकांनी आपापसातच गुप्त मतदानाने घेतला. पण सर्व व्हर्जन्समध्ये शस्त्रे शेवटी ओडीसिअसलाच दिली जातात-यद्यपि अ‍ॅरिस्टोफेनेसच्या एका टीकेनुसार ट्रोजन कैद्यांपैकी एक मुलगी अजॅक्सच्या बाजूने बोलत असूनही शेवटी ओडीसिअसच्या बाजूने निर्णय घेतला गेला. असे का झाले असावे? ओडीसिअसने नेहमीप्रमाणे काही बेरकीपणा करून लाच वगैरे दिली असेल काय कुणाला? शक्यता नाकारता येत नाही. मला याबद्दल शोध घेताना काही अजून तरी सापडले नाही, सापडल्यास अवश्य अ‍ॅड करेन. शिवाय पालामिदेसला लाच खाल्ल्याच्या आरोपावरून ठार मारल्याचा उल्लेख अजॅक्स-ओडीसिअसच्या बाचाबाचीत अजॅक्सकडून होतोच म्हणा.

(क्रमशः)

Advertisements
This entry was posted in इतिहास-इतर जग, ग्रीस. Bookmark the permalink.

4 Responses to ट्रोजन युद्ध भाग ३.२- अकिलीसच्या शवाभोवतीची लढाई, अंत्यविधी व फ्यूनरल गेम्स. जजमेंट ऑफ आर्म्स आणि थोरल्या अजॅक्सची आत्महत्या.

  1. aativas म्हणतो आहे:

    वाचतेय. नंतर एक ‘ई पुस्तक’ तरी कराच या लेखांचं.

  2. julian brahme म्हणतो आहे:

    अजॅक्सचं रक्त जिथं सांडलं तिथं जी फुलं उगवली त्या फुलांवर अजॅक्सच्या नावातली पहिली दोन अक्षरं उमटली असं कुठंतरी वाचलं होतं. ती फुलं बहुदा हायसिंथ असावीत, पण त्या फुलांवर तर तसं काही दिसत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s