ट्रोजन युद्ध भाग २.५ – पॅट्रोक्लसचा अंत्यविधी आणि प्रिआमची यशस्वी गांधीगिरी-हेक्टरचा अंत्यविधी.

पॅट्रोक्लसचा अंत्यविधी

मागील भागात सांगितल्याप्रमाणे अकिलीसने हेक्टरची डेडबॉडी रथामागे फरपटत आणली आणि पॅट्रोक्लसच्या चितेजवळ तशीच ठेवून दिली आणि आगामेम्नॉनला सांगितले की उद्या सकाळी लाकडे इ. आणा. सर्व ग्रीकांना अकिलीसने जणू बाराव्याचे जेवण असाव तसे बरेच बैल, बोकड अन रानडुकरे कापून खाऊ घातले. ते हादडून सर्व ग्रीक तृप्त झाले. मग इतर मॉर्मिडन सैनिकांसोबत जेवण करून अकिलीस शांत झोपला. त्याला स्वप्नात पॅट्रोक्लस दिसला आणि त्याला अखेरचे आलिंगन द्यायला म्हणून अकिलीस उठला पण कुठले काय! मग तो तसाच रडू लागला. बाकीचे सैनिकही त्यात जॉइन झाले.

तोवर जवळ असलेल्या इडा पर्वतावरील लाकूडफाटा गोळा करून बाकी लोक आले. सर्व मॉर्मिडन सैनिक युद्धाच्या पोषाखात सज्ज झाले आणि आपापल्या रथांमागोमाग पॅट्रोक्लसकडे निघाले. प्रत्येक मॉर्मिडनने आपल्या केसांची एक बट कापून पॅट्रोक्लसवर टाकली .अकिलीसनेही आपल्या सोनेरी केसांची एक बट कापली आणि मृत पॅट्रोक्लसच्या हातात ठेवली. बर्‍याच मेंढ्या अन बैलांचा बळी दिला. पॅट्रोक्लसची काही पाळीव कुत्री होती, त्यांपैकी दोन कुत्री मारली. चार घोडे मारले. मागील बुकात सांगितल्याप्रमाणे बारा ट्रोजन योद्धे पकडून आणले होते त्यांचाही बळी दिला. मध आणि इतर उटण्यांनी भरलेले दोन जार्सही ठेवले. मध्यभागी पॅट्रोक्लसचा मृतदेह आणि त्याच्या सभोवती बाकी सर्वांचे मृतदेह अशी चिता सजवली आणि पॅट्रोक्लसला मरणोत्तर सद्गती मिळावी म्हणून प्रार्थना केली. शिवाय हेक्टरचा मृतदेह कुत्र्यांनी खावा म्हणून लालूच दाखवली, पण आश्चर्य म्हणजे कुत्री हेक्टरला शिवेनात.

पण का कोण जाणे, चिता पेट घेईना कारण वारे थंड होते. अकिलीसने हात उभावून त्यांची प्रार्थना केली त्यानंतर वारे वाहू लागले आणि चिता धडधडू लागली ती पूर्ण रात्रभर पेटतच होती. चितेभोवती अकिलीस येरझारा घालत होता. अखेरीस त्यालाही झोप लागली. दुसर्‍या दिवशी सकाळी लोकांनी त्याला उठवले तेव्हा त्याने उरलीसुरली आग वाईन टाकून विझवायची आज्ञा केली आणि एका सोन्याच्या बरणीत, बैलाच्या चरबीच्या दोन थरांखाली पॅट्रोक्लसची पांढरीफटक, काहीशी गरम हाडे ठेवून ती बरणी शामियान्यात नेली आणि जिथे दहन झाले तिथे एक चबुतरा उभारला.

फ्यूनरल गेम्स

आता रिवाजाप्रमाणे वेळ होती गेम्स खेळावयाची!! विविध शारीरिक क्षमतेच्या स्पर्धा ठेवून त्यांसाठी विविध तलवार, खजिना, स्त्रिया, घोडे, कढया, इ. बक्षिसे ठेवलेली होती. या सर्व वस्तू अकिलीस जहाजातून घेऊन आला आणि त्याने विविध स्पर्धांची अनाउन्समेंट केली.

“ग्रीकहो! या स्पर्धांमध्ये पहिला इव्हेंट आहे रथांच्या शर्यतीचा. तुमच्या सर्वांपेक्षा माझे घोडे किती चपळ आहेत हे जगजाहीर आहे, पण आज मी स्पर्धेत भाग घेणार नाही. बाकीच्यांनी अवश्य भाग घ्या आणि आपापले कौशल्य दाखवा.”

स्पर्धेसाठीची बक्षिसे खालीलप्रमाणे होती:

पहिले बक्षीसः सर्व कलांमध्ये पारंगत अशी एक स्त्री, शिवाय एक तीन पायांची कढई. त्यात २२ अँफोरे तरी पाणी मावेल.
दुसरे बक्षीसः सहा वर्षे वयाची एक अनटेम्ड घोडी.
तिसरे बक्षीसः ४ अँफोरे भरून पाणी मावेल इतकी मोठी तिपायी कढई.
चौथे बक्षीसः २ टॅलेंट भरून सोने.
पाचवे बक्षीसः एक जार.

(सोन्याला महत्त्व कमी असल्याचे लक्षात आले असेलच.)

युमेलस, डायोमीड, मेनेलॉस, नेस्टॉरपुत्र अँटिलोखस (याला नेस्टॉरने जाताजाता रथांची रेस कशी जिंकावी? यावर नेहमीप्रमाणे एक प्रवचन देऊन पाठवले.) आणि मेरिओनेस हे पाचजण शर्यतीत भाग घेतो म्हणून आले. टॉस केल्यावर कोण पुढे, कोण मागे राहणार, इ. निर्णय घेतल्या गेले. अकिलीसने “रेडी-स्टेडी-गो!!!!” चा संदेश दिल्यावर शर्यत सुरू झाली.

मध्ये एके ठिकाणी रस्ता अरुंद होता. मेनेलॉस आणि अँटिलोखस यांमध्ये बेनहर पिच्चरमध्ये दाखवल्यासारखी सिच्युएशन होतेय की काय असे चित्र तयार झाले. अँटिलोखसला मेनेलॉस म्हणाला, की बाबारे रोड लै अरुंद आहे, जरा पुढे जाऊदे अन मग खुशाल मागे टाक. पण डायोमीड पुढे गेल्यामुळे अँटिलोखस चिडला होता. त्याने मेनेलॉसचे ऐकले नाही. त्याला शिव्या घालतच मेनेलॉस पुढे गेला. क्रीटाधिपती इडोमेनिअस आणि धाकटा अजॅक्स यांच्यात तोपर्यंत रेसमध्ये कोण पुढे अन कोण मागे यावरून अल्पगालिप्रदान झाले अन मग अकिलीसने “राजेपणाची जरा लाज बाळगा लोकहो!” करून त्यांना गप्प केले. तोपर्यंत रेस संपली. पहिल्यांदा डायोमीड, त्याच्या मागे अँटिलोखस, त्याच्या मागे मेनेलॉस, अन अनुक्रमे मेरिओनेस आणि शेवटी युमेलस असे रेसर्स फिनिश झाले.

युमेलस हा रथविद्येत एकदम प्रवीण होता. त्यामुळे अकिलीस म्हणाला की तो जरी ढोग नंबर आला तरी त्याला सेकंड प्राईझ दिले पाहिजे. यावर अँटिलोखस म्हणाला खड्ड्यात जा. मी दुसरा आलोय, दोन नंबरवाली घोडी मलाच पाहिजे. अकिलीस म्हणाला ओके आणि मग मांडवली म्हणून युमेलसला एक चिलखत दिले गेले. एवढ्यात मेनेलॉस तणतणू लागला, “हा अँटिलोखस हरामखोर आहे. याचे घोडे माझ्या घोड्यांच्या तुलनेत काहीच नाहीत. याचा निर्णय ग्रीकांनी स्वतःच करावा. याने सगळ्यांसमोर येऊन अपोलोची शपथ घ्यावी की माझ्या घोड्यांचा मार्ग याने मुद्दाम अडवला नाही म्हणून.”

अँटिलोखसची अंमळ तंतरली. “सॉरी शक्तिमान!” म्हणून त्याने घोडी मेनेलॉसला दिली. मग मेनेलॉस सुखावला आणि “आयिंदा खयाल रहे” म्हणत त्याने घोडी परत त्याला दिली. अन्य बक्षिसेही त्या त्या क्रमांकाच्या स्पर्धकाला दिली गेली. पाचव्या क्रमांकाची बरणी शिल्लक राहिली होती, ती अकिलीसने नेस्टॉरला भेट देऊन टाकली. बुढ्ढा नेस्टॉर सुखावला आणि नेहमीप्रमाणे त्याने एक प्रवचन दिले. या नेस्टॉरची लेक्चर द्यायची सवय पाहता तो ग्रीकांचा ‘आचार्य बाबा बर्वे’ होता असे म्हणावयास हरकत नाही. तेही साहजिकच आहे म्हणा. ट्रोजन युद्धाच्या वेळी नव्वदीकडे झुकलेला होता, आणि बाकी वीरांचे बाप पाळण्यात होते तेव्हा त्याने काही फेमस लढायांत भाग घेऊन मोठे शौर्य गाजवले होते.

ते ऐकून घेऊन मग अकिलीसने पुढील इव्हेंट बॉक्सिंग स्पर्धेची अन बक्षिसांची घोषणा केली.

“जो जिंकंल त्याला हे सहा वर्षे वयाचं खेचर मिळंल अन हरलेल्याला ह्यो वाईनचा कप. हाय का कोण बॉक्सिंग करणार?” एपिअस आणि युरिआलस नामक दोघे बॉक्सर उभे राहिले. डायोमीडने युरिआलसच्या हातात बैलाच्या कातड्याचे हँडग्लोव्ह्ज घातले आणि म्याच सुरू झाली. दोघेही घामाने न्हाऊन निघाले होते. अखेरीस बॉक्सिंगमध्ये पटाईत असलेल्या एपिअसने युरिआलसच्या बरोब्बर तोंडावर एक ठोसा असा मारला, की युरिआलस खाली कोसळला, एका बुक्कीत गार झाला. कसाबसा उठला तेही रक्त ओकत ओकत. ती दशा पाहून एपिअसनेही त्याला आधार दिला आणि बसते गेले. बक्षिसे वाटली गेली.

मग सुरू झाला तिसरा इव्हेंट-कुस्तीचा!! यात जिंकणार्‍याला एक भलीथोरली कढई अन हरणार्‍याला सर्व कलानिपुण एक स्त्री अशी बक्षिसे जाहीर केली गेली. या बक्षिसांची किंमत प्रेक्षकांच्या मते अनुक्रमे १२ आणि ४ बैलांच्या इतकी होती. थोरला सांड अजॅक्स आणि इथाकानरेश बेरकीसम्राट ओडीसिअस हे दोघे तयार झाले. दोघे एकमेकांना भिडले.कोणीच कुणाला आटपेना. मग बघणारेही कंटाळले तसा अजॅक्स ओडीसिअसला म्हणाला, लै झालं आता. एक तर तू मला उचल नैतर मी तुला उचलतो. मग अजॅक्स ओडीसिअसला उचलताना ओडीसिअसने बेरकीपणे गुडघ्याच्या मागच्या बाजूला लाथ घातली. त्यामुळे अजॅक्सचा ब्यालन्स गेला आणि दोघेही खाली कोसळले. ग्रीकांना जरा आश्चर्य वाटले. मग ओडीसिअसने अजॅक्सला उचलले, पण अजॅक्स म्हणजे ग्रीकांचा भीम होता. तो काय असा सहजासहजी उचलला जातोय थोडीच? कैलास पर्वत उचलताना रावणाची झाली तशी ओडीसिअसची गत होऊ लागली. जमिनीपासून जरा उगीच वर उचलले खरे पण नंतर काय झेपेना. शेवटी दोघेही पुन्हा कोसळले. तिसर्‍यांदा ते दोघे भिडणार एवढ्यात अकिलीस म्हणाला, “भावांनो बास. लै दमलात, आता अजून दमू नका. प्रत्येकाला सारखं बक्षीस देतो.” मग ते दोघे आपल्या कपड्यांवरची धूळ झटकत तिथून निघून गेले.

यापुढचा इव्हेंट होता रनिंग रेस!! पहिले बक्षीस म्हणून चांदीचे एक अप्रतिम भांडे तर दुसरे बक्षीस म्हणून एक गच्च भरलेला बैल आणि तिसरे बक्षीस म्हणून अर्धा टॅलेंट सोने जाहीर केले गेले.

मग धाकटा अजॅक्स, ओडीसिअस आणि नेस्टॉरपुत्र अँटिलोखस हे तिघे उभे राहिले. अँटिलोखस या दोघांपेक्षा बराच तरुण होता. रेस सुरू झाली. धाकटा अजॅक्स सर्वांत पुढे होता. पण ओडीसिअस जीव खाऊन पळू लागला. दोघांमधील अंतर कमी होऊ लागले आणि एवढ्यात धाकट्या अजॅक्सचा पाय कुठल्यातरी प्राण्याच्या पडलेल्या कातडीला लागून सटकला आणि तो धाडकन खाली पडला-तोंडात शेण गेले. यथावकाश रेस संपली, ओडीसिअसला चांदीचा कप मिळाला आणि तोंडातले शेण बाहेर काढत धाकटा अजॅक्सही आपापला बैल घेऊन निघून गेला. अँटिलोखसने सोने घेतले आणि काका लोकांच्या स्टॅमिनाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. “अजॅक्स आणि ओडीसिअस दोघेही माझ्यापेक्षा शीनियर आहेत बरेच तरी रेसमध्ये तरुणांना हरवले. क्या बात है!!” हे ऐकून अकिलीसने आनंद व्यक्त केला आणि अँटिलोखसला अजून अर्धा टॅलेंट सोने दिले.”मी तुझ्यावर प्रसन्न आहे!! हे घे सोने, तू भी क्या याद रखेगा!!”

पुढचा इव्हेंट होता चिलखत वैग्रे सर्व घालून युद्ध. जो कोणी प्रतिस्पर्ध्याला जखमी करून पहिल्यांदा रक्त काढेल तो जिंकेल अशी अट होती. जिंकणार्‍याला एक धारदार तलवार आणि एक चिलखत दोघांना सामाईक, शिवाय दोघांना अकिलीसकडून एक डिनर प्रत्येकी अशी बक्षिसाची ऑफर होती. मग थोरला अजॅक्स आणि तरणाबांड डायोमीड हे चिलखत घालून तयार झाले. दोघांचा आवेश आणि चापल्य पाहून बघणारे ग्रीक गुंगून गेले. अजॅक्सने डायोमीडची ढाल भेदली, पण चिलखतामुळे डायोमीड वाचला. तो अजॅक्सच्या मानेचा भाल्याने वेध घेऊ पाहत होता आणि त्यासाठी अजॅक्सवर तीनदा तरी झेपावला. ते पाहून अजॅक्स मरतो की काय असे वाटून ग्रीकांनी दोघांना आता बास करण्याबद्दल विनवले. मग खेळ संपला आणि अकिलीसने डायोमीडला धारदार थ्रेशियन तलवार भेट दिली.

नंतरचा इव्हेंट होता थाळीफेक. धातूची जड थाळी जो सर्वांत लांब फेकेल त्याला किमान पाच वर्षे पुरेल इतके लोखंड दिले जाणार होते. एपिअस (बॉक्सिंगवाला), पॉलिपोएतेस, थोरला अजॅक्स आणि लेऑन्तेउस हे चारजण पुढे आले. पॉलिपोएतेसचा थ्रो सर्वांत दूरवर गेला आणि त्याला लोखंड बक्षीस मिळाले.

मग सेकंडलास्ट इव्हेंट होता धनुर्विद्येचा. एका जहाजावर एक कबूतर पाय बांधून ठेवले आणि जो फक्त दोरी तोडेल त्याला दहा कुर्‍हाडी तर जो कबुतराचा वेध घेईल त्याला दहा परशू मिळतील असे जाहीर केले. मेरिओनेस आणि धनुर्धारी ट्यूसर हे दोघे पुढे आले. टॉस केला, पहिल्यांदा ट्यूसरचा चान्स आला. ट्यूसरने नेम धरला पण फक्त दोरी तुटली आणि कबुतर हवेत उडाले. मग मेरिओनेसने जराही वेळ न दवडता ट्यूसरच्या हातातून धनुष्यबाण हिसकावून घेतले आणि हवेतल्या हवेतच कबुतराला मारले. तो बाण जहाजाच्या शिडात रुतून बसला आणि हळूहळू त्यासहित मेलेले कबूतरही खाली पडले. ठरल्याप्रमाणे मेरिओनेसला दहा परशू तर ट्यूसरला दहा कुर्‍हाडी दिल्या गेल्या.

शेवटचा इव्हेंट भालाफेकीचा होता. जिंकणार्‍याला बक्षीस म्हणून एक नक्षीकाम केलेली कढई मिळणार होती. आगामेम्नॉन आणि मेरिओनेस दोघेही उभे राहिले. अकिलीस म्हणाला की भालाफेकीत आगामेम्नॉन जगात भारी आहे. त्यामुळे त्याला हवे तर कढई देतो पण मेरिओनेसला एक ब्राँझचे टोक असलेला भाला देऊदे. आगामेम्नॉनने संमती दिल्यावर टॅल्थिबियस नामक त्याचा सारथी कढई त्याच्या शामियान्यात घेऊन गेला आणि स्पोर्ट्स इव्हेंट संपले.

प्रिआमची यशस्वी गांधीगिरी.

या शेवटच्या बुकात प्रिआमच्या डेरिंगचे अन हेक्टरच्या दहनविधीचे वर्णन आलेले आहे. हेक्टरला मारले, पॅट्रोक्लसला दहन केले आणि मरणोत्तर गावभरचे गेम्स खेळून झाले तरी अकिलीसचे दु:ख काही केल्या शमत नव्हते. तशातच तो सैरभैर होत वेड्यागत इकडेतिकडे फिरू लागला आणि हेक्टरची डेड बॉडी पुनरेकवार रथाला जोडून फरपटत नेत पॅट्रोक्लसच्या शवाला प्रदक्षिणा घातल्या. गेले बारा दिवस हाच क्रम चालला होता. पॅट्रोक्लसच्या मरणाचे इतके दु:ख झाले त्याअर्थी या दोहोंमधील नाते शारीर पातळीवरही असावे असे तर्क मांडले जातात. नक्की कुणाला काहीच माहिती नाही, पण प्राचीन ग्रीसमध्ये गेगिरी कॉमन होती तुलनेने अन त्याबद्दल लोकांचा दृष्टिकोनही तुलनेने उदार होता. त्यामुळे असेलही. खुद्द आगामेम्नॉनबद्दलही अशी एक कथा प्रचलित आहे. त्याचा एक ‘लव्हर’ नदीत पोहत असताना मेल्यावर आगामेम्नॉनला लै दु:ख झाले अन त्याने त्याबद्दल बराच शोक व्यक्त केला अन त्याची समाधीही बांधली. असो.

इकडे हेक्टर मरून बारा दिवस झाले तरी पोराची डेड बॉडी तशीच आहे याचे दु:ख प्रिआमला सहन होईना. शेवटी तो एका निश्चयाने उठला. त्याच्या इतर सर्व पोरांना त्याने लै शिव्या घातल्या. ” सगळे साले एकापेक्षा एक बिनकामाचे आहेत!! तुमच्यापेक्षा हजारपटीने सरस असलेला हेक्टर मरून पडलाय. तुमची लायकी रणांगणात सिद्ध करा, माझ्यापुढे तोंड घेऊन येऊ नका. माझा रथ तरी किमान तयार करता येतो का बघा. हला इथून!”

मग अकिलीसला खजिना द्यायला म्हणून त्याने बारा रग, बारा कोट, बारा अंगरखे, बारा मँटल(हाही कपड्याचाच एक प्रकार असावा बहुधा), दहा टॅलेंट सोने, दोन तिवया, चार कढया अन थ्रेशियन लोकांनी भेट म्हणून दिलेला एक अतिशय सुंदर नक्षीकाम असलेला कप इतके सामान घेऊन तो निघाला. काहीही करून हेक्टरचे पार्थिव परत आणायचेच, असा त्याचा निग्रह होता.

जाण्याआधी बायको हेक्युबाबरोबर झ्यूसदेवाला एक वाईनचा कप अर्पण करून प्रिआम आपल्या इदाएउस नामक सारथ्याबरोबर निघाला. ट्रॉयच्या वेशीपर्यंत त्याचे पुत्र आणि जावई त्याला घालवायला आले होते. तो पुढे गेल्यावर तेही परत निघून गेले. वेळ रात्रीची होती. प्रिआमला बाहेर गेल्याबरोबर एक मॉर्मिडन सैनिक दिसला. त्याची फुल तंतरली. आता हा मारतो की काय अशा दुग्ध्यात असतानाच तो मॉर्मिडन सैनिक त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, “अरे म्हातार्‍या, या मैदानभर पसरलेल्या ग्रीकांची तुला भीती वाटत नाही का? इतका खजिना घेऊन जाताना तुला अजून कुणी पाहिलं तर खातमाच करेल तुझा. पण मी तुला काही करणार नाही, कारण तुला पाहून मला माझ्या बापाची आठवण येतेय, तोही तुझ्याइतकाच म्हातारा आहे.”

प्रिआम उत्तरला,”देवागत धावून आलास रे पोरा.” त्याने सुटकेचा नि:श्वास टाकल्यावर तो मॉर्मिडन परत प्रश्न विचारू लागला, “पण एक सांग, अगदी खरं खरं सांग- हा इतका खजिना घेऊन तू युद्धाच्या भीतीने कुठं दूरदेशी चाललायस की तुझा शूर मुलगा मेल्यामुळे ट्रॉय सोडून चाललायस?”

प्रिआम अंमळ ब्रेकडाउन झाला आणि विचारू लागला, की हेक्टरबद्दल त्याला कसे काय सगळे माहिती ते. मग त्या मॉर्मिडनने स्वतःची कर्मकहाणी सांगितली आणि प्रिआमला हळूच कुणाला लक्षात येणार नाही अशा पद्धतीने स्वतः अकिलीसपर्यंत घेऊन गेला. प्रिआमने त्याला एक लहानसा कप देऊ केला, पण अकिलीसला ठाऊक नसताना हे घेतले तर तो मला मारेल इ.इ. सांगून त्या बिचार्याने ती भेट नाकारली.

अकिलीसच्या शामियान्याबाहेर प्रिआमचा सारथी इदाएउस बसला आणि प्रिआम सरळ आत गेला. अकिलीस तिथे ऑटोमेडॉन आणि अल्किमस यांसोबत बसला होता. नुकतंच जेवण झालं होतं त्याचं. गेल्यागेल्या प्रिआमने सरळ गुडघे टेकले आणि अकिलीसच्या हातांचे चुंबन घेतले. अकिलीस आणि बाकीचे दोघे परम आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात तोवर प्रिआम म्हणाला, “अकिलीस,तुझ्या बापाला आठव. मीही वयाने त्याच्याइतकाच आहे. हे युद्ध सुरू झालं तेव्हा माझे पन्नासच्या पन्नास पुत्र जिवंत होते-त्यांपैकी एकोणीस एकट्या हेक्युबा राणीपासून झालेले. आज त्यांपैकी कितीतरी तुझ्या हाताने मेलेत. हेक्टरलाही तू मारलंस. त्याचं पार्थिव मी घ्यायला आलोय. माझ्यावर दया कर. आजवर असा प्रसंग कुणावरही आला नसेल. ज्याने माझ्या पोरांना क्रूरपणे ठार मारलं त्याच्याच हातांचं चुंबन मला घ्यावं लागतंय. आजवर कुणालाही इतकं मन घट्ट करावं लागलं नसेल जितकं मला करावं लागलंय.”

हा ऐकून अकिलीसच्या मनावर खोलवर परिणाम झाला. प्रिआम आणि अकिलीस दोघेही आपापल्या प्रियजनांसाठी पुन्हा रडू लागले. दु:खाचा भर ओसरल्यावर अकिलीसने प्रिआमला धरून बसते केले आणि म्हणाला,”इतक्या कडक ग्रीक पहार्यातून एकट्याने इकडे येणे म्हणजे लोकोत्तर डेरिंगचे काम आहे. तुझ्या या धाडसाला मी सलाम करतो. पण असे रडून काही फायदा नाही, काही झालं तरी हेक्टर काही पुन्हा जिवंत होऊ शकत नाही.”

प्रिआम म्हणाला,”बाकी सोड, हेक्टरचं शव पडलंय ते मला दे आणि त्या बदल्यात हा खजिना घे.”

अकिलीस अंमळ चिडून म्हणाला,”माहितेय रे, देतो तुला परत. कुणा देवाची तुला मदत असल्याखेरीज हे शक्य होणे नाही.” असे म्हणून त्याने आपल्या नोकरांना आज्ञा केल्यावर त्यांनी प्रिआमचा खजिना ताब्यात घेतला, हेक्टरची डेड बॉडी नीट धुतली, सुगंधी उटणी लावली, शवाला स्वच्छ कपडे घातले आणि अकिलीसने स्वतः रथावर तिरडी ठेवून त्यावर नीट बांधून ठेवले.

त्यानंतर अकिलीस म्हणाला,”तुझ्या इच्छेप्रमाणे हेक्टरचं शव मी परत केलं. उद्या पहाटे निघून जा इथून, तोपर्यंत रात्रीचं जेवण करून घे.” असं म्हणून त्याने चांदीसारखी पांढरी शुभ्र लोकर असलेली एक मेंढी मारली, लहानलहान तुकडे करून ते नीट भाजले. अकिलीसचा सारथी ऑटोमेडॉन टोपलीतून ब्रेड घेऊन आला. सोबत वाईनचे सेवनही चालले. जेवता जेवता प्रिआमचे लक्ष अकिलीसकडे गेले. अकिलीस दिसायला देखणा होता. प्रिआम त्याच्या व्यक्तिमत्त्वाने चांगलाच प्रभावित झाला. अकिलीसही प्रिआमच्या शहाणपणाची अन समजेची आणि एकूणच ‘मॅनर्सची’ मनोमन तारीफ करत होता.

जेवण झाले आणि प्रिआमने अकिलीसला विनवले,”हेक्टर मरण पावला त्या दिवसापासून माझ्या डोळ्याला डोळा नाही लागला.धड जेवणही मला जात नव्हतं. जेवल्यावर आता मला झोप येतीय, तरी प्लीज झोपूदे.” अकिलीसने लगेच लोकरीचं अंथरूण-पांघरूण आणून झोपेची जय्यत तयारी केली. झोपण्याआधी अकिलीस मजेने म्हणाला, “आत्ता जर कुणी माझ्याकडे आला आणि तुला इथं झोपलेलं पाहून आगामेम्नॉनकडे चुगली केली तर??? ते एक असो. हेक्टरसाठी सुतक किती दिवस पाळणार? म्हणजे तेवढे दिवस आम्ही युद्ध करणार नाही म्हणून विचारलं आपलं.”

“अकरा,”, प्रिआम उत्तरला.
“ठीक,” अकिलीस म्हणाला. शामियान्याच्या बाहेरच्या बाजूस प्रिआम आणि त्याचा सारथी इदाएउस हे दोघे झोपले तर आतल्या बाजूस अकिलीस ब्रिसीसबरोबर झोपला.

थोडा वेळ गेल्यावर प्रिआमच्या मनात शंका फेर धरून नाचू लागली. असे झोपलेले कुणा ग्रीकाने पाहिले तर? सरळ पकडून आगामेम्नॉनकडे देईल. मग ट्रॉयचे काय होईल? हे भय त्याला झोपू देईना. तसाच तो उठला, इदाएउसलाही उठवले अन दोघे खोपचीतून कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने ट्रॉयमध्ये निघून गेले.

ट्रॉयमध्ये प्रिआमला पाहिल्यावर गेटपाशीच आकांत उसळला. हेक्टरची बायको अँद्रोमाखी, आई हेक्युबा अन वहिनी हेलेन या तिघीही आकांत करीत होत्या. नऊ दिवस असा शोक केल्यावर दहाव्या दिवशी इडा पर्वतातून लाकूडफाटा आणून हेक्टरला अग्नी दिला, अन अकराव्या दिवशी त्याच्या अस्थी गोळा केल्या आणि एका जांभळ्या कापडात गुंडाळून सोन्याच्या बरणीत ठेवल्या. दहनस्थानी स्मृत्यर्थ एक उंचवटा उभारला आणि बाराव्याची मेजवानी जेवू लागले.

अशाप्रकारे ट्रोजनांनी घोडे माणसाळवण्यात निपुण असलेल्या हेक्टरचे अंत्यविधी पार पाडले. (And thus did they celebrate the funeral of Hector, tamer of Horses.)

वरील वाक्यानिशी इलियडमधील २४ वे बुक अन त्याबरोबर इलियडही संपते. पूर्ण इलियडमध्ये जवळपास २-३ महिन्यांचाच कालावधी येतो.

Advertisements
Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | 3 प्रतिक्रिया

ट्रोजन युद्ध भाग २.४- अकीऽऽलिस! अकीऽऽलिस!! अकीऽऽलिस!!!

पॅट्रोक्लसच्या प्रेताभोवती तुंबळ कापाकापी होते.

मागच्या भागात अकिलीसचा भाऊ पॅट्रोक्लस हेक्टरच्या हातून मरण पावला त्याचा वृत्तांत आलेला आहे. तो मेल्यावर माशा घोंगावाव्यात तसे त्याच्या प्रेताभोवती ट्रोजन घोंगावू लागले. उद्देश अर्थातच त्याचे चिलखत काढून घेणे हा होता. संपूर्ण इलियड आणि एकूणच ट्रोजन युद्धात अशा प्रकारचे प्रसंग खूपदा आलेले आहेत आणि त्यांतून कथानकाला अनपेक्षित कलाटणीही मिळालेली आहे.

तर त्याच्या प्रेताभोवती पहिल्यांदा आला मेनेलॉस-त्याची डेड बॉडी ग्रीक बाजूला परत न्यावी म्हणून. तोवर युफोर्बस नामक एक ट्रोजन योद्धा आला आणि किरातार्जुनीयातल्याप्रमाणे दोघांची बाचाबाची सुरू झाली. शेवटी मेनेलॉसने त्याच्या अंगात भाला खुपसून या वादाचा कंडका पाडला आणि त्याच्या अंगावरील चिलखत काढून घेतले. इकडे हेक्टरला मेन्तेस नामक एका सेनापतीने ओरडून पुनः युद्धासाठी प्रेरित केल्यावर हेक्टर सेना घेऊन तिथे आला. मेनेलॉस एकटाच पडल्याने मागे हटला, इतके लोक काही त्याच्याने आवरेनात. तोपर्यंत हेक्टरने पॅट्रोक्लसच्या शरीरावरील चिलखत काढून स्वतः घातले होते, कारण ते अकिलीसचे चिलखत होते शेवटी! आपल्याला तोच साईझ येतो की कसे याचा बहुतेक अंदाज घ्यायचा असावा हेक्टरला.

ते पाहताच मेनेलोसने अजॅक्सला हाक मारली, अजॅक्स येताक्षणी हेक्तर मागे हटला. तसे केल्याबद्दल ग्लॉकस नामक सेनापतीने त्याला दूषणे दिली.

ते ऐकून हेक्टरची सटकली.”तू पहाशीलच आता मी काय करतो अन कसा लढतो ते!! नाही आणली डेड बॉडी ट्रॉयमध्ये तर नावाचा हेक्टर नाही.” असे म्हणून सर्वांना ओरडून म्हणाला, “ट्रोजन्स, लिशियन्स आणि दार्दानियन्स, सर्वजण ग्रीकांशी लढा. मी आता या पॅट्रोक्लसला मारताना काढलेले अकिलीसचे चिलखत घातलेय. जो कोणी मला त्याची डेड बॉडी आणून देईल त्याला मी लुटीचा अर्धा हिस्सा देईन.”

हेक्टरबरोबर मोठी सेना डेड बॉडीपाशी आली. ट्रोजन्स लुटीला चटावलेले होते. अजॅक्स आणि मेनेलॉसला कळायचं बंद झालं.”च्यायला मेनेलॉस, हे जरा जास्तच आहे. पॅट्रोक्लसच्या डेड बॉडीचं काही का होईना, आपला जीव तरी आता वाचतो की नाही कुणास ठाऊक. हेक्टरनं चहूबाजूंनी नुस्ती गोची करून ठेवलीय. बाकीच्यांना बोलाव जा लौकर.” मग मेनेलॉसने हाका मारमारून मेरिओनेस, क्रीटाधिपती इडोमेनिअस, धाकटा अजॅक्स आणि बाकीचेही बरेच ग्रीक बोलावले अन लढाईला तोंड लागले.

ट्रोजन्स तेव्हा हटलेच असते मागे पण एनिअस नामक दबंग तरुण ट्रोजन योद्धा पुन्हा पुढे सरसावला. त्यासोबत बाकीचे ट्रोजनही पुढे सरसावले पण थोरल्या अजॅक्सने ग्रीकांना स्पष्ट बजावून ठेवले होते की कुणीही आपापली जागा सोडून जायचे नाही. त्याप्रमाणे सर्वजण एकमेकांच्या जवळ उभे राहिले. पॅट्रोक्लसच्या प्रेतावर आणि स्वतःवर ढालींचे आवरण घालून भाले पुढे सरसावून अगदी टाईट्ट फॉर्मेशनमध्ये उभे असल्याने ट्रोजनांचा मनसुबा सिद्धीस जाईना. तरी लै मुडदे पडले. कधी ट्रोजन डेड बॉडी आपल्या बाजूला ओढू पाहताहेत तर कधी ग्रीक आपल्या बाजूला. पण तेही तेवढ्यातल्या तेवढ्यात, त्या टीचभर जागेतच. कुणालाच धड मागे हलता येईना की पुढे जाता येईना. दोन्ही बाजू आपापल्या साईडच्या लोकांना आरडून ओरडून चेतवत होत्या.

आता नेक्स्ट प्लॅन काय, अशी विचारणा केल्यावर थोरल्या अजॅक्सने सांगितले, की थोरला व धाकटा असे दोन्ही अजॅक्स पुढे राहून ट्रोजनांपासून डेड बॉडीचे रक्षण करतील आणि कव्हर देतील. तेवढ्यात मेनेलॉस आणि मेरिओनेस या दोघांनी डेड बॉडी उचलून मागे घेऊन परत जावे. डेड बॉडी उचलताना दोघांना लै श्रम पडलले, कारण पॅट्रोक्लस म्हणजे काडीपैलवान नव्हता. त्याला उचलून घेऊन जाताना दोघांच्याही शरीरांतून घामाचे पाट वाहू लागले. इकडे दोन्ही अजॅक्स लोकांनी आघाडी राखून ठेवलेलीच होती. कसेबसे डेड बॉडी नेण्यात ग्रीकांना यश आले खरे पण ट्रोजनांनी लै ग्रीक मारले. दोन्ही अजॅक्स विरुद्ध एनिअस आणि हेक्टर असे लै तुंबळ युद्ध झाले.

अकिलीस आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.

इकडे नेस्टॉरचा मुलगा अँटिलोखस अकिलीसकडे गेला आणि पॅट्रोक्लस मरण पावल्याची बातमी दिली. ते ऐकून अकिलीस एकदम दु:खाच्या गर्तेत कोसळला. दोन्ही हातांत माती खुपसून स्वतःच्या डोक्यावर, चेहर्‍यावर टाकली आणि हातांनी केस ओढू लागला. ते ऐकून अकिलीसची आई थेटिस (इम्मॉर्टल अप्सरा) समुद्रातून तडक तिकडे आली. “का रडतोएस रे बाळा?”

अकिलीस उत्तरला, “रडू नाहीतर काय करू आई? प्राणापेक्षा प्रिय असा पॅट्रोक्लस मेला, आता जगून तरी मी काय करू. तो मेला तो मेलाच, शिवाय हेक्टर त्याला मारून वर माझे त्याला दिलेले कवच घालून दिमाखात फिरतो आहे. हेक्टरला ठार मारल्याशिवाय मी उजळमाथ्याने जगू शकणार नाही.”

यावर मायलेकांमध्ये एक हृद्य संवाद घडला. थेटिसनेही आपल्या दु:खाला वाट करून दिली आणि अकिलीसला सांगितले,”मी उद्या सकाळी ग्रीक विश्वकर्मा ऊर्फ व्हल्कन देवाकडून दुसरे चिलखत, ढाल अन हेल्मेट, तलवार वगैरे बनवून आणते. तोपर्यंत जरा आवर स्वतःला आणि बिगर चिलखताचा लढाईत जाऊ नकोस.”
असे म्हणून ती ऑलिंपस पर्वतावरील व्हल्कन देवाच्या घरी निघून गेली.

तोवर इकडे युद्धाचे काय झाले ते पाहू. मागील बुकात सांगितल्याप्रमाणे मेनेलॉस आणि मेरिओनेस या द्वयीने पॅट्रोक्लसची डेड बॉडी उचलून आणली खरी, पण बिचार्‍याच्या मृतदेहाभोवतीची मारामारी अजून थांबलीच नव्हती. हेक्टरने कमीतकमी तीनदा तरी त्याचे पाय ओढत ओढत त्याला ट्रॉयमध्ये नेण्याचा प्रयत्न केला आणि तितक्याच वेळा थोरल्या व धाकट्या अजॅक्सने तो बेत हाणून पाडला. पण इतके असूनही ते दोघेही हेक्टरला मागे काय हाकलू शकले नाहीत. हेक्टर एकदम हट्टालाच पेटला होता. त्याने पॅट्रोक्लसला ओढत ओढत ट्रॉयमध्ये नेलेही असते, इतक्यात-

इतक्यात अकिलीसची सटकली. तो आपल्या शामियान्यातून बाहेर युद्धभूमीजवळ आला आणि जी रणगर्जना केली त्याने ट्रोजनांचे धाबे दणाणले. मागे उभारून अकिलीस फक्त तीनवेळेस जोऽरात ओरडला. त्याच्या नुसत्या दर्शनाने ट्रोजनांची पाचावर धारण बसली. त्या गर्जनेने ट्रोजन घोडी बावचळली आणि त्या भानगडीत बारा ट्रोजन योद्धे आपल्याच रथांखाली पडले, त्यांच्या चाकांखाली येऊन आणि आपल्याच भाल्यांचे घाव लागून मरण पावले. अकिलीसला पाहून ग्रीकांना स्फुरण चढले. ट्रोजन लोक मागे हटलेले पाहून त्यांनी पॅट्रोक्लसची डेड बॉडी अखेरीस आपल्या छावणीत आणली आणि त्याच्या मृतदेहाची विटंबना अखेरीस थांबली. तेवढ्यापुरते युद्ध देखील थांबले.

ट्रोजन छावणीत आता सगळ्यांवर एक भीतीचे सावट पसरले होते. पॉलिडॅमस नामक ट्रोजनाने प्रस्ताव मांडलादेखील,”आजवर हा अकिलीस रुसून बसल्यामुळे आपल्या गमजा चालल्या होत्या, पण आज तो अखेरीस बाहेर आलाय. आता आपला सर्वनाश व्हायला वेळ नाही लागायचा. हे टाळायचे असेल तर ट्रॉयचे दरवाजे बंद करून बसून राहू. बाहेर त्याच्या घोड्यांना खायला घालायलासुद्धा त्याच्याकडे काही उरले नाही की तो झक मारत परत जाईल. आपल्या भिंती तर काही तो तोडू शकत नाही त्यामुळे असे केले तर आपण नक्कीच सुरक्षित राहू.”

यावरी हेक्टरें भणितलें,” येडा जाहलासी काये? अगोदरच ट्रॉयचा खजिना आता रिता होत चाललाय त्यात असे घाबरून आत बसलो तर सगळा बट्ट्याबोळच होणार. कुणाला आपल्याजवळच्या खजिन्याची भीती वाटत असेल तर त्यांनी गप तो लोकांत वाटून टाकावा. लोकांमध्ये उगीच भीती पसरवायचं काम नाही सांगून ठेवतो आधीच. उद्याही आपण जहाजांजवळच लढाई करूया, अकिलीस लढायला आला तर येऊदे. देवाच्या कृपेने तो मरेलसुद्धा.” याला सर्व ट्रोजनांनी अनुमोदन दिले.

इकडे ग्रीक छावणीत पॅट्रोक्लसच्या प्रेताला नीट आंघोंळबिंघोळ घालून सजवण्यात आले होते. अकिलीस विलाप करत म्हणाला, “माझीही माती आता इथेच पडायची, म्हाताराम्हातारींना मी पुन्हा भेटू शकेन असं मलाही वाटत नाही. पण भावा तुला मी काही आत्ता पुरणार नाही. हेक्टरला मारेस्तवर तर नाहीच नाही. आणि ट्रोजनांच्या कमीतकमी बारा तरी महत्त्वाच्या सेनापतींना मारल्याशिवाय मला चैन पडणार नाही.”

आता व्हल्कनने अकिलीससाठी बनवलेल्या ढालीच्या वर्णनासाठी होमरने किमान तीनचार प्यारेग्राफ खर्ची घातलेत. मथितार्थ इतकाच की लै काय काय गावभरची नक्षी त्या ढालीवर होती, ढाल मोठी अन गोलाकार होती- अन्य बर्‍याच लोकांची मात्र आयताकृती होती. नंतर चिलखत आणि हेल्मेटदेखील बनवले आणि थेटिसला दिले. ते घेऊन थेटिस तिथून निघाली.

अकिलीस आगामेम्नॉनबरोबर समेट करतो आणि युद्धाला तयार होतो.

आता अकिलीसची आई थेटिस त्याच्यासाठी व्हल्कन देवाने बनवलेले चिलखत घेऊन आली. अकिलीसने ओडीसिअस, डायोमीड, आगामेम्नॉन, इ.इ. ग्रीकांच्या सर्व अतिरथी-महारथींना बोलावले. जखमी झालेले ते सर्व लंगडत, कण्हत तसेच आले. सभा भरताच त्याने सरळ मुद्यालाच हात घातला. “हे अत्रेउसपुत्र आगामेम्नॉन, माझा तुझ्यावरचा राग आता निवळला आहे. बाकी ग्रीक योद्ध्यांना शस्त्रे घेऊन माझ्याबरोबर चलायला सांग. ट्रोजनांचा कंडका पाडू एकदाचा, हाय काय नाय काय.”

हे ऐकून ग्रीकांनी “जितं मया” च्या आरोळ्या ठोकल्या. अकिलीस लढायला लैच आतुर झाला होता पण कायम विवेक जागृत असलेल्या ओडीसिअसने त्याला सांगितले की बाबारे, बाकीच्यांना किमान खाऊ तरी दे!! मग त्यासोबतच त्याने आगामेम्नॉनलाही शपथ घ्यावयास लावली की अकिलीसच्या ब्रिसीसला त्याने हातही लावला नाही. तशी शपथ घेतल्यावर आणि तेव्हा प्रॉमिस केलेला खजिना लगेच अकिलीसच्या स्वाधीन केल्यावर अखेर समेट झाला.

नंतर अकिलिसने चिलखत अंगावर चढवले आणि जरा ट्रायल घेतली की ठीक बसतंय की नाही ते बघायला. समाधानकारकरीत्या सगळं जमल्यावर त्याने त्याचा पेलिऑन पर्वतावर खास बनवलेला भाला हातात घेतला. अकिलीस सोडून हा भाला वापरणे कुणाच्याही आवाक्याबाहेरचे होते. चांदीच्या मुठीची तलवारही घेतली आणि तो निघाला. ऑटोमेडॉन आणि आल्किमेदॉन या दोघा मॉर्मिडन लोकांनी त्याचा रथ सज्ज केला, घोडे नीट बांधले.

अकिलीसची फाईट-वातावरण पूर्णच टाईट.

अकिलीस रणभूमीवर आल्या आल्या सर्वांत आधी एनिअस आणि अकिलीस यांची अंमळ बाचाबाची झाली. अकिलीस म्हणाला, “माझ्यासमोर यायची तुझी डेरिंग झालीच कशी? मागे इडा पर्वतावर तुमच्या गायी पळवताना तू माझ्यापासून जीव वाचवत एर्नेसस शहरात पळालास. त्या शहरावरही मी हल्ला करून कब्जा केला, तिथल्या बायका ताब्यात घेतल्या. तुलाही तेव्हाच मारला असता पण देवांच्या कृपेमुळेच तू जित्ता जाऊ शकलास, नाहीतर तेव्हाच तुला कापला असता. गप मागे फीर नैतर फुकट मरशील.”

यावर एनिअस उत्तरला, “तुझ्या शब्दांनी घाबरून जायला मी काही कुक्कुलं बाळ नाहीये, काय समजलास? मीही तुझ्यासारखाच उच्चकुळातला आहे. रस्त्यात भांडणार्‍या बायकांसारखं शब्दांनी भांडत बसण्यात काही अर्थ नाही. भाल्यांनीच एकमेकांचे पाणी जोखू.”

असे म्हणून त्याने एक भाला बरोबर नेम धरून अकिलीसवर फेकला. अकिलीस क्षणभर घाबरला, त्याला वाटले भाला ढालीतून आरपार जातो की काय!! पण तो त्याच्या ढालीच्या बरोब्बर मध्यभागी लागून बाजूला पडला. मग अकिलीसनेही त्याच्यावर आपला पेलिअन पर्वतावर बनवलेला खास भाला फेकला. तो ढालीच्या एकदम कडेवर आदळून जवळून सूं सूं करत मागे पडला. एनिअसला झाले काहीच नाही, पण इतक्या जवळून भाला गेल्यामुळे तो एकदम बावचळला, गडबडला. मग अकिलीसने आपली धारदार तलवार उपसली आणि एनिअसनेही एक भलाथोरला धोंडा हातात घेतला आणि ते एकमेकांवर तुटून पडणार इतक्यात एनिअसला जणू देवानेच वाचवले आणि अकिलीसला तो दिसेनासा झाला. (बहुतेक धुळीचे वादळ आले असावे आणि त्या भानगडीत एनिअस पळाल्याने दिसेनासा झाला असावा. ट्रॉयचा उल्लेख ‘वादळी, लै वारे असलेली जागा’ म्हणून कायम येतो इलियडात.) त्यात परत हेक्टरने ट्रोजनांना ओरडून चेतवले खरे पण स्वतः अग्रभागी गेला नाही कारण अकिलीस चेकाळलाय हे दिसतच होते.

एनिअस गुल झालेला पाहून अकिलीस इतर ट्रोजनांच्या मागे लागला आणि त्याने ट्रोजनांच्या कत्तलीचा सपाटाच लावला.

इफितिऑन: याच्या डोक्यात भाला घालून कवटीचे सरळ दोन तुकडेच केले.

डेमोलिऑन: याचे हेल्मेट फोडून भाला आरपार गेला आनि “टेंपल” वर म्हणजेच डोळे आणि कपाळ यांच्या मध्ये घुसला तो कवटी भेदून गेला. मेंदूचे तुकडे बाहेर सांडले आणि जागीच ठार झाला.

हिप्पोडॅमसः हा रथातून उतरून चढाई करीत असताना याला पोटात भाला खुपसून ठार मारले.

पॉलीडोरसः हा प्रिआमचा सर्वांत लहान मुलगा होता. याला पाठीत भाला भोसकून ठार मारले.

आपला भाऊ पडलेला पाहून हेक्टर धावत आला. हेक्टर आणि अकिलीस दोघांची बाचाबाची झाली आणि हेक्टरने अकिलीसवर भाला फेकला, पण तो चुकवून अकिलीस त्याच्यावर झेपावला. तीनवेळा झेपावूनही हेक्टरने त्याचा वार चुकवला. चौथ्यांदाही असेच झाले तेव्हा हेक्टरला शिव्या घालून अकिलीस अन्य ट्रोजनांमागे गेला आणि अजूनही बरेच लोक मारले.

ड्रायॉप्सः याच्या मानेच्या मध्यभागी भाला खुपसून ठार मारले.

देमुखसः याच्या गुडघ्यात भाला खुपसून जायबंदी केले आणि तलवारीने प्राण घेतला.

लाओगोनस आणि दार्दॅनसः या दोहोंना रथातून खाली फेकले आणि लाओगोनसला भाला फेकून ठार केले तर दार्दॅनसचा हातघाईच्या लढाईत मुडदा पाडला.

ट्रॉस: हा बिचारा अकिलीसचा गुडघा पकडून प्राणांची भीक मागत होता त्याला पाहताक्षणी, परंतु पाषाणहृदयी अकिलीसने सरळ त्याच्या यकृतात तलवार खुपसली. यकृत बाहेर आले आणि काळसर रक्तही जमिनीवर इतस्ततः पसरले आणि तो तसाच निश्चेष्ट पडून साहिला.

मुलियसः याच्या एका कानातून भाला खुपसला तो आरपार दुसर्‍या कानातून बाहेर आला. जागीच खलास झाला.

एखेलसः याच्या डोक्यावर तलवारीने इतका जोराचा वार केला की कवटी फुटून तलवार रक्ताने लाल झाली. तसाच कोसळला.

ड्यूकॅलियनः याला कोपरावर भाला मारून जखमी केल्यावर बिचारा दोन्ही हात उभावून होष्यमाणाची वाट पाहत होता. त्याचे तलवारीने डोके उडवून फेकून दिले. पाठीचा कणा अंमळ मांसातून डोकावू लागला आणि बरेच रक्त वाहू लागले.

र्‍हिगमसः याच्या पोटात भाला खुपसून रुतवल्याने तो रथातून खाली कोसळला आणि मेला.

आरेइथूसः हा र्‍हिगमसचा सारथी होता. त्यालाही पाठीत भाला खुपसून रथातून ओढून काढले. त्याचे घोडे भीतीने खिंकाळू लागले.

शेतात पिकलेल्या धान्यावर बैल चालून त्यातला कोंडा इ. घटक वेगळे करतात त्याप्रमाणे अकिलीसच्या रथाचे घोडे कायम मृतदेह तुडवत होते. त्याच्या रथाची चाकं रक्ताने माखली होती. चहूबाजूने कत्तल करून करून अकिलीस त्याच्या शस्त्रांसमवेत रक्ताने न्हाऊन निघाला होता.

अकिलीस ट्रोजनांनी पूर्ण चटणी उडवतो.

आता अकिलीसच्या फाईटने वातावरण पूर्णच टाईट झालेले होते. त्यात अकिलीसपुढे घाबरून पळणार्‍या ट्रोजनांचे दोन भाग पडले: एक भाग ट्रॉय शहरात जाऊ पाहत होता तर दुसरा खँथस नामक ट्रॉयच्या जवळच असलेल्या नदीपाशी अडकला होता. नदीतील भोवर्‍यांचा सामना करत अकिलीसपासून वाचण्याची पराकाष्ठा करणार्‍या ट्रोजनांची पार तारांबळ उडाली होती. नदीकाठी आपला रथ आणि भाला ठेवून अकिलीस ढालतलवारीनिशी नदीत उतरला. एखाद्या डॉल्फिन माशापुढे लहान मासे पळावेत तसे ट्रोजन्स अकिलीसपुढे पळत होते. लोकांना मारता मारता अकिलीसचे हात भरून आले. त्यानंतर त्याने १२ ट्रोजन तरुणांना नदीतून बाहेर जिवंतच ओढून काढले-एखादी कोंबडी हातात पकडावी तसा तो त्यांना ओढून काढत होता. त्याने त्यांचे हात मागच्या बाजूस बांधले, आणि आपल्या सैनिकांच्या स्वाधीन केले. हे बाराजण पॅट्रोक्लससाठी “सॅक्रिफाईस” म्हणून अकिलीसच्या शामियान्यात नेले गेले. तिथे त्यांना नंतर मारले जाणार होते. तिथेच त्याला लियाकॉन नामक प्रिआमचा अजून एक पुत्र दिसला. लै वर्षांमागे त्याने त्याला पकडले होते-अकिलीसच्या द्राक्षबागेत चोरी करताना-आणि गुलाम म्हणून विकले होते लेम्नॉस बेटात. इतक्या वर्षांनी तो परत दिसला तेव्हा अकिलीसला महदाश्चर्य वाटले. पण त्याने शेवटी मानेत तलवार खुपसून लियाकॉनचा जीव घेतला. त्याच्या विनवणीकडे जरासुद्धा लक्ष दिले नाही.

त्यानंतर अकिलीसचे लक्ष अ‍ॅस्टेरोपाइउस नामक ट्रोजन योद्ध्याकडे गेले. अंमळ बाचाबाची होऊन युद्धाला तोंड लागले. अ‍ॅस्टेरोपाइउस हा दोन्ही हातांनी भालाफेक करू शकायचा. पहिल्यांदा त्याने फेकलेला भाला अकिलीसच्या ढालीवर आदळून खाली पडला. मग दुसरा भाला फेकला, तो अकिलीसच्या कोपराला लागून रक्त आले!! अकिलिसचा जमिनीत खोवलेला भाला उपसण्याचा तीनवेळा निष्फळ प्रयत्न त्याने केला पण अकिलीस तेवढ्यात त्याच्यावर झेपावला आणि पोटात बेंबीजवळ तलवार खुपसून त्याने त्याचा जीव घेतला. अ‍ॅस्टेरोपाइउसची आतडी बाहेर आली आणि रक्त जमिनीवर पसरले.

त्यानंतर अकिलीसने थर्सिलोखस, मिडॉन, आस्टिपिलस, म्नेसस, थ्रॅसियस, ओनेउस आणि ओफेलेस्टेस या ट्रोजनांना मारले. अजूनही कैक ट्रोजनांना मारले असते, पण तेवढ्यात खँथस नदीने मानवरूपात येऊन त्याला विनंती केली, “बाबारे आता तरी कत्तल थांबव. लै प्रेतं पडलीत माझ्या पाण्यात अन सगळं नुसतं तुंबून गेलंय.”

त्यावर अकिलीस इतकेच म्हणाला की हेक्टरला मारल्याशिवाय ही कत्तल थांबणे अशक्य. मग नदी चिडली आणि अकिलीसच्या मागे लागली. नदीतून बाहेर निघताना अकिलीसची पुरेवाट झाली, बुडतो का काय असे वाटेपर्यंत एकदाचा तो तिथून बाहेर निघाला.

ट्रॉयचा राजा प्रिआम हा अकिलीसने चालवलेले हे ट्रोजनसत्र एका उंच बुरुजावर उभा राहून पाहत होता. अकिलीसच्या भयाने शहरात धावत येणार्‍यांसाठी सगळी दारे खुली ठेवा अशी त्याने आज्ञा केली.

तेवढ्यात आगेनॉर नामक ट्रोजन सेनापतीने अकिलीसला आव्हान दिले आणि त्याच्या पायावर भाला फेकला. पण चिलखत असल्याने भाला नुस्ताच पायाला लागून खाली पडला. प्रत्युत्तरादाखल अकिलीस त्यावर झेपावला पण आगेनॉर गोंधळाचा फायदा घेऊन तोपर्यंत निसटला होता. बाकीचे लोक कुणाचं काय झालं याची कणमात्रही फिकिर न करता जीव वाचवण्यासाठी शहरात धावत होते.

हेक्टर-अकिलीस सामना आणि हेक्टरचा मृत्यू.

अकिलीस ट्रोजनांची चटणी उडवत असलेला पाहून प्रिआमने ट्रॉयचे दरवाजे उघडे ठेवण्याची आज्ञा केली होतीच. अकिलीसशी लढायला हेक्टरने जाऊ नये म्हणून त्याने परोपरीची विनवणी केली. लै हृदयद्रावकपणे त्याने हेक्टरला विनवले. ( होमरने करुणरस ओतलाय तिथे फुल.) पण त्याचा हेक्टरवर काही परिणाम झाला नाही. हेक्टरची आई हेक्युबा हीदेखील अन्य स्त्रियांसमवेत विलाप करू लागली, पण हेक्टरचे मन वळवण्यात कुणालाही यश आले नाही.

आणि ते साहजिकच होते म्हणा. हेक्टरच्या मनात चुल चलबिचल चालली होती. “आत जाऊ की नको? आत गेलो तर पॉलिडॅमस मला सगळ्यांसमोर शिव्या घालेल-कालपरवा फुरफुरत होतास आणि आज नांगी टाकलीस म्हणून. मग माझी सर्वांसमोर छी:थू होईल! नकोच ते. समजा मी सर्व शस्त्रे त्यागून अकिलीससमोर गेलो तर काय होईल? तो माझे ऐकेल ही शक्यतादेखील कमीच वाटते. समजा या सर्व युद्धाचे मूळ असलेल्या हेलेनला परत देऊन वर ट्रॉयचा निम्मा खजिना ग्रीकांना ऑफर केला तर? मी ट्रोजनांना गप करू शकतो म्हणा तसं, पण बिनहत्यार असताना अकिलीसकडे गेलो तर मला तो एखाद्या स्त्रीला मारावे तितक्या आरामात ठार मारेल. त्यापेक्षा राहूदे, गप त्याच्याशी लढतो. काय निकाल लागतो तो लागूदे एकदाचा.”

असा विचार करत असतानाच अकिलीस त्याच्यावर झेपावला. त्याच्या उजव्या हातात भाला होता. त्याचा आवेश बघून हेक्टर घाबरला आणि पळू लागला. त्याच्या मागे चपळ अकिलीस वेगाने पाठलाग करू लागला-एखादा ससाणा भक्ष्यावर झेपावावा तसा. ट्रॉयच्या भिंतीजवळून या कडेपासून त्या कडेपर्यंतच्या नदीजवळून तीन वेळा तरी हा पाठलाग चालला. हेक्टर ट्रॉयच्या गेटजवळ जायचा कारण आपले लोक वरून अकिलीसवर शस्त्रे फेकतील असे त्याला वाटायचे. गेटच्या जास्तच जवळ जातोय असे वाटले की अकिलीस त्याला बाहेरच्या मैदानाच्या बाजूस हाकलायचा. हेक्टर अकिलीसपासून दूर जाऊ शकला नाही आणि अकिलीसही त्याला पकडण्याइतपत जवळ गेला नाही. शिवाय अकिलीसने ग्रीक सैन्याला खूण करून अगोदरच बजावून ठेवले होते, की कोणीही हेक्टरवर भाला, तलवार, बाण, धोंडा,इ. पैकी कशानेही हल्ला करावयाचा नाही म्हणून. हेक्टरला मारण्यापासूनची दिगंत कीर्ती अकिलीसला फक्त आणि फक्त स्वतःसाठी पाहिजे होती.

अखेरीस पळापळ थांबली. डेइफोबस नामक हेक्टरचा भाऊ त्याच्या मदतीला आला आणि दोघांनी मिळून अकिलीसचा सामना करावा असे ठरले. मग हेक्टरचे डेरिंगही वाढले, कारण बाकीचे लोक शहराच्या आत पळत असताना बाहेर राहणे सोपे काम नव्हे. पण अकिलीस चालून येतेवेळी मात्र तो कुठे दिसेनासा झाला.

(मिनर्व्हा देवी डेइफोबसच्या वेषात येते इ. वर्णन आहे त्याजागी प्रत्यक्षात काय घडले असावे हा माझा तर्क मांडतो आहे. बाकी आहे तसेच लिहिले आहे.)

शेवटी अकिलीस आणि हेक्टर समोरासमोर आले. हेक्टर अकिलीसला म्हणाला,”हे अकिलीस, तुझ्यापासून मी तीनवेळेस पळालो, पण आता नाही. आता एक तर मी मरेन नाहीतर तुला तरी मारीन. चल दोघांनी प्रतिज्ञा करू, की आपल्या युद्धात जो जिंकेल त्याने पराभूताच्या प्रेताची कुठल्याही प्रकारे विटंबना करू नये.”

आधीच पॅट्रोक्लसला मारल्यामुळे अकिलीसचा हेक्टरवर राग होता, त्यात त्याच्या प्रेताची इतकी विटंबना केल्यावर हेक्टरकडून असा प्रस्ताव ऐकल्यावर अकिलीसची सटकेल नाहीतर काय!!! तो सरळ गुरकावला, “मूर्खा!!!! (खरे तर ग्रीक भाषेतल्या शिव्या असाव्यात, पण इलियडमध्ये शिव्या कधी दिसत नाहीत. नुस्ती कापाकापी चालू असताना शिव्यांची गरज ती काय म्हणा. व्हाय कर्स व्हेन यू कॅन किल?) प्रतिज्ञा वगैरे भाकडकथा माझ्यापुढे बोलू नकोस. सिंह आणि माणूस एकमेकांशी कधी करार करतात का? लांडगे आणी मेंढ्यादेखील एकमेकांशी करारमदार करीत नाहीत, उलट एकमेकांचा कायम कट्टरपणे द्वेषच करतात. त्यामुळे आपल्या दोघांत असला करारबिरार विसरून जा. तुझ्यात असेल नसेल तितकी पूर्ण ताकद पणाला लाव, बघू काय दम तुझ्यात ते. पॅट्रोक्लस आणि इतर माझ्या मित्रांना मारून तू जे दु:ख मला दिलंयस त्याची पूर्ण भरपाई मी आज करणार आहे, याद राख.”

असे म्हणून अकिलीसने हेक्टरवर भाला फेकला आणि युद्धाला तोंड लागले. हेक्टरने वाकून तो भाला चुकवला आणि म्हणाला, “नेम चुकला रे तुझा अकिलीसा!!! मोठा टिवटिव करत होतास ना की मी तुझ्यापुढे गर्भगळित होईन आणि पळून जाईन म्हणून?? आता घे माझा भाला, बघू चुकवतोस की कसा ते. तू मेलास तर ट्रोजन लोक सुटकेचा नि:श्वास सोडतील, कारण तुझ्याइतकी हानी आम्हांला कोणीच पोचवलेली नाही.”

असे म्हणून हेक्टरने अकिलीसवर भाला फेकला. तो त्याच्या ढालीच्या बरोब्बर मध्यभागी लागून रिबाउंड झाला. भाला व्यर्थ गेल्यावर हेक्टर चिडला, कारण दुसरा भाला त्याच्याकडे नव्हता. “डेइफोबस! डेइफोबस!!” हाका मारल्या पण डेइफोबस होता कुठे? “च्यायला, डेइफोबस तर आत तटाआड आहे. मी काय करू आता? मरण तर अटळ दिसते आहे, पण मरण्याआधी काहीतरी मोठे काम करून मगच मरतो.”

असा विचार करून हेक्टरने आपली मोठी धार्दार तलवार उपसली आणि अकिलीसच्या दिशेने झेपावला. अकिलीसही त्याच्यावर झेपावला. त्याच्या उजव्या हातात स्पेअरवाला दुसरा भाला होता. हेक्टरच्या कवचावरून अकिलीसने एक नजर फिरवली. पॅट्रोक्लसला दिलेले अकिलीसचेच कवच होते, ते हेक्टरने घातले होते. एक गळा सोडला तर बाकी सर्व काही प्रोटेक्टेड होते. ती जागा बरोब्बर हेरून अकिलीसने हेक्टरच्या गळ्यात भाला खुपसून त्याला खाली पाडले. हेक्टर मरणार हे फिक्स होतेच, पण तो अजून बोलू शकत होता कारण गळ्यातून भाला खोल गेला तरी स्वरयंत्र इ. शाबूत होते.

अकिलीस मरणाच्या दारातल्या हेक्टरला म्हणाला, “मर मूर्खा. मी जित्ता असताना पॅट्रोक्लसचा जीव घेताना आपण सहीसलामत वाचू असं वाटलं काय तुला? आता तू मेल्यावर ग्रीक लोक पॅट्रोक्लसचे अंत्यसंस्कार विधिवत करतील, पण तुझं प्रेत मात्र कुत्र्यागिधाडांना खाऊ घालेन मी.”

हेक्टरने अकिलीसला विनवले, “प्लीज असं काही करू नकोस, माझे आईबाबा तुला माझ्या बदल्यात मोठा खजिना देतील तो घे, पण मला ग्रीकांच्या कुत्र्यांना खायला घालू नको. माझे अंत्यसंस्कार नीट करू देत त्यांना प्लीज.”

अकिलीस अजूनच चिडून उत्तरला, “गप ए कुत्र्या. बुढ्ढ्या प्रिआमने तुझ्या वजनाइतकं सोनं दिलं किंवा त्याच्या वीसपट खजिना दिला तरी मी तुला सोडणार नाही. आत्ताच तुझे तुकडेतुकडे करीन मला वाटलं तर.”

हेक्टर म्हणाला,”मला माहितीच होतं, तुझ्यासारख्या पाषाणहृदयी माणसापुढे माझा इलाज चालणारच नाही. पण ट्रॉयच्या स्कीअन दरवाज्याजवळ अपोलो देव तुला मारेल हे नक्की. ती अवकृपा ओढवून घ्यायची असेल तर बघ.”

हे बोलून तो मरण पावला. त्यानंतर अकिलीसने त्याच्या गळ्यातून भाला उपसून काढला आणि त्याचे हेल्मेट व चिलखत काढून घेतले. त्याचे मॉर्मिडन सैनिक हेक्टरच्या शवाजवळ हळूहळू एकेक जमू लागले आणि त्याच्या शवाला भाल्याने जखमा करू लागले. “हेक्टरचा सामना करणं आता सोप्पंय!!!” करत चीत्कारू लागले.

त्यानंतर अकिलीस सर्वांना उद्देशून म्हणाला, “ट्रोजन लोक हेक्टरला देवासारखा मानत होते, त्याला मारून आपण मोठा विजय मिळवला आहे. यानंतर ते लढतील की शरण येतील हे पहा. पण त्याआधी पॅट्रोक्लसचे अंत्यसंस्कार करू चला.” असे म्हणून त्याने हेक्टरच्या दोन्ही पायंच्या घोट्याजवळच्या मांसल भागाला भोके पाडली आणि त्यांतून बैलाच्या कातड्यापासून बनवलेला दोर आरपार घालून रथाला बांधून हेक्टरला रथामागे फरपटत नेले. रथाचे घोडे दौडत होते, आणि हेक्टरचे काळे केस इतस्ततः अस्ताव्यस्त पसरून भेसूर दिसत होते. ही अप्रतिष्ठा थांबवायचे धाडस कुणातही नव्हते.

इकडे हेक्टर पडल्याचे कळताक्षणी त्याची आई हेक्युबाचा आकांत कळसाला पोहोचला. बाप प्रिआम तर पागल झाला होता, कुणालाही आवरेना. “मी एकटाच जातो त्या निष्ठुर अकिलीसकडे आणि हेक्टरचे शव परत मागतो. त्याने माझी कितीतरी पोरं मारलीत आजवर, पण हेक्टर माझा सगळ्यांत प्रिय होता. मरेस्तोवर ही बोच माझ्या हृदयात कायम राहणार.”

पण हेक्टरपत्नी अँन्द्रोमाखी हिला अजूनपर्यंत पत्ताच नव्हता आपला नवरा मेलाय त्याचा. बिचारीने युद्धाहून परत आल्यावर हेक्टरला आंघोळीसाठी गरम पाणी तापवावे म्हणून एका मोठ्या कढईची तजवीज केली होती. ती त्याची आतुरतेने वाट पाहत होती. एवढ्यात आपल्या सासूचा विलाप ऐकून तिला अभद्र शंका आली आणि ती पळत पळत तिकडे गेली. बातमी कळाल्यावर तिच्या दु:खाला पारावार राहिला नाही. नाना परीच्या आठवणी काढत ती शोक व्यक्त करू लागली. अख्ख्या ट्रॉयभर सुतकी शोकमय वातावरण होते. हेक्टर सर्व ट्रोजनांचा लाडका होता, त्यामुळे तो मेल्यावर सर्व ट्रोजनांना अपरंपार दु:ख झाले होते.

इथे इलियडचे २२ वे बुक संपते.

(अकिलीसचे म्हणून ब्रॅड पिटचे फोटो दिलेत खरे पण माझ्यासाठी पिटने साकारलेला अकिलीस हा बर्‍यापैकी होमरच्या अकिलीसजवळ जातो. 🙂 असो. )

Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | यावर आपले मत नोंदवा

ट्रोजन युद्ध भाग २.३-इलियडमधील हेक्टरपर्व आणि पॅट्रोक्लसचा मृत्यू.

सर्वप्रथम या लेखमालेतला हा चौथा भाग येण्यास कल्पनातीत उशीर झाला त्याबद्दल सर्व वाचकांची क्षमा मागतो. कधी हे नैतर ते अशी नाना खेकटी मध्ये आल्यामुळे फार वेळ गेला. पण गेले काही दिवस काम सुरू असून आता ही लेखमाला लौकरच वेग घेऊन संपेल याची ग्वाही देतो. पुढचा लेख तयार आहे, लगेच टाकणारही आहे. यापुढे असे होणार नाही. प्रॉमिस!

इतक्या मोठ्या लॅगनंतर वाचायचे म्हटल्यावर त्रास होणारच, सबब वाचकांना विनंती आहे की जमल्यास आधीचे तीन भाग कृपया वाचले तर उत्तम. न जमले तर भाग १ वाचला तरी ठीक.

तर या भागात इलियडच्या बुक क्र. ११ ते १६ पर्यंत वर्णन आहे. आत्तापर्यंत पाहिल्याप्रमाणे विविध ग्रीक आणि ट्रोजन वीरांनी मोठा पराक्रम गाजवला. मागील भागाच्या शेवटी शेवटी डायोमीड अन ओडीसिअसने रात्रीच्या अंधारात जाऊन ट्रोजनांच्या साथीदारांची चांगलीच कत्तल उडवली होती.

आगामेम्नॉन, डायोमीड, ओडीसिअस, हेक्टर, इ. वीरांचा पराक्रम.

दुसर्‍या दिवशी सकाळी लढाई सुरू झाली. आगामेम्नॉनचे चिलखत किती भारी अन बूट किती भारी, कुठल्या दैवी ब्रँडचे होते, इ. चर्चा करून होमरबाबा आपणही अखिल-ब्राँझयुगीन-यवन-ब्रँड-कॉन्शस असल्याचे दाखवून देतात.

तर आता अ‍ॅगॅमेम्नॉन तयार होऊन युद्धाला निघाला, त्याच्या पाठोपाठ अख्खी सेना निघाली. समोर ट्रोजन सेनाही सज्ज होतीच. हेक्टर, एनिअस, पॉलिडॅमस, आणि अँटेनॉरचे तीन मुलगे पॉलिबस, आगेनॉर आणि अकॅमस हे त्यांचे मुख्य सर्दार होते. यथावकाश लढाईला तोंड लागले.

आज पहिल्यांदा अ‍ॅगॅमेम्नॉन फॉर्मात होता. त्याने बिएनॉर या ट्रोजन योद्ध्याला आणि त्याचा सारथी ऑइलिअस या दोघांना भाला फेकून ठार मारले. ऑइलिअसच्या कपाळातून भाला आरपार गेला. नंतर तो इसस आणि अँटिफस या दोघा प्रिआमच्या पुत्रांमागे लागला. इससच्या छातीत तर अँटिफसच्या कानाजवळ डोक्यात भाला खुपसून त्याने दोघांना ठार मारले. आणि रथातून बाहेर फेकून चिलखते काढून घेतली. नंतर पिसांडर आणि हिप्पोलोकस या दोघा सख्ख्या भावांनाही ठार मारले. पिसांडरला रथातून खाली पाडून त्याच्या छातीत भाला खुपसला. ते पाहून हिप्पोलोकस पळू लागला, तर अ‍ॅगॅमेम्नॉनने त्याचे दोन्ही हात कापले आणि डोके उडवले. ते डोके घरंगळत ट्रोजन फौजेजवळ गेले, ते पाहून ट्रोजनांची भीतीने गाळण उडाली. अ‍ॅगॅमेम्नॉनसोबत ग्रीक फौज पुढेपुढेच निघाली. ट्रोजन घाबरून पळत होते त्यांची यथास्थित मुंडकी उडवण्यात येत होती. ट्रॉयच्या स्कीअन गेट नामक दरवाजाजवळ आल्यावर ग्रीक फौज बाकीच्यांची वाट बघत अंमळ थांबली.

थोड्या वेळात बाजूने रथात बसलेल्या हेक्टरच्या नेतृत्वाखाली ट्रोजन फौजही मोठी गर्जना करत आली. ग्रीक आता सरसावले आणि ट्रोजनांनी आक्रमक पवित्रा घेतला. लढाईला पुनश्च एकवार तोंड लागले. अँटेनॉर या प्रसिद्ध ट्रोजन योद्ध्याचा मुलगा इफिडॅमस आणि अ‍ॅगॅमेम्नॉन यांची लढाई सुरू झाली. इफिडॅमसने अ‍ॅगॅमेम्नॉनच्या छाती-पोटावरच्या गर्डलवर भाला फेकला पण गर्डल भेदले गेले नाही. उलट अ‍ॅगॅमेम्नॉनने त्यावर पुन्हा चढाई केली आणि मानेवर तलवारीने घाव घालून त्याचा खातमा केला, त्याचे चिलखत काढून घेतले. हे पाहून इफिडॅमसचा भाऊ कून तिथे आला आणि त्याने सरळ अ‍ॅगॅमेम्नॉनच्या उजव्या कोपराजवळ भाला खुपसून त्याला जखमी केले आणि इफिडॅमसचे शव ट्रोजन साईडला ओढत नेऊ लागला. अ‍ॅगॅमेम्नॉन लै कळवळला, पण तेवढ्यात त्याने कूनला भाला खुपसून ठार मारले आणि त्याचे मुंडके उडवले. भाल्याची जखम ओली असेपर्यंत अ‍ॅगॅमेम्नॉन भाले, भलेथोरले धोंडे , इ. नी लढतच होता, पण नंतर जखम सुकल्यावर मात्र त्याला त्या कळांनी कळायचं बंद झालं. होमरची उपमा इथेही मार्मिक आहे- तो म्हणतो की प्रसूतिवेदनांसारख्या वेदना त्याला झाल्या. (प्रसूतीसाठी एक शेप्रेट प्रकारच्या देवीही ग्रीक पुराणांत आहेत हे पहिल्यांदा होमरमध्येच कळतं- नाव आहे Eilithuiae- इलिथिआए). शेवटी तो रथात बसून आपल्या जहाजात परत गेला आणि इतरांना लढण्याविषयी बजावले.

इकडे अ‍ॅगॅमेम्नॉन परत गेल्याचे पाहून हेक्टरला अजूनच स्फुरण चढले. त्याने ट्रोजन सैन्याला धीर दिला आणि अनेक ग्रीक योद्ध्यांना हेडिससदनी पाठवले. रानडुकराच्या शिकारीत कुत्री जशी डुकराचा पाठलाग करतात तसे ट्रोजन ग्रीकांमागे लागले होते. हेक्टरने असाइउस, ऑटोनुस, ओपितेस, डोलॉप्स, ऑफेल्टियस, आगेलाउस, एसिम्नस, ओरस, हिप्पोनूस या नऊ ग्रीक सेनानींना एका झटक्यात ठार मारले. अजूनही बर्‍याच ग्रीकांच्या रक्ताने त्याचे हात लाल झाले आणि ग्रीक सेनेत हाहा:कार पसरला.
तो पाहून ओडिसिअस आणि डायोमीड उभे राहिले. त्यांनी काही ट्रोजनांना ठार मारले, त्यामुळे ग्रीकांना थोडा “ब्रीदिंग टाईम” मिळाला हेक्टरपासून. त्या दोघांमुळे ट्रोजन सैन्यात उडालेला गदारोळ पाहून हेक्टरने आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला. हेक्टरवर नीट नेम धरून डायोमीडने भाला फेकला, पण त्याचे ब्राँझचे हेल्मेट न भेदता भाला तसाच खाली पडला. हेक्टरला इजा झाली नाही, पण भाल्याच्या आघाताने त्याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि तो दुसर्‍या बाजूला गेला. आपला भाल्याचा प्रहार वाया गेला हे पाहून डायोमीड पुन्हा एक भाला घेऊन ट्रोजन सैन्यात समोरच्या ट्रोजनांचे शिरकाण करत घुसला. एकाचे चिलखत काढून घेत असतानाच डायोमीडच्या उजव्या पायात एकाने अचानक बाण मारला. बाण कुठून आला हे पाहिले तर बुळगटशिरोमणी पॅरिसने मारला होता!!! युद्धभूमीवर एक स्मारक होते त्याच्या आड लपून त्याने हा बाण मारला होता.

“तुझे नशीब बरे म्हणून तुला पायात लागला, नैतर पोटात लागून तू मेला असतास”, असे म्हणून पॅरिस कुत्सित हसू लागला. डायोमीड उलट फणकारला, “तुझ्यासारखा पेद्रट भित्रा मला काय शष्प इजा करू शकणारे? असल्या खरवडींना आम्ही दाद देत नाही.” हे जाबसाल होताच डायोमीडच्या मदतीला ओडीसिअस आला. तो ट्रोजनांशी लढत असताना डायोमीड हळूहळू आपल्या रथाकडे गेला आणि जखमेवर उपचार करण्यासाठी परत जहाजाकडे गेला. आता ओडीसिअस जवळपास एकटा पडला होता, ट्रोजनांपासून त्याला वाचवायला कोणी नव्हते. पण ओडीसिअस काही कमी नव्हता, शर्थीने आपली पोझिशन कायम राखून त्याने बर्‍याच ट्रोजनांना मारले. सोकस नामक ट्रोजनाने ओडीसिअसवर नेम धरून भाला फेकला. तो ढाल आणि चिलखत भेदून छातीला लागला. थोडे मांस भेदले गेले आणि रक्त येऊ लागले, पण तो प्राणघातक वार नव्हता. मग ओडीसिअस सोकसच्या मागे लागला. सोकस पळू लागला, पण त्याच्या पाठीवर अचूक नेम धरून ओडीसिअसने भाला रेमटवला. तो छातीच्या आरपार जाऊन सोकस कोसळला.

आता ओडीसिअसच्या जखमेतून रक्त आलेले ट्रोजनांना दिसल्यावर त्यांनी ओडीसिअसवर हल्ला केला. ओडीसिअसने मदतीची आरोळी ठोकली, ती ऐकून थोरला सांड अजॅक्स त्याच्या मदतीला आला. अजॅक्सने कव्हर दिल्यावर मग जखमी ओडीसिअसला मेनेलॉसने परत नेले. अजॅक्सने डोरिक्लस, पँडोकस, लायसान्द्रस, पिरॅसस आणि पिलार्तेस या मुख्य ट्रोजन योद्ध्यांना आणि बर्‍याच इतर सैनिकांना ठार मारले.

हे सगळे चालू असताना हेक्टर हा लढाईच्या दुसर्‍या टोकाला होता. नेस्टॉर, क्रीटाधिपती इडोमेनिअस यांच्याबरोबर लढाई ऐन रंगात आली होती. पॅरिसने मॅखॉन या ग्रीक योद्ध्याला उजव्या खांद्यात तीन टोकांचा बाण मारून जखमी केले होते. मॅखॉन हा योद्ध्याबरोबरच वैद्यराज असल्याने इडोमेनिअस म्हणाला की आधी याला मागे न्या. बाकीचे मेले तरी चालेल पण वैद्य जगला पाहिजे. मग नेस्टॉर त्याला घेऊन मागे फिरला.

खंदक ओलांडून ट्रोजन आत घुसतात आणि घमासान लढाई होते.

पॅट्रोक्लस हा जखमी युरिप्लस नामक ग्रीक योद्ध्यावर जरा उपचार करीत होता. त्याच वेळी ग्रीकांच्या जहाजांभोवती खणलेला खंदक पार करून जहाजांपर्यंत घुसण्यासाठी ट्रोजन सेना जिवाचे रान करीत होती. खंदकापलीकडचा तट भेदून आत जाण्यासाठी ट्रोजनांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्या अग्रभागी अर्थातच हेक्टर होता. ट्रोजन सैन्यात बरेच रथदळ होते. खंदकावरून उडी मारून लगेच पलीकडे जावे म्हटले तर ते इतके सोपे काम नव्हते. पलीकडल्या बाजूला लाकडाचे टोकदार वासे बरोब्बर अँगलमध्ये उभे करून ठेवले होते. कोणी उडी मारायचा अवकाश, ते वासे एकतर आरपार तरी गेले असते किंवा पूर्ण आत घुसून त्या बिचार्‍याचा “सीख कबाब” तरी झाला असता. शिवाय तटाच्या बुरुजाबुरुजांवर ग्रीक सैनिक भाले-दगड इ. घेऊन मारामारीला सज्जच होते. ते सर्व पाहून ट्रोजनांचे घोडे भीतीने खिंकाळू लागले. शेवटी घोड्यांना सारथ्यांकडे सोपवून आपण पायउतार होऊन पुढे जावे असा सल्ला पॉलिडॅमस नामक ट्रोजन वीराने हेक्टरला दिला. त्याबरहुकूम मग ट्रोजन सेना निघाली- ५ तुकड्यांत विभागून ती खालीलप्रमाणे.

तुकडी क्र. प्रमुखांची नावे

१ हेक्टर, पॉलिडॅमस आणि सेब्रिऑनेस.
२ पॅरिस, अल्काथूस आणि अ‍ॅगेनॉर.
३ हेलेनस, डेइफोबस आणि एसियस.
४ एनिअस आणि अँटेनॉरचे दोन मुलगे- आर्किलोकस आणि अकॅमस.
५ सार्पेडॉन आणि ग्लॉकस व अ‍ॅस्टेरोपाइउस.

अशी ही सेना घेऊन सगळेजण हल्ला करायला निघाले. आता हळू हळू ट्रोजन्स आत घुसत होते आणि ग्रीकांना जहाजांभोवती कोंडाळे करून स्वतःचे संरक्षण करणे भाग पडत होते. इकडे हेक्टर आणि पॉलिडॅमसच्या हाताखालची तुकडी अजून खंदकाजवळच कन्फ्यूज्ड होऊन उभी होती. इतक्यात त्यांना आकाशात एक गरुड दिसला. त्याच्या पंजात एक लालसर रंगाचा साप होता आणि तो अजूनही जिवंत होता-वळवळत होता. अचानक सापाने गरुडाला डंख मारला. त्या आकस्मिक हल्ल्याच्या वेदनेने त्रस्त होऊन गरुडाने सापाला तसेच सोडून दिले आणि उडून गेला. तो साप त्या तुकडीच्या अगदी जवळच जमिनीवर पडला.

हा तर नक्कीच अपशकुन होता. आता काही अर्थ नाही, गप परत फिरू. समजा लढायला गेलो तरी लै लोक मरतील असे पॉलिडॅमसने हेक्टरला सांगितल्यावर हेक्टर लै खवळला. “शकुन-बिकुन गेला गा-च्या गा-त!!!काय डोक्यावर पडलायस की काय? स्वतःच्या देशासाठी प्राणपणाने लढणे हाच काय तो एकमेव शकुन आहे. तू घाबरला तर नाहीयेस ना? आम्ही सगळे मेलो तरी तू मरायचा नाहीस, कारण तू न लढता पळूनच जाशील. इतःपर तू पळून गेलास किंवा अजून कुणाला पळून जाण्यास भाग पाडलेस तर माझ्याशी गाठ आहे. एका भाल्यात गार करीन.” अशी सज्जड धमकी त्याने पॉलिडॅमसला दिली.

हेक्टरचे नवसंजीवनी देणारे शब्द ऐकून ट्रोजन तुकडीही खवळली होती. त्याच आवेशात ते सर्वजण ग्रीकांच्या तटाजवळ आले. भिंतीचा काही भाग अन काही बुरुज सरळ पाडून टाकले (माती+लाकूड असल्याने ते जमले नपेक्षा जमणे पॉसिबल इल्ले.) आणि भिंत पाडण्यासाठी रेटा लावू लागले तरी उरलेल्या बुरुजांवर व जवळपास ग्रीक सैनिक होते तस्से अडिग राहिले, ट्रोजनांवर भाले-बरची-दगडे फेकतच राहिले. ग्रीकांना प्रेरणा देण्यासाठी थोरला आणि धाकटा अजॅक्स हे दोघेही इकडेतिकडे पळापळ करीत होते. रणगर्जना, तलवारींची खणाखणी, भाले खुपसल्यावर वेदनांचे आवाज, दगड आणि ढालींचा एकमेकांवर आघात झाल्यावरचा आवाज, यांनी पूर्ण वातावरण भरून गेले होते.
तरीही आत घुसण्यात अजूनही यश आलेले नव्हते. सर्व गेट्स बंद होती आणि ट्रोजन्स आत घुसण्याचा जिवापाड प्रयत्न करीत होते. आता सार्पेडॉन एकदम फॉर्मात आला. ग्लॉकस व लिशियन योद्ध्यांना बरोबर घेऊन एकदम निकराचा हल्ला त्याने चालविला.

ते पाहून मेनेस्थेउस नामक ग्रीकाची फाटली आणि त्याने दोन्ही अजॅक्स लोकांची मदत घेण्यासाठी त्यांच्याकडे एक मेसेंजर पाठविला. धाकट्या अजॅक्सला आहे तिथेच थांबून खिंड लढवायला सांगून थोरला अजॅक्स त्याचा सावत्र भौ ट्यूसरसकट मेनेस्थेउस असलेल्या टॉवरकडे गेला. टॉवरवरून एक भलाथोरला धोंडा एपिक्लेस नामक ट्रोजन योद्ध्याच्या डोक्यात आदळून त्याने त्याचा खातमा केला. त्या धोंड्यामुळे एपिक्लेसच्या हेल्मेटचे तुकडेतुकडे झाले आणि कवटीच्या हाडांचा चुरा झाला. तो जागीच ठार झाला. नंतर ट्यूसरने ग्लॉकसच्या खांद्यात बाण मारून त्याला रिटायर्ड हर्ट केले. ते पाहून सार्पेडॉनला दु:ख झाले, तरी त्याने अल्कॅमॉन नामक ग्रीक योद्ध्याला भाल्याने ठार केले आणि जवळचा बुरुज पाडून-मोडून टाकला. त्यामुळे बर्‍याच लोकांना जाता येईल अशी मोकळी जागा तयार झाली आणि तोही घुसला.

युद्धाचे पारडे बराचवेळ समतल राहिले. अखेरीस हेक्टरच्या “हरहर महादेव” ने त्याची तुकडी बुरुज चढून पुढे आली. दरवाजा तर काही केल्या फोडणे अवश्यमेव होते. शेवटी हेक्टरने एक भलाथोरला धोंडा घेतला आणि नीट नेम धरून, पूर्ण वजन टाकून दारावर नेमका मध्यभागी आदळला. त्या डबल डोअरला मागे दोन आडणे तिरपे बसवले होते. हेक्टरच्या आघाताने ते दोन्ही आडणे मोडले, दाराच्या दोन्ही बिजागर्‍याही मोडल्या आणि दारही तुटले. दगड त्याच्या वजनामुळे पुढे आत जाऊन पडला.

दार तुटले म्हटल्यावर ट्रोजनांना चेव आला. काहीजण भिंत चढून तर बरेचजण दरवाजातून आत घुसले. ग्रीकांचा पाठलाग करत त्यांना पार जहाजांपर्यंत रेमटवत नेले. ग्रीक आता घाबरले होते, सगळीकडे आरडाओरडा आणि नुसता गोंधळ चालला होता.

खंदकातील लढाई पार्ट २

ट्रोजन्स तट भेदून आत घुसले. बरेच ग्रीक मागे हटले तरी त्यांची फळी पूर्णतः काही मोडलेली नव्हती. त्यांनी नंतर नेटाने प्रतिकार चालविला. राजपुरोहित काल्खसने ग्रीकांना धीर देणे सुरू केले.हे ऐकून ग्रीक पेटले. थोरल्या आणि धाकट्या अजॅक्ससमवेत ते लढायला उभे राहिले. त्यांनी एक मानवी भिंतच उभी केली. त्यांच्या हेल्मेट्सचा एकमेकांना स्पर्श होऊ लागला, ढालीला ढाल स्पर्शू लागली आणि शेकडो भाले ट्रोजनांच्या दिशेने रोखलेले पुढे जाऊ लागले. अभेद्य हाडामांसाची भिंतच जणू. ते पाहून हेक्टरनेही आपल्या ट्रोजन, लिशियन आणि दार्दानियन योद्ध्यांना तस्सेच अगदी खेटून राहण्यास सांगितले आणि लढाईला पुन्हा एकदा तोंड फुटले.

प्रथम एक ग्रीक योद्धा मेरिऑनेस याने प्रिआमचा मुलगा डेइफोबस याजवर भाला उगारला. डेइफोबसच्या ढालीवर तो बरोब्बर लागला खरा, पण ढालीला काही न होता उलट भालाच तुटला. डेइफोबस आणि आपले गांडू नशीब यांना चार शिव्या घालत, नवीन भाला आणण्यासाठी मेरिऑनेस युद्धभूमीतून आपल्या तंबूकडे तात्पुरता रिटायर झाला. नंतर मग थोरल्या अजॅक्सचा सावत्र भौ, ग्रीकांकडचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर ट्यूसर याने इंब्रियस नामक ट्रोजन योद्ध्याला ठार मारले. भाला फेकला तो सरळ कानाखाली घुसला. इंब्रियस जागीच कोसळला. ट्यूसर त्याचे चिलखत काढण्याच्या बेतात असतानाच हेक्टरने त्यावर एक भाला फेकला. सुदैवाने ट्यूसरचे लक्ष असल्याने त्याने तो चुकवला. तो पुढे अँफिमॅखस नामक ग्रीक योद्ध्याला लागून तो जागीच गतप्राण झाला. त्याचे हेल्मेट काढून घेण्यासाठी हेक्टर पुढे सरसावला, इतक्यात धाकट्या अजॅक्सने हेक्टरवर जोर्रात भाला फेकला. तो हेक्टरने ढालीवर झेलला तरी त्याचा जोरच इतका होता, की त्यामुळे हेक्टर डेड बॉडीपासून चार पावले मागे झाला. ते पाहताच अँफिमॅखसची डेड बॉडी स्टिचियस आणि मेनेस्थेउस या अथीनिअन ग्रीकांच्या कॅप्टन्सनी तर इंब्रियसची डेड बॉडी थोरल्या व धाकट्या अजॅक्सांनी आपल्या बाजूस नेली. एक काडी करायची म्हणून धाकट्या अजॅक्सने अँफिमॅखसचे शीर कापून हेक्टरच्या पायांजवळ फेकले.

एकदा युद्धात उतरल्यावर इडोमेनिअसने आपले शौर्य दाखवायला सुरुवात केली. केस पांढरे झाले असले तरी अंगातले बळ काही उणावले नव्हते. ओथ्रिओनेउस नामक ट्रोजनावर त्याने भाला फेकला, तो ब्राँझचे चिलखत भेदून पोटात घुसला. एसियस नामक ट्रोजनालाही यमसदनी धाडले.

ऑथ्रिओनेउस आणि एसियसचा बदला घेण्यासाठी डेइफोबस आता इडोमेनिअसवर परत चालून आला. त्याने एक भाला फेकला, तो इडोमेनिअसने वाकून चुकवला. डेइफोबसच्या वल्गना ऐकून ग्रीक चिडले, अँटिलोखस तर लैच चिडला. इकडे इडोमेनिअसचा कत्तलखाना सुरूच होता. अल्काथॉउस नामक ट्रोजन योद्ध्याच्या छातीत भाला खुपसून त्याने त्याला ठार मारले, आणि डेइफोबस कडे पाहून चढ्या आवाजात म्हणाला: ” लै टिवटिव करायलास. आमचा एकच जण मेला तर तुझे तीन लोक आम्ही मारले. आता तुला असातसा सोडतो की काय? उभा रहा युद्धाला.”

हे च्यालेंज ऐकून डेइफोबसची जरा तंतरलीच. एकट्याने हाणामारी करावी तर इडोमेनिअस पेटलाय एकदम. मग त्याने एनिअस नामक ट्रोजन वीराला बोलावणे पाठवले. ते दोघे आपल्यावर चाल करून येत असलेले पाहताच एखाद्या रानडुकरासारखा उभा असलेल्या इडोमेनिअसनेही आपल्या साथीदारांना हाक मारली.ते ऐकून सगळेजण इडोमेनिअसकडे धावले. खांद्यावर ढाला बांधून सज्ज राहिले. (ढाली बर्‍याच लोकांच्या जरा लैच मोठ्या होत्या) ते पाहून एनिअसनेही आपल्या साथीदारांना हाक मारली. ती ऐकून डेइफोबस, पॅरिस आणि आगेनॉर हे ट्रोजन तुकडीप्रमुख आणि त्यांच्यामागोमाग अजून बरेच ट्रोजन सैनिक आले. अल्काथॉउस नामक ट्रोजनाच्या शवाभोवती अगदी हातघाईची लढाई सुरू झाली.

त्यात ट्रोजनांची सरशी पाहून हेलेनचा पती, अ‍ॅगॅमेम्नॉनचा धाकटा भौ मेनेलॉस चिडला आणि हेलेनस नामक ट्रोजनावर झेपावला. हेलेनसकडे धनुष्यबाण होते तर मेनेलॉसकडे भाला. हेलेनसने बाण मारला खरा परंतु मेनेलॉसचे चिलखत भेदण्यास तो असमर्थ ठरला. मेनेलॉसने हेलेनसला जो भाला फेकून मारला तो त्याच्या हातातून आरपार गेला आणि तसाच रुतून बसला. जिवाच्या आकांताने कसाबसा हेलेनस मागे हटला. भाला रुतलेला हात भाल्याच्या वजनाने खाली लोंबतच होता. शेवटी आगेनॉर या ट्रोजन योद्ध्याने भाला तिथून उपटून काढला, आणि हात एका लाकडी गोफणीत बांधला.

ते पाहून पिसांडर नामक ट्रोजन योद्धा मेनेलॉसवर धावून आला. त्याने मेनेलॉसवर भाला फेकला पण मेनेलॉसने तो ढालीने अडवला. त्या भानगडीत भाल्याचे टोक मोडल्यावर मेनेलॉसने आपली तलवार उपसली. ते पाहून पिसांडरने जवळच पडलेला एक परशू उचलला आणि मेनेलॉसच्या डोक्यावर घाव घातला. पण मेनेलॉसने तो शिताफीने चुकवला, हेल्मेटच्या वरचा भाग जरा टच झाला इतकेच. मग मेनेलॉसने त्याच्या कपाळावर तलवारीचा जीव खाऊन वार केला. कवटीची हाडे मोडून पडली आणि पिसांडर ठार झाला.

आता इकडे चाललेल्या या गोंधळाचा हेक्टरला पत्त्याच नव्हता. थोरल्या आणि धाकट्या अजॅक्सने हेक्टरविरुद्ध चांगली खिंड लढवत ठेवली होती. सोबतच्या लोक्रियन धनुर्धार्‍यांनीही आता कमाल चालवली होती. त्यांच्याकडे अवजड चिलखते नसल्याने ते हातघाईच्या लढाईत नव्हते-तिथे चिलखतवाले बाकीचे वीर होते. त्यांच्या आडून ते ट्रोजनांवर वार करत होते. अचानक बाण कुठून येताहेत म्हणून ट्रोजन कन्फ्यूज झाले. आणि त्यांचे मनोधैर्य खचले. ग्रीकांनी त्यांची चटणीच उडवली असती, इतक्यात पॉलिडॅमसने हेक्टरला सांगितले “भौ, दमानं घे नं जरा. सगळ्यातलं सगळं तुलाच कळतं असं काही नाही. आत्तापर्यंत आपण आलो ते ठीक, पण तो अकिलीस स्वस्थ बसलाय म्हणून चाललंय हे सगळं. तो एकदा का पेटला की संपलंच! तो तरी किती स्वस्थ बसेल म्हणा. त्यामुळं चल आता, परत जाऊ गप.” हेक्टर ओके म्हटल्यावर पॉलिडॅमसला त्याने सर्व तुकडीप्रमुखांना बोलवायची आज्ञा केली आणि स्वत: तोपर्यंत लढाईत घुसला.

पण त्याची नजर जिथेतिथे पॅरिस, हेलेनस, एसियस आणि अ‍ॅडमस यांना शोधत होती. तो फुल्टू टेन्शन मध्ये होता. पॅरिसला पाहताच हेक्टरला बरे वाटले आणि तो पुन्हा युद्ध करू लागला. लै योद्धे दिमतीला घेतले होते.

तो मोठा जथा ग्रीकांपाशी आल्यावर थोरल्या अजॅक्सने हेक्टरला च्यालेंज केले. “इकडे या साहेब, असे लांब जाऊ नका! आम्ही ग्रीक नंबर एकचे शिपाई आहोत, झ्यूसदेवाची अवकृपा झाली तरीही आमचे शौर्य काही कमी झालेले नाही. आज आमची जहाजे उद्ध्वस्त केलीत, उद्या तुमचे ट्रॉय आम्ही नक्कीच उद्ध्वस्त करू. तेव्हा झ्यूसदेवाची प्रार्थना नीटच करून या इकडे यायचे तर.”

अजॅक्सचे आव्हान ऐकून हेक्टर लै चिडला. “खोटारड्या, झ्यूशशपथ सांगतो या भाल्याने तुमचे सर्वांचे या जहाजांपाशीच मुडदे पाडीन आणि कुत्र्या-गिधाडांना खाऊ घालीन.” ते जाबसाल झाल्यावर ट्रोजन सैन्य ग्रीक सैन्याला पुन्हा एकदा भिडले.

ट्रोजन ग्रीकांवर खूप बळजोर होतात, पण ग्रीक पुन्हा सावरतात.

मागच्या बुकात सांगितल्याप्रमाणे फुल बोंबाबोंब चालली होती. हेक्टर आणि अन्य ट्रोजनांनी मिळून ग्रीकांची दाणादाण उडवलेली होती. यवनभीष्म नेस्टॉर आपल्या शामियान्यात बसला होता तिकडेही लढाईचा आवाज ऐकू येत होता. धन्वंतरी एस्कुलापियसचा मुलगा मॅखॉन जखमी झाला होता त्याला अंमळ विश्रांती घ्यायला सांगून नेस्टॉर ढाल-भाला-तलवार घेऊन बाहेर पडला. ट्रॉयसमोरचा समुद्रकिनारा मोठा असला तरी सर्व जहाजांना जागा पुरेल इतका रुंद नव्हता, सबब भौतेकांनी जहाजे एकापुढे एक अशी लावलेली होती. त्यांतून वाट काढत बाहेर पडल्यावर काही काळाने त्याला आगामेम्नॉन, डायोमीड आणि ओडीसिअस हे तिघे भेटले.

आगामेम्नॉनला कळायचं बंद झालं होतं. नेस्टॉरला पाहताक्षणीच त्याचा बांध फुटला, “बा नेस्टॉरा, तूही लढाई सोडून आलास तर!! च्यायला या ट्रोजनांनी अन त्यात पण हेक्टरने लैच वाट लावलीय राव आपली. तो जहाजांपर्यंत येईल अन आपल्याला हाकलून लावेल. अकिलीससारखे लोक रुसून बसल्यावर काय घंटा पाड लागणारे आपला?”
नेस्टॉर म्हणाला की एका चांगल्या सल्ल्याची आत्ता कधी नव्हे इतकी गरज आहे. लगेच आगामेम्नॉनचा प्लॅन रेडी होताच-“गप इथून निघून जाऊ. रात्रीच्या वेळेस लढाई थांबवली तर बरेच लोक सुरक्षितपणे निसटू शकू. शेवटी शिर सलामत तो हेल्मेट पचास.”

हे ऐकल्यावर इथाकानरेश ओडीसिअस मात्र लैच खवळला. “मूर्खा, तुला अक्कल आहे का तू काय बरळतोयस त्याची? ग्रीक सैन्यासारख्या श्रेष्ठ सेनेला तुझ्यासारखा नेता आजिबात शोभत नाही. आता जरा तुझं तोंड बंद ठेव नैतर कोणी ऐकलं तर काय बिनडोक सल्ला देतोय राजा म्हणून लायकी काढतील तुझी. इतकी वर्षे ट्रॉयवर कब्जा करण्यासाठी लढलो ते काय उगीच? आणि तुला किंवा अजून कुणाला जहाजातून पळताना पाहून बाकीचे ग्रीक काय लढतील की पळतील? त्यांच्या मनाचा कै विचार आँ????”
आगामेम्नॉनला हा वार एकदम दिल पे लागला. “सगळ्यांनी एकगठ्ठा पळून जावं असं मी म्हणतच नाहीये. कुणाकडे अजून चांगला सल्ला असेल तर ऐकूच.” तो असे म्हणताक्षणी डायोमीड उत्तरला, “तर मग ऐका मी काय सांगतो ते. माझं वय कमी असलं तरी निव्वळ तेवढ्या कारणासाठी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. माझं म्हणणं असं आहे की आत्ता आपण सर्व जखमी झालो असलो तरी आपल्याला परत युद्धभूमीकडे परत गेलेच पाहिजे. ज्यांनी आत्तापर्यंत कातडी बचावून आराम केलाय त्यांना आपण पुढे ढकलू अन काही काळ तरी प्रत्यक्ष खणाखणीपासून दूर राहून ताजेतवाने होऊ.”

हा सल्ला सर्वांना पसंत पडला आणि आगामेम्नॉनच्या नेतृत्वाखाली ग्रीक सैन्याने पुनरेकवार कूच केले. त्यांना पाहताच हेक्टरनेही आपल्या आर्मीला पुनरेकवार नीट अ‍ॅरेंज केले आणि लढाईला तोंड लागले. थोरला सांड अजॅक्स (टेलामॉनचा मुलगा, अकीलिसचा चुलतभौ) आणि हेक्टर हे पुन्हा एकदा एकमेकांना भिडले. हेक्टरने नीट नेम धरून अजॅक्सच्या छातीवर एक भाला फेकला. पण अजॅक्सने ढालतलवारीच्या सहाय्याने तो थोपवला. भाला व्यर्थ गेल्याने हेक्टर चिडला आणि परत मागे हटला. पण तो मागे हटत असतानाच अजॅक्सने जवळ पडलेला एक धोंडा उचलला. तो धोंडा उचलून त्याने हेक्टरच्या मानेजवळ फेकून मारला. हेक्टरची ढाल मोठी होती, पार मानेपासून ते पायांपर्यंत येण्याइतकी. त्या ढालीच्या वरच्या टोकाच्या जरा वर अन मानेवर तो धोंडा जोरात लागल्यामुळे हेक्टर एकदम सटपटला आणि जमिनीवर कोसळला. त्याला पडलेला पाहून अनेक ग्रीकांनी त्यावर बाण मारले आणि त्याला ग्रीक बाजूस ओढत नेणे चालले होते. पण तेवढ्यात ट्रोजन बाजूच्या अनेक दक्ष लोकांनी मध्ये पडून हेक्टरला वाचविले. त्याला मागच्यामागे त्याच्या रथाजवळ नेले. तोंडावर पाणी मारले तेव्हा तो मूर्छेतून जागा झाला अन गुडघ्यांवर मटकन खाली बसत त्याने रक्ताची एक उलटी केली अन पुन्हा बेशुद्ध पडला.

हेक्टर रणभूमीपासून बाजूला गेल्याचे पाहताच ग्रीकांना धीर आला आणि नव्या जोमाने त्यांनी ट्रोजनांबरोबर लढणे सुरू केले. धाकटा चपळ अजॅक्स या वेळेस एकदम जोरात होता. लै लोक मारलेन्. अजूनही बर्‍याच ग्रीकांनी ट्रोजनांना व ट्रोजनांनी ग्रीकांना मारले. तलवारीने हाडे मोडणे, डोळ्यात भाला खुपसून बुबुळ खोबणीतून उचकून पार आरपार जाणे, इ. अनेक प्रकार यथासांग झाले. आगामेम्नॉन वगैरे लोकांनीही अनेक लोक मारले. धाकट्या अजॅक्सने पाठलाग करता करता चपळाईने अनेक लोक मारले.

हेक्टर सर्व ग्रीकांना भारी पडतो अन ग्रीकांसाठी जिंकू किंवा मरू अशी स्थिती येते.

मागील बुकात पाहिल्याप्रमाणे हेक्टरला घेऊन बरेच ट्रोजन मागे हटले. अजॅक्सने मारलेल्या धोंड्याच्या आघातामुळे हेक्टर अजूनही सुन्नच होता. पण तरीही आपल्या दुखण्यावर काबू ठेवत तो लढायला उभा राहिला. त्याची ही डेरिंग बघून ट्रोजन सैन्यात जी वीरश्री संचारली तिचे वर्णन करणेच अशक्य. भारल्यागत त्याच्या मागोमाग सर्व ट्रोजन निघाले. ते पाहून एका ग्रीक सैनिकाने थोरला अजॅक्स, क्रीटाधिपती इडोमेनिअस, अजॅक्सचा सावत्र भौ धनुर्धारी ट्यूसर, मेरिओनेस आणि अजून उत्तमोत्तम योद्ध्यांना हाक मारली. ते सर्वही सैन्य घेऊन हेक्टरचा सामना करण्यासाठी पुढे निघाले.

आज हेक्टर कुणालाही आटपत नव्हता. त्याने लै लोक मारले. पॅरिस आणि अन्य ट्रोजनांनीही ग्रीकांना मारून त्यांची चिलखते ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता. नंतर सैन्याला हेक्टरने पुन्हा आवाहन केले, “आक्रमण!!! जहाजांकडे पुढे जावा आणि मिळेल ती लूट पदरात घ्या. सर्व आहे आपलंच, होऊ दे ग्रीकांचा खर्च!!” ट्रोजनांपासून बचाव म्हणून ग्रीकांनी जहाजांभोवतीच्या खंदकाचा, त्याआधीच्या टोकदार लाकडी वाशांचा आसरा घेतला आणि भिंतीआड लपले.

आता लढाई हातघाईवर आली होती. ट्रोजन खंदक भेदून कधीही घुसू शकतील असं चित्र होतं. ते पाहून अकीलिसचा मित्र पॅट्रोक्लस उठला आणि अकीलिसची मनधरणी करण्याला निघून गेला. कारण आता अब नही तो कभी नही अशी स्थिती होती. नेस्टॉरसाहेब आकाशाकडे पाहून आर्त प्रार्थना करीत होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तटाच्या भिंतीपाशी खतरनाक मारामारी सुरू होती. ट्रोजन आत घुसू पाहत होते पण थोरला अजॅक्स बिनीला असल्याने ग्रीकही तुलनेने कमी असले तरी फुल चेकाळून लढत होते. कुठलीच एक बाजू बळजोर होत नव्हती. अजॅक्सला पाहून हेक्टर पुन्हा त्याच्यावर झेपावला. काय आकर्षण होते काय माहीत दोघांना एकमेकांचे. हेक्टरपण जरा आवरेल की नै? आत्ताच तर मार खाल्लाय, रक्त ओकलाय तरी त्याच माणसाबरोबर युद्ध करू पाहतोय. पण खणाखणीला तोंड लागले, दोघेही सारखेच तुल्यबळ. कोणी कुणाला आवरेना. अजॅक्सने एक भाला फेकून मारला तो हेक्टरच्या एका चुलतभावाला लागला. तो मरताच त्याचे चिलखत काढून घेण्यासाठी माशा घोंगावतात तसे ग्रीक योद्धे त्याच्या प्रेताभोवती गर्दी करू लागले. मृतदेहाची विटंबना थांबवण्यासाठी हेक्टरने योद्ध्यांना पाचारण केले आणि ते सर्व डेड बॉडी ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले.

ते पाहताच अजॅक्सने त्याचा सावत्र भाऊ ट्यूसरला सांगितले की धनुष्य बाण घेऊन ये, हेक्टरला टिपून काढ बाणाने. ट्यूसर गेला, अन प्रत्यंचेवर बाण ठेवणार इतक्यात हाय रे दैवा!! प्रत्यंचाच तुटली. पुन्हा सांधायला वेळ नव्हता, मग ट्यूसर ढाल अन भाला घेऊन राउंडात उतरला. प्रत्यंचा तुटल्याचे पाहताच हेक्टर मोठ्याने हसून म्हणाला, “झ्यूसदेवाची आपल्यावर कृपा आहे पाहिलंत का ट्रोजनांनो!! ते बघा एका ग्रीक राजाच्या धनुष्याची प्रत्यंचाच तोडली झ्यूसने. आता आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही. खुश्शाल पुढे जावा अन युद्ध करा. कुणी मेला तरी हर्कत नाही, आपल्या देशासाठी मरणे हे पुण्यकर्मच आहे.” हे ऐकून ट्रोजन अजून चेकाळून लढू लागले.

ते पाहून अजॅक्स चिडूनच ग्रीकांना म्हणाला, “लानत है साल्यांनो. इतकी वाईट अवस्था आली काय आपल्यावर? आणि ट्रोजनांच्या ताब्यात सगळे दिले तरी आपण जगूवाचू याची ग्यारंटी ती काय? हेक्टर पाहिलात का कसा चेकाळून लढतोय ते? एक तर लढून त्यांना हाकला तरी नैतर लढून मरा तरी. तिसरा मार्ग आता आपल्यापुढे नाही.” ते ऐकून ग्रीकांनाही स्फुरण चढले. नव्या जोमाने लढाई सुरू झाली. हेक्टरने पुन्हा खवळून चढाई केली तरी तो कमी लोकच मारू शकला. पण तोपर्यंत ट्रोजनांनी ग्रीकांना जहाजांच्या पहिल्या रांगेमागे हाकलले होते. आता पार मागच्या बाजूच्या शामियान्यांपर्यंत लढाई गेली होती. नेस्टॉरनेही ओरडून सर्व ग्रीकांना धीर दिला. बरेच ग्रीक जागेवरून हटले तरी थोरल्या अजॅक्सला हटणे नामंजूर होते. या ना त्या जहाजाच्या डेकजवळ उभे राहून तो लढाई करीत होता. त्याच्या हातात एक लै लांब असा ‘पाईक’ ऊर्फ मोठा दांडा होता.

http://en.wikipedia.org/wiki/Pike_%28weapon%29

हेक्टर एका जहाजाजवळ आला आणि तिथे हातघाईची लढाई सुरू झाली एकदम जवळून. बाणांचे इथे काम नव्हते. हातभराच्या अंतरावरून भाले, तलवारी अन कुर्‍हाडी समोरच्याच्या शरीरात खुपसल्या जात होत्या, कवट्या फोडल्या जात होत्या अन हातपायांची हाडे मोडून निकामी केली जात होती. हेक्टर आणि अजॅक्स यांनी पुन्हा एकदा आपापल्या सेनेस ओरडून चेतवले. त्या लढाईत अजॅक्सने भाल्याने बारा लोकांचे प्राण घेतले.

अफाट पराक्रम गाजवून पॅट्रोक्लस हेक्टरच्या हातून मरतो.

(पॅट्रोक्लसवर उपचार करताना अकिलीस)

हेक्टरच्या नेतृत्वाखाली ट्रोजन सैन्याने ग्रीकांना पार जहाजांपर्यंत मागे रेटले होते. ते पाहून पॅट्रोक्लस अकीलिसची मनधरणी करायला निघाला. डोळ्यांत अश्रू आणून त्याने अकीलिसला बहुता परीने विनविले, की “बाबारे, तू नाहीस तर कमीतकमी मी तरी तुझे चिलखत वगैरे घालून लढाईला जातो. ग्रीकांचे पार कंबरडे मोडले आहे हेक्टरने. डायोमीड भाल्याची जखम वागवत आहे.ओडीसिअस आणि आगामेम्नॉनला तलवारीचे घाव लागलेत तर युरिपिलसच्या मांडीत बाण घुसलाय. काळ मोठा कठीण आलाय. सोबत तुझे मॉर्मिडन सैनिकदेखील माझ्या बरोबर दे.”

त्याच्या विनंतीचा अकीलिसवर परिणाम झाला आणि त्याने त्याला परवानगी दिली. पण परवानगी देतानासुद्धा कशा शब्दांत दिली हे फार रोचक आहे. तो म्हणाला, “मला जितका अपमान सहन करावा लागला तो सहन करणे माझ्या कुवतीबाहेरचे होते. आगामेम्नॉन आणि मी दोघेही एकाच दर्जाचे असूनही निव्वळ त्याची पॉवर माझ्यापेक्षा जास्त असल्याने माझ्या शौर्याचे बक्षीस म्हणून मिळालेली ब्रिसीस त्याने हिरावून घेतली. तरी ठीक आहे, झालं गेलं स्टिक्सला मिळालं. ग्रीकांपैकी कुणाची रणगर्जना कानावर पडेना, फक्त हेक्टरचा आरडाओरडा कानावर येतोय म्हणजे प्रसंग मोठाच बाका आलाय खरा. तू माझं चिलखत वगैरे घालून जा लढायला आणि मोठा विजय मिळव ट्रोजनांवर. म्हणजे आगामेम्नॉन खूष होऊन मला माझी ब्रिसीस परत मिळेल. पण मी नसताना अजून हल्ला करू नकोस, कारण ती माझी हक्काची लढाई आहे आणि त्यापासून मिळणारी कीर्ती माझ्यापासून आजिबात हिरावून घ्यायची नाही. आणि अजून एक म्हणजे ट्रॉय शहराजवळ फार जाऊ नकोस, तिथे लै योद्धे आहेत. उगा मेलासबिलास तर कशाला बिलामत नसती? जहाजांपासून ट्रोजनांना दूर हाकललेस की परत ये गप आणि इतरांना लढू दे.”
यावरून लक्षात येते की स्वतः पॅट्रोक्लसचीच ऑफर होती अकीलिसच्या वेषात युद्ध करायची.

आता पॅट्रोक्लस लढाईसाठी तयार होत होता. अकीलिसचे हेल्मेट, चिलखत अन तलवार घेऊन निघाला, पण भाला काही त्याला झेपला नाही. पेलिऑन पर्वतावर तयार केलेला तो भाला अकीलिस सोडून कुणालाही फेकता येत नसे. ऑटोमेडॉन नामक मॉर्मिडनने रथ सज्ज केला, खँथस आणि बॅलियस व पेडॅसस नामक तीन घोडे त्याला जुंपले. पाठोपाठ अकीलिस आपल्या मॉर्मिडन सेनेला आवाहन करू लागला. “भावांनो, ऐका. पराक्रम गाजवण्याचा मोठा चान्स आहे तुम्हाला आज. आगामेम्नॉनवर चिडून मी बसल्यामुळे तुम्हाला इतके दिवस स्वस्थ बसावे लागले म्हणून तुम्ही मला कायम शिव्या घालायचा, पण आता मात्र नुस्ता दंगा घालायचा! होऊ दे मारामारीचा खर्च, ट्रॉय आहे घरचं!”

आवाहन करून त्याने मॉर्मिडन लोकांना चेतवले. ही सेना अख्ख्या ग्रीसमध्ये सर्वांत खूंखार म्हणून गाजलेली होती. स्वतः होमर त्यांचे वर्णन “एखाद्या चवताळलेल्या लांडग्याप्रमाणे लढणारे अन भीती म्हणजे काय ते ठाऊक नसणारे” असे करतो. ट्रॉयला येताना अकीलिसने ५० जहाजे आणलेली होती. प्रत्येक जहाजात ५० लोक होते. म्हणजे एकूण झाले अडीच हजार. यांवर त्याने पाच सरदार नेमले होते- अनुक्रमे मेनेस्थियस, युडोरस, पिसांडर, फीनिक्स आणि अल्किमेदॉन. या पाचांवरचा बॉस अर्थातच अकीलिस स्वतः होता. यांच्या अग्रभागी आता अकीलिसच्या वेषातील पॅट्रोक्लस आणि ऑटोमेडॉन हे दोघे होते. ती सेना युद्धासाठी निघून गेल्यावर अकीलिसने झ्यूसदेवाला वाईन अर्पण करून यशासाठी प्रार्थना केली.

लढाईला तोंड लागले. मॉर्मिडन सेनेला पाहून ग्रीकांनी मोठ्या जोषाने जयघोष करावयास सुरुवात केली, तर त्यांचा अन त्यांच्या अग्रभागी असलेल्या पॅट्रोक्लसचा आवेश पाहून ट्रोजनांची चांगली हातभर फाटली. इतका वेळ ग्रीकांना रेमटवून मारणारे अन त्यांची चटणी उडवणारे ट्रोजन आता मागे हटू लागले. पॅट्रोक्लस, मेनेलॉस आणि धाकट्या अजॅक्सने तुंबळ मारामारी केली. अन्य ग्रीक योद्ध्यांनीही जबरा हाणाहाणी केली. पेनेलेऑस नामक ग्रीक योद्ध्याने लीकॉन नामक ट्रोजन योद्ध्याला कानाखाली मानेवर जोराचा घाव घातला. तलवार इतकी खोलवर गेली की कातडी वगळता डोक्याला धडाशी जोडणारा कसलाच दुवा शिल्लक राहिला नाही. मेरिओनेस आणि क्रीटाधिपती इडोमेनिअस यांनीही शर्थीची लढाई केली. इडोमेनिअसने एरिमास नामक ट्रोजन योद्ध्याच्या तोंडातच सरळ भाला खुपसला. तो कवटीच्या आरपार गेला. आतल्या हाडांचा चकणाचूर झाला, डोळ्यांतून रक्त वाहू लागले. रुतलेला भाला काढताना सगळी दंतपंगती बाहेर आली आणि नजारा अतिशयच भेसूर दिसू लागला.

इकडे थोरला अजॅक्सही हेक्टरवर पुन:पुन्हा भाले फेकतच होता, पण हेक्टर आपल्या ढालीचा कौशल्याने वापर करून ते चुकवीत होता. पण त्यालाही कळून चुकले, की आता माघार घेणेच इष्ट. तो निघाला तराट, पण बाकीची सेना तशीच मागे राहिली. जो तो ज्याला जसे सुचेल तसा पळत होता. त्या भानगडीत अनेक ट्रोजन रथांपासून घोडे घाबरून पळताना विलग झाले आणि कितीकजण तसेच मागे राहिले. पाठलागात पॅट्रोक्लसने दहाबारा ट्रोजन तरी लोळवलेच.

ते पाहून सार्पेडन नामक एक नामांकित ट्रोजन योद्धा खवळला. लिशियन लोकांना पाचारण करून तो पॅट्रोक्लसवर झेपावला. दोघांनी एकमेकांवर भालाफेक केली. सार्पेडनचा वार फुका गेला (पॅट्रोक्लसच्या रथाचा पेडॅसस नामक घोडा जायबंदी झाला) पण पॅट्रोक्लसचा वार कामी आला. सार्पेडनच्या जस्ट हृदयाखाली भाला बरोब्बर लागला. सार्पेडन कोसळला आणि मरण पावला.

ते पाहून ग्लॉकस नामक ट्रोजन सेनापतीने ओरडून ट्रोजन सेनेला हाकारून चेतवले. ते ऐकून ट्रोजन परत आले अन लढाईला पुन्हा तोंड लागले. मॉर्मिडन सेनेतील एक महत्वाचा कमांडर ट्रोजनांनी मारलासुद्धा. पण ग्रीक आज अनझेपेबल झाले होते. हेक्टर पुन्हा एकदा त्या रेट्यापुढे पळून गेला. ते पाहून अन्य ट्रोजनसुद्धा पळू लागले. मग ग्रीकांनी विधिवत सार्पेडनच्या डेड बॉडीपासून त्याचे चिलखत लांबवले. पाठलाग करत काही अंतर गेल्यावर पॅट्रोक्लस परत फिरला.

इकडे हेक्टर ट्रॉयपर्यंत गेला खरा पण तिथल्या “स्कीअन गेट” नामक दरवाजाच्या जवळ थांबून आत जावे की पुन्हा लढावे या द्विधा मनःस्थितीत तसाच उभा राहिला. ते पाहून त्याचा एक काका एसियस याने त्याला जरा शिव्या घालून पुन्हा लढावयास उद्युक्त केले. परत गेला पण अजून कुणा ग्रीकाला न मारता सरळ पॅट्रोक्लसवरच त्याने लक्ष केंद्रित केले. हेक्टर आपल्यावर चालून येत असलेला पाहताच पॅट्रोक्लसने त्याच्यावर एक धोंडा उचलून फेकला, तो हेक्टरच्या सारथ्याला लागून तो ठार झाला. हेक्टर पॅट्रोक्लसला पुढे जाऊ देईना तर पॅट्रोक्लसही हेक्टरला इकडेतिकडे हलू देईना. कुणीच कुणाला आटपेना. हेक्टरचा गतप्राण सारथी केब्रिओनेस याच्या डेड बॉडीभोवती लैच धुमाकूळ सुरू होता. पॅट्रोक्लसने तुफान पराक्रम टोटल सत्तावीस लोक मारले आणि तीनवेळेस ट्रॉयची भिंत चढण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला.

पण नंतर पॅट्रोक्लसची नजर धूसर झाली, भौतेक डोळ्यांत धूळ गेली असावी. कुणीतरी मागून केलेल्या आघातामुळे त्याचे हेल्मेटही खाली पडले. त्यातच एका ट्रोजनाने मागून येऊन पॅट्रोक्लसच्या दोन्ही खांद्यांमध्ये भाला खुपसला आणि वार करून पळून गेला. त्याला घाव लागला खरा पण तो प्राणघातक नव्हता. घाव लागल्यावर पॅट्रोक्लस मागे हटू लागला. ते पाहून हेक्टर पुढे सरसावला आणि त्याने त्याच्या ओटीपोटात भाला खुपसला. पॅट्रोक्लस त्या प्राणांतिक घावामुळे खाली कोसळला तेव्हा हेक्टरने वल्गना केली, “तुला काय वाटलं ट्रॉयवर कब्जा करणं म्हणजे खाऊ आहे होय? इतका शूर अकिलीस पण तोही तुझ्यासाठी घंटा काही करू शकला नाही. त्याने सोपवलेल्या कामगिरीत तर तू फेल झालासच, तुला मूर्खाला इतकीसुद्धा अक्कल नव्हती का आँ?”

मरता मरता पॅट्रोक्लसने जवाब दिला, “देवांच्या अवकृपेमुळे मी मरतोय. त्यांची कृपा असती तर तुझ्यागत शंभर (मूळ आकडा २० आहे) लोक आले असते तरी मी सगळ्यांचा मुडदा पाडलो असतो. उगा जास्ती टिवटिव करू नकोस. तूसुद्धा आता तसा जास्त दिवस जगणार नाहीयेस. अकिलीस लौकरच तुझा मुडदा पाडेल.” इतके बोलून त्याने प्राण सोडला तरी हेक्टर त्याच्या डेड बॉडीबरोबर बोलतच होता-“कशाला मातबरी सांगायलास त्या अकिलीसची? कुणास ठाऊक तो माझ्या भाल्याने मरेलही.”

हेक्टर आधी असे कधी करत नसे. अकिलीसचा विषय असल्याने त्याला स्वतःला दिलासा देणे गरजेचे वाटले असावे.पॅट्रोक्लसला मारल्यावर त्याचा सारथी ऑटोमेडॉन याला मारण्यासाठी हेक्टर निघाला पण ऑटोमेडॉन रथातून लगेच वेगाने परत फिरला.

सारांशः

ग्रीकांच्या जहाजांभोवती खूप हातघाईची लढाई होते, त्यात ग्रीकांचे सर्व सेनापती जखमी होतात. पॅट्रोक्लस अफाट पराक्रम गाजवून मरतो.

हा १६ व्या बुकापर्यंतचा कथाभाग झाला. इथून पुढे अकिलीसच्या पराक्रमाचे अतिशय डीटेल वर्णन आहे. स्टे ट्यून्ड!!

Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | यावर आपले मत नोंदवा

असा(गेलो) मी आसामी.

अलीकडेच कामरूप देशातील प्राग्ज्योतिषपूर ऊर्फ गुवाहाटी येथे जाणे झाले. नरकासुराच्या राजधानीत चारपाच दिवस होतो पण मोकळा वेळ दीडेक दिवस असेल नसेल. तस्मात बघावयास कमी वेळ मिळाला. तरी तेवढ्यात काही गोष्टी पाहता आल्या. कामाख्या मंदिर अन वसिष्ठ मंदिर पाहता आले नाही 😦 कारण वेळही मिळाला नै अन शिवाय कामाख्या मंदिरात गर्दी सोडूनही बळी देणे खुंदल खुंदल के चालू असते असे तेव्हाच तिकडे गेलेल्या एका प्राण्याकडून कळाले. मग म्हटले मरो तेच्यायला. एरवी एशी हाटलात बसून समोर मस्त सजवलेले, मसालेदार गिरवीत न्हालेले मांसाचे तुकडे चापावयास काही वाटत नाही पण ते प्राणी मारताना पाहून नै म्ह्टले तरी पोटात अंमळ ढवळतेच.

तर आसामदर्शनाची सुरुवात झाली ती ब्रह्मपुत्रा नदी पाहून. लैच मोठी नदी, पैलतीर दूर म्हणजे लैच दूर.

Brahmaputra

Brahmaputra

ते सर्व पाहता पाहता मुक्कामावर पोचलो आणि आन्हिके आटपल्यावर पोटाने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. मग म्हटले जरा “अथातो मत्स्यजिज्ञासा” करूया. आधी पाहिल्याप्रमाणे फिश टेंगा नामक फिश करी मागवली. याचा फटू काढणे तेव्हा सुचले नाही, तस्मात हा जालावरून घेतलेला फटू इथे चिकटविला आहे. चव छान होती. मोहरी होती पण अंमळ आंबटपण असल्याने उत्तम लागली. बाकी मसालेदारपणा नव्हता फारसा. हे बंगाली आणि आसामी जेवणाचे वैशिष्ट्यच आहे. तेवढं ते भूत जलोकिया नामक मिर्चीचं काय करतात हे बघायला मिळालं नाही पण. असो, नेक्ष्ट टैम नक्की.

Fish Tenga

पोटपूजा आटपल्यावर शहरात जरा फिरलो. आपल्याला ठाऊक असलेला बंगाल घ्यावा, त्यात अधूनमधून दोनचार टेकड्या टाकाव्यात अन लोकांमधील मंगोलॉइड चेहर्‍याचे प्रमाण जरा वाढवावे की आसाम होतो. शहर बाकी फार काही मोठे वाटले नाही. पण जेवढे आहे त्यातला मुख्य भाग हा खचितच टुमदार म्हणवून घेण्यास पात्र आहे. फिरत फिरत गेलो, मेन रोडवर लायब्ररी, कॉटन कॉलेज,इ. अनेक इमारती एकमेकांना लागून आहेत त्यांची कंपाउंडची भिंत रस्त्याच्या बाजूने अतिशय सुंदरपणे सजवली आहे. तर्‍हेतर्‍हेची पॅनेल्स अन त्यांवर अनेक प्रकारची कलाकुसर. कुठे योद्धे दिसताहेत, कुठे ड्रॅगन्स तर कुठे आसामी लिपीत काही लिहिलेले. कुठेही रिपीटिशन नसलेले अन सुंदर कलाकुसरीने नटलेले हे पॅनेल्स पाहता पाहता रस्ता कधी संपला ते कळालेच नाही.

Dragon panels

Dragon panels

रस्ता संपल्यावर तिथे आसामचे स्टेट म्यूझियम लागले. आधी नेटवर पाहिले त्यात हे मुख्य आकर्षणांपैकी एक होते. तिथे गेलो तर अपेक्षेपेक्षा बरेच उत्तम निघाले. भरभक्कम १० रुपये फी घेऊन फोटोग्राफीला परवानगी दिली, मग अजून काय पाहिजे! मोग्यांबो खुष जाहला. पण प्रथमग्रासात मक्षिकापतन जाहले कारण वेळ थोडाच होता. वट्ट पाऊण तास शिल्लक होता म्यूझियम बंद व्हायला. तस्मात तपशीलवार जास्त काही पाहता आले नाही. पण मग हिय्या केला आणि धावतपळत जमेल तितक्या गोष्टींचे फटू काढलो. हे म्यूझियम सोमवारी बंद असते, बाकी कायम खुले असते एक्सेप्ट शासकीय हॉलिडेज. वेळ आहे सकाळी १० ते दुपारी ४.

मेन बिल्डिंगच्या आवारात आहोमकालीन काही तोफा ठेवल्या होत्या. ही तोफ इ.स. १७ व्या शतकातली.

Ahom era canon

Ahom era canon

आहोम राजसत्ता ही आसामातली एक प्रदीर्घ काळ चाललेली
(इ.स. १२२८ ते १८२६ पर्यंत जवळपास ६०० वर्षे) राजवट होती. या राजवटीशी संबंधित सर्वांत फेमस माणूस म्हणजे लाछित बडफुकन. औरंगजेबाच्या कारकीर्दीत याने मुघल-आहोम संघर्षात मोलाची कामगिरी बजावली. विशेषतः इ.स. १६७१ च्या सराईघाट येथील लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल याचे नाव गाजलेले आहे. खडकवासला येथील एनडीएच्या आवारात या साहेबांचा एक अर्धपुतळा देखील आहे. गुवाहाटीपासून १२ किमी दूर गडचुक नामक लाछित साहेबांच्या काळी बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष आहेत असे कळाले होते पण तिथेही जाणे जमले नाही…असो आता अजून रडगाणे न गाता जेवढे बघायला मिळाले ते पाहू.

तोफा ओलांडून आत गेल्यावर एक दगडी खांब आपले स्वागत करतो. साधारण ६ फूट तरी उंची असावी याची. उभ्या खांबाला सापांनी वेटोळे घातल्यागत दिसते आहे. यावर एक शिलालेखही आहे-आहोम लिपीत. त्याचा अर्थ बाजूला लिहिला होता तो असा: “मिसिमी नामक टोळीने आहोमांनाचार बुट्ट्या भरून सापाचे विष दिले तर त्या बदल्यात आहोम लोक मिसिमी टोळीवाल्यांना डोंगरांत सुखाने जगू देतील”. विषाचे प्रोक्युअरमेंट अग्रीमेंटच हे. याआधी अशा प्रकारचे काही प्रत्यक्ष पाहिले मात्र नव्हते, फक्त ऐकले होते. खरेखोटे देव जाणे, च्यायला दर वर्षी चार बादल्या विष म्हणजे किती साप पकडावे लागत असतील अन तितके साप सापडणे शक्यतेच्या कोटीत तरी आहे की नाही कुणास ठाऊक. सर्पमित्र जॅक डॅनियल्स यांचे मत वाचण्यास उत्सुक.

Snake pillar

Snake pillar

पुढे गेलो तर तलवारी ठेवलेल्या होत्या. काहींची फिगर कामातून गेली होती पण बर्‍याच तलवारी अजून टकाटक होत्या.

Swords

Swords

दुसर्‍या महायुद्धात वापरलेले काही बाँब्स ठेवले होते. दणदणीत काम होते- ४-५ फूट तरी उंची असेल.

Bombs in WW 2

Bombs in WW 2

मग गेलो मॅन्युस्क्रिप्ट ग्यालरीत. पाऊल ठेवताक्षणी डोळे अंमळ पाणावले. आजवर इतकी म्यूझियम्स पाहिली पण अन्यत्र कुठेही असं बघायला मिळालं नव्हतं. भूर्जपत्र अन ताडपट्टी शेप्रेट ठेवले होते लोकांना दिसतात कसे आननी हे कळावे म्हणून.

Birch Bark

Birch Bark

ते एकदा नीट पाहिलं आणि पुढे पाहू लागलो. अतिशय सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली रामायण-महाभारतादि ग्रंथांची कितीतरी हस्तलिखिते होती. कैक ठिकाणी चित्रेही होती. एक अमरकोशाचे हस्तलिखितही होते. पण बुरंजी नामक प्रकार कुठे दिसला नाही. आपल्याकडे जशा बखरी असतात तशा आसामात बुरंजी असतात.

IMG_0868

Amar Kosh manuscript

Amar Kosh manuscript

ते झाल्यावर नाणी, ताम्रपट आणि शिलालेख विभागात गेलो. उत्तमोत्तम नाणी, कितीक ताम्रपट अन तितकेच अखंड शिलालेख ठेवले होते. त्यांपैकी एका शिलालेखाचाच फोटो काढता आला. काय सुंदर अक्षर होते पण त्यावरचे!! सगळीकडे हे नेटकेपण दिसले. म्यूझियमच्य व्यवस्थेतही एक क्वचित जाणवणारा नेटकेपणा होता.

Shilalekh

Shilalekh

नंतर आदिवासी विभागात गेलो. आसामातील आदिवासी लोकांशी संबंधित मोठे दालन होते. कोलकात्यातील इंडियन म्यूझियमची आठवण झाली अंमळ.
शेवटी मूर्ती विभागात पोचलो. इथेही बुद्धापासून विष्णूपर्यंत व्हाया तीर्थंकर अशा अनेक प्रकारच्या मूर्ती होत्या. विष्णुमूर्तींची व्हरायटी अन संख्या सर्वांत जास्त होती. खाली काही विशेष उल्लेखनीय विष्णुमूर्तीचा फोटो डकवत आहे. ज्या पाषाणातून घडवली तो पाषाणही नरम आहे असे जाणवत होते पाहून. त्याला बहुतेक शिस्ट का कायतरी म्हणतात. गुंतागुंतीची गिचमीड कलाकुसर करावयास हा दगड लै उपयोगी असतो असे दिसते.

Vishnumurti

Vishnumurti

पुढे म्यूझियम बंद झाल्यावर तिथून निघालो. वाटेत आर्ट ग्यालरी नामक प्रकार लागला. छोटीशी इमारत होती, आत कुणाच्या तरी चित्रांचे प्रदर्शन चालू होते. पिकासोचे बाप असल्याच्या थाटात आत गेलो खरा पण सुदैवाने डोक्शाला जास्त त्रास झाला नाही. बहुतेक चित्रे साधी सरळ होती, मला तरी आवडली.

IMG_0874

IMG_0875

चित्रांचे फटू काढून तिथून निघालो. दुसर्‍या महायुद्धात जे जपानी सैनिक भारतात कामी आले त्यांपैकी काहींची थडगी इथे गुवाहाटीत आहेत. अतिशय सुंदरपणे मेंटेन केलेले आहे. पुण्यात खडकी येथेही अशी थडगी आहेत. या दोहोंची अन अजून अनेक ठिकाणच्या थडग्यांची देखरेख करणारी एक कॉमन संस्था आहे इंग्लंडमधील- कॉमनवेल्थ ग्रेव्ह्ज असोसिएशन म्हणून. त्या संस्थेतर्फे याचे काम पाहिले जाते. अतिशय सुरेख प्रकार आहे. तितकाच गंभीर करणाराही. तिथे काही भारतीय शिपाईदेखील चिरनिद्रा घेत आहेत त्यांपैकी एकाचे हे थडगे.

IMG_0895

Cemetary

Cemetary

या सर्व जागा एकमेकांपासून १-२ किमीच्या परिघात आहेत सबब लौकरच बघून झाल्या. आता मला वेध लागले होते गेंडा बघायचे! लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते की आसाम राज्यात काझीरंगा नामक अभयारण्यात टनावारी गेंडे सापडतात म्हणून. मेरे ब्रदर की दुल्हन मध्ये “यूपी आये और भांग नही पी तो क्या खाक यूपी आये?” प्रमाणे “आसाम आये और गेंडा नही देखा तो क्या खाक आसाम आये?” तस्मात गेंडे पाहणे तर होतेच. पण काझीरंगाला जाण्याइतका वेळ तर नव्हता-ते गुवाहाटीपासून दोनेकशे किमी दूर आहे. मग आली का पंचाईत? इथे कामानिमित्त भेटलेल्या एका मराठी माणसाने मदत केली. त्याने सुचविले, कि ‘पोबितोरा’ ऊर्फ ‘पवित्रा’ नामक अभयारण्य गुवाहाटीपासून वट्ट ४० किमी दूर आहे. मग हुरूप आला. टॅक्सी ठरवली, तिथल्या रेसॉर्टवाल्याला जीप राईडबद्दल फोन केला अन पोबितोरावर कूच केले.

जाताना ब्रह्मपुत्रा नदीचे दर्शन झाले म्हणण्यापेक्षा मोठ्या वाळवंटाचे दर्शन झाले.वाटेत पेट्रोल भरायला गाडी थांबली तिथला हा डूज अँड डोंट्स चा बोर्ड पहा. हा व अन्य बोर्ड पाहून एका मोठ्या गूढाचा उलगडा झाला. यात बॉक्समधील शब्द म्हणजे आपण वाचला तर “चुइच” असा वाचू. पण ते पूर्ण वाक्य पाहिले तर “मोबाईल फोनर चुइच बन्ध करिबो” असे आहे. म्हणजे तो शब्द स्विच असा आहे. बंगाली पद्धतीने “सुइच” असा लिहायचा होता पण लिहिताणा स चा च केलाय. त्यामुळे उच्चारताना सुतिया म्हणतात आणि लिहिताना….वेल, वेगळे सांगणे न लगे 😉 तर मुद्दा असा की या ‘सुतिया’ आडनावाचे लोक आसामात लै आहेत. फेसबुकवर आपली अकौंट उघडताना स्पेलिंगच्या विशिष्ट पद्धतीमुळे फेसबुकला वाटले की ती शिवी आहे तस्मात त्यांना अकौंट उघडू देईना =)) मग त्यांनी निदर्शने केली, फेबुची प्रतिमा करून जाळली वैग्रे वैग्रे बरंच लडतर झालं होतं २०१२ साली. त्यासंबंधी इथेइथे वाचता येईल. त्याचा निर्णय काय झाला हे ठाऊक नाही. असो.

S-ch equivalence.

S-ch equivalence.

तर तासाभरात पोबितोराला पोचलो. हे अभयारण्य टुमदार आहे, ४० स्क्वे.किमी क्षेत्रफळात १०० तरी गेंडे आहेत असे तिथला रेंजर म्हणाला. अन्यत्र कुठे गेंड्यांची पैदास करायची असेल तर इथून गेंडे नेले जातात ही नवीन माहितीही एका मित्राकडून पुढे कळाली. इथे १९ स्क्वे.किमी भागात जीप राईड अन हत्ती राईड होतात. उरलेल्या भागात जाणे अलाउड नाही. हत्ती राईड मला करायला आवडली असती पण तेव्हा हत्ती रविवार असल्याने बुक होते तस्मात जीपच केली झालं. मी, ड्रायव्हर अन आमच्याबरोबर एक हत्यारबंद रक्षक होता. तासभर हिंडलो अन तेवढ्यात ४-५ गेंडाबाई बघावयास मिळाल्या. मजा आ गया. गेंडास्वामी मात्र कुठे दिसले नाहीत. चाळिसेक फुटांवरून मी गेंडे पाहिले पण त्याच दिवशी सकाळी आमच्या रक्षकाने त्याहीपेक्षा जवळून गेंडे-नर गेंडे टु बी प्रिसाईज- पाहिले त्यांचाही फटू दिलेला आहे.

Genda bai

Genda bai

Genda swami

Genda swami

अभयारण्यात गेंडे पाहिले. काही हंस, एक लै मोठा पेलिकनसदृश पक्षी, हंस, अन गायीम्हशी अन बाहेर पर्यटनार्थ कल्ला करणारे मनुष्यप्राणी वगळता , अन्य प्राणी फारसे दिसले नाहीत. टूर खतम झाली मग त्यांचे आभार मानून परत निघालो. चारेक तासात आटोपलं सगळं. त्याच दिवशी संध्याकाळी गुवाहाटी सोडले नि ब्याक टु पॅव्हेलियन आलो. प्रवास सुफळ संपूर्ण 🙂

Posted in इतिहास-भारत | 7 प्रतिक्रिया

দেবযুগান্ত.

युगान्त म्हणजे काय ते आज पुन्हा एकदा कळाले.

नाही खेळले कुणी, खेळणारहि नच कुणि त्या ग्रौंडावरती |
जसा खेळला देव यकूणनव्वदापासुनि आजवरती ||

सचिनदेवा, यू विल बी मिस्ड फॉरेव्हर…

খোকা ঘুমল, পাড়া জুড়ল, ইংরেজ এলো দেশে
ওরা পালিয়ে গেলে রইল ক্রিকেট অবশেষে

ছোটবেলা থেকে একটি গর্ব ও মান
তুমি সবাই ক্রিকেটপ্রেমীদের ভগবান

আর কি বলব , কাহাকে আর দেখব
কার খেলা দেখে নিজেকে সেইরকম ভাবব

ত্বমেব আমাদের দাবিদ, পরস্থ গলিয়াথ-দের সামনে
তুমি চলে গেলে ব্যস্ত থাকব কাহার স্মরণে

জীবনে আবার হলো একটা যুগান্ত ,
থাক! আর বলে কেন হব ক্লান্ত ……

Posted in कविता-बिविता | यावर आपले मत नोंदवा

क्रिस गेलाख्यान

कळायचे बंदचि होत पूर्ण
क्रिस् गेल कालासम कृष्णवर्ण
केले तयें बॉलर हो विवर्ण
ब्याटिंग त्याची पुरते सुवर्ण

आहेत साचे जरि लोक फार
आय्पीलची कीर्त पहा अपार
त्यातेहि हातोडिमाणूस येक
क्रिस गेल आख्यान सांगेन येक

पुण्यासवे खेळले बंगळूर
ब्याटिंग घेई, रन काढि फार
मिसाइले वर्षती जैं अपार
छक्के तसे मारितो फारफार

मारोनिया सिक्सर सर्व ग्रौंडी
केली तये फिल्डरें कानकोंडी
मागेपुढे ऑफ व ऑन बौंड्री
लोकांचिया गेलचि नाम तोंडी

ब्याटिंग जेव्हा करि गेल साचा
पळे कधी जास्त न तो फुकाचा
त्यासाठी हा सिक्सरू खेळ साचा
जो ऐंशि वा शंभर मीटरांचा

आरंभि इब्राहिमखान जैसा
गिलच्यांस जो मारि पहा अपैसा
तैं गेलने तीस चेंडूंत फक्त
हो ठोकली सेंचुरी पूर्ण सक्त

त्रेसष्ट धावा – द्वि-शतां रनांस
यासाठिची जी षटकेहि वीस
त्यांतेही दोनशे उणे पंचवीस
मारे पहा एकटा गेल खवीस

वन्डे असो वा विस ओव्हरींचे
पैं शॉट याचे बहुता परींचे
फाष्टर् असो वा स्पिनही असो तो
चेंडू सदाचा नभि धाडतो तो

ब्याटिंग जेव्हा करि गेल साचा
तैं प्रेक्षकू होतसे फील्डराचा
कंपौंडमागोनि घेवोनि कॅचां
हो फील्डरू होतसे प्रेक्षकाचा

सचिन जिमि शतक पर |
मॅक्ग्राथ मिडल स्टंप पर |
त्यों तडीपार सिक्सर पर |
क्रिस गेल राज है ||

Posted in कविता-बिविता | 12 प्रतिक्रिया

ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.

मागील लेखात इलियडमधील २४ बुक्सपैकी पहिल्या ३ बुकांचा सारांश आला होता. आता बुक्स ४ ते १० यांमधील कथाभाग पाहू. पहावे तिकडे नुस्ती मारामारी-महाभारतात “धनुर्भिरसिभिर्भल्लैर्गदाभिस्तोमरर्ष्टिभि:” असे त्या तुंबळ युद्धाचे वर्णन दिलेय अगदी तश्शीच. शृंगार झाल्यानंतर होमरबाबांच्या अंगात वीररस उसळी मारू लागलाय असेच वाटते ती बुक्स वाचून.

आधीचे संक्षिप्त ब्याकग्रौंडः

मेनेलॉसबरोबरच्या मारामारीत जखमी होऊन पॅरिस पळाला. तो कुठेही दिसेनासा झाल्यावर मग अ‍ॅगॅमेम्नॉनने मेनेलॉसचा विजय जाहीर केला. दोघांच्या फाईटमध्ये एक करार होता. मारामारीत जो मरेल तो मरूदे, बाकीचे लढणार नाहीत म्हणून. (अनवधानाने याचा उल्लेख मागच्या भागात राहिला, त्याबद्दल क्षमस्व)

ट्रोजन तह मोडतात आणि युद्धाला तोंड लागते.

होमरला मुळात मगाशी सांगितलेला तह ट्रोजनांनी मोडला असे सांगायचे आहे, पण देवांना मध्ये आणल्याशिवाय भागणार कसे? त्यामुळे आता आपण ऑलिंपस पर्वतावर जाऊ. झ्यूसदेवाची बायको हेरा अन मुलगी मिनर्व्हा दोघीही ट्रॉय नष्ट करायचे म्हणून हट्ट धरून बसल्या. सुरुवातीला झ्यूस त्यांना कन्व्हिन्स करू पाहत होता की तिथे कायम चांगलेचुंगले मटन-बीफ अनलिमिटेड खायला मिळते, उगीच कशाला भक्तांना मारायचे म्हणून. मिनर्व्हाला तंबीही दिली की जास्त बोलू नकोस म्हणून. पण नंतर पोरीच्या बाजूने बायको बोलू लागली तेव्हा बिचार्‍याची बोलती बंद झाली. हेराने त्याला ट्रॉयच्या बदल्यात आर्गोस, स्पार्टा आणि मायसीनी यांपैकी कुठल्याही शहराची काय वाट लावायची ती लाव अशी खुल्ली ऑफर दिल्यावर झ्यूस गप्प झाला. त्याची संमती मिळाल्यावर मिनर्व्हा दरदर ऑलिंपस पर्वत उतरून खाली आली आणि तिने काड्या करणे सुरू केले.

या काड्यांचा परिणाम काय झाला? ट्रोजन सैन्यात कुणी लाओदोकस नामक एक काडीसारू होता. त्याने पांदारस नामक एका धनुर्धार्‍याला सोनेनाण्याचे आमिष दाखवून चक्क मेनेलॉसला बाण मारायला सांगितले. पांदारसने एक ठेवणीतला बाण काढला. तो सूं सूं करीत मेनेलॉसला लागला. छाती-पोटाजवळच्या जखमेमुळे मेनेलॉस कण्हू लागला. अ‍ॅगॅमेम्नॉनला कळायचं बंद झालं. पण मेनेलॉसने त्याला दिलासा दिला, की आल इझ वेल. मग यवनांच्या धन्वंतरी एस्कुलापियसचा मुलगा मॅखॉन याला उपचारासाठी बोलावले गेले.

आता अ‍ॅगॅमेम्नॉनची सटकली. सर्व सैन्यभर फिरून लोकांना उत्तेजित करून, प्रसंगी शिव्या घालून त्याने युद्धाला तयार केले. ओडीसिअसला आळशीपणाबद्दल एक लेक्चर दिले तेव्हा ओडीसिअसने त्याला अजून शिव्या घातल्यावर मग मात्र मायसीनीनरेश अंमळ मऊ झाला. नेस्टॉर, इडोमेनिअस, डायोमीड, इ. सर्वांशी बोलून आर्मी गोळा केली आणि अखेरीस युद्धाला तोंड लागले.

सर्वप्रथम अँटिलोकस या ग्रीक योद्ध्याने एखेपोलस या ट्रोजन योद्ध्याच्या डोळ्यात भाला खुपसून त्याला प्राणांतिक जखमी केले. तो कोसळला तसे त्याचे चिलखत उचकटून पळवण्यासाठी गर्दी जमली. त्या गर्दीतून काही ट्रोजनांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. यातून फायटिंग अजून तीव्र, रक्तरंजित झाली. त्यातच अकीलिसचा चुलतभौ आणि यवनभीमच जणू वाटणारा थोरला ऊर्फ सांड अजॅक्स याने सिमोइसियस नामक ट्रोजन तरुण योद्ध्याला छातीत भाला खुपसून ठार मारले. अजॅक्सचा भाला लागताक्षणीच सिमोइसियस कोसळला. तेव्हा प्रिआमचा एक मुलगा अँटिफस याने अजॅक्सवर एक भाला फेकला. पण तो अजॅक्सला लागला नाही तर ओडीसिअसचा जवळचा साथीदार ल्यूकस याला (सिमोइसियसचे शव ग्रीकांकडे ओढत असताना) लागून तो मरण पावला. आपला जवळचा साथीदार गेल्याने फुल्ल खुन्नसमध्ये ओडीसिअस राउंडात उतरला. त्याचा बाण डेमोकून नामक प्रिआमच्या अजून एका पोराला लागला. तो मेला. ओडीसिअसच्या आवेशाने ट्रोजन्स जरा मागे हटले, तेव्हा ट्रोजनांना एकाने ओरडून धीर दिला, अकीलिस लढाईत नाहीये याची आठवण करून दिली, आणि दोन्ही बाजू पुन्हा एकदा खूंखारपणे युद्ध करू लागल्या. अजून काही योद्धे पडले. तेव्हा एक ग्रीक योद्धा पुढे आला- सर्व ग्रीक सेनानायकांत सर्वांत तरणा, पण पराक्रमात अकीलिसनंतर त्याचा हात धरणारा कुणीही नव्हता. त्या वीराचे नाव होते डायोमीड. तोच तो ८० जहाजे घेऊन आलेला, नेस्टॉरच्या सर्वांत लहान मुलापेक्षाही तरुण असलेला-विशीतला एक दबंग योद्धा.

डायोमीड आणि अन्य ग्रीकांचा पराक्रम

Diomed

होमरबाबांनी सांगितल्याप्रमाणे मिनर्व्हा देवीने डायोमीडला धैर्य प्रदान केले. मग तो कुणाला ऐकतोय? सुटलाच डैरेक्ट. पहिल्यांदा फेगेउस आणि इदाएउस या जुळ्या भावांवर हल्ला चढवला. दोघे भाऊ रथातून, तर डायोमीड पायीच लढत होता. फेगेउसचा भाला चुकवून त्याने त्याच्या छातीत भाला फेकून ठार मारले. इदाएउस पळून गेला. नंतर खुद्द अ‍ॅगॅमेम्नॉनने ओडियस नामक ट्रोजन योद्ध्याला भाला फेकून ठार मारले. सर्व योद्धे भाला एक्स्पर्ट होते- स्वतः अ‍ॅगॅमेम्नॉन हा जॅव्हेलिन स्पेशलिस्ट होता असे खुद्द अकीलिस म्हटल्याचे होमरने इलियडच्या २४ व्या बुकात नमूद केले आहे. नंतर क्रीटचा राजा इडोमेनिअस याने ट्रोजन योद्धा फाएसस याला, तो रथात चढत असताना उजव्या खांद्याजवळ भाला फेकून मारले. तो पडल्यावर इडोमेनिअसच्या सेवकांनी फाएससचे चिलखत काढून घेतले. मारले की काढ चिलखत हा एक लै हिट प्रकार होता त्यांच्यात. यावरून ग्रीकांमध्ये आपापसात पुढे लै वाईट भांडणे झालेली आहेत.

त्यानंतर मेनेलॉसने स्कॅमँडरियस या ट्रोजन वीराला, तर मेरिओनेस या हेलेनच्या स्वयंवरप्रसंगी उपस्थित असणार्‍या ग्रीक योद्ध्याने टेक्टॉन या ट्रोजन योद्ध्याला भाला फेकून मारले-तो भाला नितंबातून डैरेक्ट मूत्रनलिकेपर्यंत गेला आणि टेक्टॉन क्षणार्धात कोसळला. तसेच मेगेस आणि युरिप्लस या ग्रीकांनी पेदेउस आणि हिप्सेनॉर या ट्रोजनांना अनुक्रमे मानेत भाला खुपसून आणि तलवारीने हातच कापून काढून ठार मारले. अशी लढाई ऐन रंगात आलेली असताना इकडे डायोमीडपण फुल्ल फॉर्मात आलेला होता. लिआकॉनचा मुलगा पांदारस (तोच तो तह मोडून मेनेलॉसला बाण मारणारा) त्याच्यासमोर आला, आणि त्याने अचूक नेम साधून डायोमीडवर बाण सोडला. तो त्याचे चिलखत भेदून खांद्याजवळ लागला आणि थोडे रक्त आले. ट्रोजन्स आपल्या जवळ येणार इतक्यात स्थेनेलस नामक ग्रीकाला डायोमीडने आपल्या खांद्यात रुतलेला बाण काढण्याविषयी विनवले. त्याने बाण काढल्यावर जणू काही झालेच नाही अशा आवेशात डायोमीड ट्रोजन सैन्यात घुसला. पायीच युद्ध करूनही त्याने ट्रोजन सैन्यात असा हाहा:कार उडविला की ज्याचे नाव ते. सर्वप्रथम अ‍ॅस्टिनूस नामक एका ट्रोजन वीराला छातीत भाला खुपसून आणि खांद्याच्या हाडावर तलवारीने हाणून मारले. नंतर आबास आणि पॉल्यिदस या जुळ्या भावांनाही यमसदनी धाडले. त्यानंतर प्रिआमचे दोन मुलगे क्रोमिअस आणि एखेम्मॉन यांना मारून रथातून त्यांची कलेवरे खाली ओढून काढली, प्रत्येकाचे चिलखतही काढून घेतले.

डायोमीडच्या भीमपराक्रमाचा प्रसाद एनिअसला तसेच चक्क व्हीनस अन मार्स या देवांनाही मिळतो!

डायोमीडचा हा नंगानाच एनिअस या ट्रोजन योद्ध्याला बघवला नाही. पांदारसला बरोबर घेऊन डायोमीडवर त्याने चढाई केली. समोरासमोर आल्यावर “हे डायोमीडा, सांभाळ माझा भाला” म्हणून भाला फेकला, पण डायोमीडची ढाल मध्ये आली. ढालीला भेदून भाला पलीकडे गेला पण डायोमीडला काही झाले नाही. पांदारसला ढाल भेदली गेली इतक्यानेच लै भारी वाटून त्याने कर्णागत “हतोऽसि वै फाल्गुन” अशी गर्जना केली, पणं डायोमीडने त्याच्यावर अचूक नेम धरून भाला फेकला. तो त्याच्या नाकातून आत घुसून जबड्याच्या खालच्या भागाजवळून बाहेर आला. पांदारस खलास. त्याचे शव ताब्यात घेऊन ग्रीक लोक त्याचे चिलखत आणि इतर शस्त्रे ताब्यात घेतील अशी भीती वाटून एनिअस रथातून खाली उतरला. पण डायोमीडने एक भलाथोरला धोंडा हातात घेतला आणि एनिअसच्या जांघेवर जोराने प्रहार केला. दगडाच्या आघाताने एनिअसच्या जांघेजवळचे काही मांस बाजूला होऊन मोठा भेसूर देखावा दिसू लागला. एनिअस जागीच कोसळला, पण अजून जिवंत होता. डायोमीड आता एनिअसला ठार मारणार इतक्यात त्याला कुणीतरी बाजूला नेले.

आधी सांगितल्याप्रमाणे डायोमीडच्या या धैर्यामागे मिनर्व्हा देवीची प्रेरणा होती. तिने त्याला असेही सांगितले होते, की व्हीनस देवी तुझ्यासमोर आली तर तिला इजा करायला मागेपुढे पाहू नकोस,मात्र अन्य देवांसमोर असले काही करू नकोस. तेव्हा व्हीनस देवी समोर दिसताच त्याने तिच्या मनगटाजवळ भाल्याने वार केला आणि रक्त काढले. ती विव्हळू लागली, आणि मार्स देवाच्या रथात बसून तडक ऑलिंपसला गेली. तिथे सीनियर मंडळींनी तिचे सांत्वन केले. “काय काय बै सहन करायचं या माणसांचं!” असे उद्गार काढून काही जुन्या कहाण्या पुनश्च चर्चिल्या गेल्या. मग अपॉलो ने मार्सला डायोमीडकडे बघायला सांगितले. कोण मर्त्य इतकी टिवटिव् करतोय पाहूच, असे म्हणत मार्स युद्धक्षेत्रात गेला. आता ट्रोजनांची एक सभा भरली. ट्रोजनसाथी आणि थ्रेशिअन लोकांचा राजा अकॅमस आणि प्रख्यात ट्रोजन योद्धा सार्पेडन या दोघांनी वीरश्रीयुक्त भाषणे करून ट्रोजनांना धीर दिला. विशेषतः सार्पेडनने हेक्टरला लै शिव्या घातल्या-तुझ्यासाठी मी माझी पोरेबाळे-बायको-राज्य सर्व सोडून लांबून आलो पण तुला अक्कल नाही वगैरे वगैरे लैच कायबाय बोलला. हेक्टरला त्याचे शब्द झोंबले. त्याने सेना तयार केली आणि लढाईला पुन्हा मोठ्या प्रमाणावर तोंड लागले. आणि आश्चर्यकारकरीत्या एनिअससुद्धा ठणठणीत बरा होऊन पुन्हा लढायला आला.

विविध ट्रोजन व ग्रीकांचा पराक्रम-ग्रीकांच्या रेट्याने ट्रोजन घाबरतात

थोरला आणि धाकटा अजॅक्स, ओडीसिअस आणि डायोमीड हे युद्धाचे नेतृत्व करीत होते. ट्रोजन हल्ल्यापुढे त्यांनी आपली फळी भक्कमपणे टिकवून धरली. इकडे अ‍ॅगॅमेम्नॉन “भले शाब्बास!” करत फिरत होता. त्याने एनिअसचा मित्र देइकून याची ढाल भेदून, त्याला मारून आपल्या भालाफेकीची चुणूक पुन्हा एकदा दाखवली. एनिअसनेही क्रेथॉन आणि ऑर्सिलोखस या दोघा ग्रीकांना ठार मारून आपल्या बळाचे दर्शन घडवले. त्यांची शरीरे लुटीसाठी ट्रोजन सैनिक ओढून नेतील म्हणून त्यांपासून संरक्षणासाठी खुद्द मेनेलॉस ग्राउंडात उतरला. एकट्या राजाला अपाय होऊ नये म्हणून नेस्टॉरचा मुलगा अँटिलोखसदेखील त्याच्याबरोबर आला. दोघांना एकत्र पाहून एनिअस मागे हटला. त्या दोघांनी नंतर पिलामेनेउस नामक ट्रोजन योद्ध्याला आणि त्याच्या सारथ्याला मारून त्याचे घोडे ग्रीक कँपकडे वळवले. पण असे करत असताना हेक्टरचे लक्ष तिकडे गेले. एक मोठी गर्जना करून तो त्यांच्या पाठलागावर आला. ते पाहून डायोमीडच्या अ‍ॅड्रिनॅलिनचा पारा अजूनच वर चढला. हेक्टरने मेनेस्थेस आणि अँखिआलस या दोघा ग्रीकांना मारले, तर थोरल्या अजॅक्सने अँफिअस या ट्रोजनाला मारले. त्याचे चिलखत ताब्यात घेऊ पाहताना ट्रोजनांनी भाल्यांचा असा मारा केला, की अजॅक्सला तिथून हटणे भाग पडले.

प्रख्यात ट्रोजन वीर सार्पेडन याने त्लेपोलेमस या ग्रीकाला भाला फेकून मारले खरे, पण त्याच्या भाल्याने तोही जखमी झाला तेव्हा त्याला युद्धभूमीवरून हटणे भाग पडले. इकडे ओडीसिअसनेही कोएरॅनस, अलास्टर, क्रोमियस, अल्कॅन्द्रस, हॅलियस, नोएमॉन आणि प्रिटॅनिस या ट्रोजनांना मारून हात लाल करून घेतले. तो अजून कुणाला मारणार एवढ्यात हेक्टरचे लक्ष तिथे गेले. पाठोपाठ हेक्टरनेही ट्यूथ्रस, प्रसिद्ध सारथी ओरेस्टेस (अ‍ॅगॅमेम्नॉनच्या मुलाचेही नाव हेच होते पण हा वेगळा) त्रेखस, ओएनोमॉस,हेलेनस आणि ओरेस्बियस या ग्रीकांना ठार मारले.

आता हेक्टर इतका भारी का? तर होमरभाईंच्या म्हण्ण्याप्रमाणे मार्सदेव बरोबर होता म्हणून. पण मिनर्व्हाच्या चिथावणीने डायोमीडने चक्क मार्सलाही भाल्याने जखमी केले!

नंतर थोरल्या अजॅक्सने एकट्याने ट्रोजनांची एक फॅलँक्स तोडून टाकली आणि ट्रोजनसाथी थ्रेशियन लोकांचा राजा अकॅमस यावर जोराने भाला फेकला, तो हेल्मेट फोडून कपाळातून मेंदूपर्यंत आरपार जाऊन अकॅमस गतप्राण झाला. पाठोपाठ डायोमीडने अ‍ॅक्सिलस आणि त्याचा सारथी कॅलेसियस या दोघांना यमसदनी धाडले. नंतर युरिआलस या डायोमीडच्या साथीदाराने ड्रेसस आणि ऑफेल्टियस या दोघा ट्रोजन वीरांना मारले.पुढे पॉलिपोएतेस या ग्रीकाने अ‍ॅस्टिआलस या ट्रोजनाला मारले. इकडे ओडीसिअसने पिदितेस तर (थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ आणि मजा म्हंजे आईकडून हेक्टर अन पॅरिस यांचाही नातलग असणारा) ट्यूसरने आरेताऑन या ट्रोजनांना मारले. नेस्टॉरपुत्र अँटिलोखसच्या भाल्याने आब्लेरुस तर अ‍ॅगॅमेम्नॉनद्वारे एलातुस हे ट्रोजन योद्धे मृत्युमुखी पडले. अशीच चहूबाजूंना लढाई चालली होती. कधी ग्रीक तर कधी ट्रोजन पुढे सरकत होते. बह्वंशी ग्रीकांची सरशी होत होती, पण ट्रोजनही चिवट होते. मेनेलॉसनेही अ‍ॅड्रेस्टस नामक ट्रोजन योद्ध्याला तो सुटकेच्या बदल्यात पैशाचे आमिष दाखवत असतानाही अ‍ॅगॅमेम्नॉनच्या सांगण्यावरून ठार मारले. “नो प्रिझनर्स” हा मंत्र बुढ्ढोजी नेस्टॉरनेही सांगितल्यावर मग ग्रीक अजूनच चेकाळले. लढता लढता डायोमीड आणि ग्लॉकस नामक ट्रोजन हे समोरासमोर आले. कोण-कुठला असे विचारल्यावर दुरून ओळख लागली, मग हाय-हॅलो करून दोघांनी न लढता एकमेकांना भेटी देऊन निरोप घेतला.

इकडे ट्रोजनांची अवस्था बिकट झाली होती. हेक्टरचा भाऊ हेलेनस याने हेक्टर व एनिअसला ट्रॉय शहरात जाऊन सर्व बायकांना देवाची प्रार्थना करायला सांगण्याची विनंती केली. त्याबरहुकूम हेक्टर आत गेला. आपली आई हेक्युबा हिला त्याने प्रार्थनेविषयी सांगितले-ती आणि इतर बाया कामाला लागल्या. तसेच बायको-पोराला भेटून तो पॅरिसकडे गेला. दोघे भाऊ तयार होऊन युद्धासाठी निघाले.

हेक्टर आणि थोरल्या अजॅक्सचे द्वंद्वयुद्ध

हेक्टर-पॅरिस हे बंधुद्वय ट्रॉयच्या गेटातून बाहेर आले आणि त्यांनी कापाकापी सुरू केली. हेक्टरने इओनेउस तर पॅरिसने मेनेस्थियस या ग्रीकांना भाले फेकून मारले. आता हेक्टरबंधू हेलेनसच्या मनात काय आले कुणास ठाऊक? तो शकुन वैग्रे जाणणारा होता. त्याने शकुनबिकुन पाहून हेक्टरला सांगितले की आजचा दिवस भाग्याचा आहे. ग्रीकांपैकी कुणालाही वन-ऑन-वन लढाईसाठी चॅलेंज कर, तू नक्की जिंकशील. मग हेक्टरने वरडून च्यालेंज दिले, “आहे का कोणी माईचा लाल”? म्हणून. पण ग्रीक गप्पच बसले. ते पाहून रागाने लाल झालेल्या मेनेलॉसने थू: तुमच्या जिनगानीवर असे म्हणून स्वतः उठून उभा राहिला. पण चतुर अ‍ॅगॅमेम्नॉनने “भावा, लैच तापायलाइस, पण हेक्टरचा नाद नको करू उगी, मरशील फुकट” असे म्हणून त्याला दाबले. थोडावेळ मग ग्रीकांत चलबिचल झाली. ते पाहून यवनभीष्म नेस्टॉरचे पित्त खवळले आणि त्याने त्यांच्या भ्याडपणाबद्दल त्यांना आपण तरुण असतो तर कसे लढलो असतो वगैरे चार शब्द सुनावले. ते ऐकून ९ लोक तडकाफडकी उठून उभे राहिले: खुद्द अ‍ॅगॅमेम्नॉन, तरणाबांड डायोमीड, थोरला आणि धाकटा अजॅक्स, क्रीटाधिपती इडोमेनिअस, त्याचा साथीदार मेरिऑनेस,युरिपिलस, थोआस आणि शेवटी ओडीसिअस हे नऊ जण एकदम उभे राहिले. तेव्हा मग फासे टाकून निर्णय घ्यावा असे ठरले. प्रत्येकाने आपापले चिन्ह अ‍ॅगॅमेम्नॉनच्या हेल्मेटमध्ये टाकले. नेस्टॉरने त्यातून रँडमली एक चिन्ह बाहेर काढले – ते होते थोरल्या अजॅक्सचे. आता हेक्टर विरुद्ध थोरला अजॅक्स अशी घमासान फाईट होणार होती. समस्त ग्रीक आणि ट्रोजन योद्धे जवळ येऊन पाहू लागले काय होते ते.

बैलांच्या कातड्याची सात आवरणे एकावर एक चढवून शेवटचा आठवा थर ब्राँझचा लावलेली अशी मोठ्ठी जाड आयताकृती ढाल आणि भाला घेऊन थोरला भीमकाय अजॅक्स हेक्टरजवळ आला आणि त्याला पाहून क्षणभर हेक्टरलाही धस्स झाले. टिपिकल वीरश्रीयुक्त बोलाचाली झाल्यावर लढाईला तोंड फुटले. सर्वप्रथम हेक्टरने अजॅक्सवर भाला फेकला. त्याच्या ढालीचे ६ थर भेदून ७ व्या थरात तो अडकला. प्रत्त्युत्तर म्हणून अजॅक्सनेही एक भाला हेक्टरवर फेकला. तोही हेक्टरची ढाल भेदून त्याच्या चिलखताला स्पर्श करून हेक्टरला इजा करू शकला असता, पण हेक्टरने वेळीच बाजूला होऊन आपले प्राण वाचवले. नंतर दोघांनीही आपापल्या ढालीत अडकलेले भाले काढून फेकून दिले आणि एकमेकांवर तुटून पडले. हेक्टरने अजॅक्सच्या ढालीवर एकदम मध्यभागी नेम धरून एक छोटासा भाला फेकला, पण ढालीच्या ब्राँझला काही तो भेदू शकला नाही. भाल्याचे टोक मात्र वाकडे झाले. मग अजॅक्सने हेक्टरच्या ढालीच्या आरपार भाला मारला. हेक्टरच्या मानेला लागून तिथून रक्त वाहू लागले, पण हेक्टर मोठा बहाद्दर. लढणे सोडले नाही. जरा मागे होऊन त्याने हातात एक मोठा दगड घेतला आणि अजॅक्सच्या ढालीवर पुन्हा एकदा जोराने आपटला, पण ढाल काही तुटली नाही, ब्राँझचा मोठा आवाज मात्र झाला. आता दगड का जवाब बडे धोंडे से या न्यायाने सांड अजॅक्सने एक अजूनच मोठा दगड हातात घेऊन सरळ हेक्टरवर फेकला. हेक्टरने तो ढालीवर थोपवला खरा, पण त्यात त्याची ढालच मोडून पडली आणि दगडाच्या वजनाने तो खाली पडला. यानंतरही त्यांनी तलवारींनी एकमेकांचे शिरकाण नक्कीच केले असते, पण दोन्ही बाजूंच्या लोकांनी त्यांना थोपवले.हेक्टरने अजॅक्सच्या युद्धकौशल्याची स्तुती केली आणि त्याला एक चांदीच्या मुठीची तलवार दिली. बदल्यात अजॅक्सने त्याला जांभळ्या रंगाचे एक गर्डल दिले.

ग्रीकांना हेलेन ऐवजी फक्त खजिना परत देण्याची ऑफर

यानंतर ग्रीकांची एक सभा भरली. नेस्टॉरने एक सूचना मांडली की ग्रीकांनी आपल्या जहाजांभोवती एक संरक्षक भिंत उभारावी. ती मान्य होऊन कार्यवाहीला लगेच सुरुवात झाली. इकडे ट्रोजनांचीही एक खडाजंगी सभा भरली. अँटेनॉर नामक ट्रोजन वीर म्हणाला, की आता लै झालं. लै लोक मेलेत. त्या हेलेनला आणि तिच्याबरोबर जो खजिना आला त्याला गप गुमानं त्या मेनेलॉसला देऊन टाका. कशापायी अजून ट्रोजनांना मारायचं? हे ऐकून पॅरिस खवळला-जे साहजिक होते. त्याने खजिना परत द्यायची तयारी दर्शवली, पण हेलेन काही परत देणार नाही यावर तो ठाम होता. शेवटी खजिना परत देण्याची ऑफर घेऊन ग्रीक कँपपाशी इदाएउस नामक ट्रोजन दूत आला. ती ऑफर ऐकून डायोमीडने कठोर शब्दांत त्याचे वाभाडे काढले. अ‍ॅगॅमेम्नॉनने ट्रोजनांनी आपले मृत लोक परत घेऊन त्यांचे दहन करेस्तोवर युद्ध न करण्याला तेवढी संमती दिली आणि ट्रोजन लोक दहनविधीच्या कामाला लागले. ग्रीकही आपले मृत लोक एकामागोमाग एक दहन करू लागले. हळूहळू ग्रीकांनी संरक्षक भिंतही उभी केली.भिंत उभी करणे अन मृतांचे दहन करणे यात रात्र निघून गेली.

हेक्टरची सरशी

जहाजांभोवती भिंत उभी करून ,दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी घाईघाईने नाष्टा वगैरे करून ग्रीक अन पाठोपाठ ट्रोजन दोघेही लढायला बाहेर पडले. ट्रोजनांची संख्या ग्रीकांपेक्षा कमी होती असे होमर म्हणतो.

आकाशात विजांचा लखलखाट होत होता. अजॅक्स, अ‍ॅगॅमेम्नॉनसारखे अतिरथीही घाबरले आणि मागे हटले. पण नेस्टॉर मात्र हटू शकला नाही. कारण पॅरिसने त्याच्या एका घोड्याला डोक्यात बाण मारून प्राणांतिक जखमी केले असल्याने तो जागेवरून हलू शकत नव्हता. डायोमीडने ओडीसिअसला ओरडून नेस्टॉरच्या मदतीस जाण्यास सांगितले, पण ओडीसिअस काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता-तो तसाच आपल्या जहाजाकडे पळाला. ते पाहून डायोमीड स्वतः नेस्टॉरजवळ गेला आणि आपल्या रथात त्याला घेतले. डायोमीडच्या सेवकांनी नेस्टॉरच्या घोड्यांना ग्रीक छावणीकडे नेले. इतक्यात हेक्टर त्यांच्या जवळ आला. डायोमीडने हेक्टरवर नेम धरून एक भाला फेकला, तो त्याचा सारथी एनिओपेउस याला लागून तो मरण पावला. तो मेल्यावर हेक्टरने आर्किटॉलेमस या ट्रोजनाला आपला नवा सारथी म्हणून घेतले.

आता डायोमीड परत जात असतानाच त्याच्या रथाजवळच वीज पडली. दोघेही घाबरले, त्याच्या रथाचे घोडे घाबरून खिंकाळू लागले. नेस्टॉरच्या मते हा झ्यूस देवाकडून झालेला अपशकुन होता. देव हेक्टरच्या बाजूने असल्याचे ते चिन्ह होते. इकडे हेक्टर डायोमीडला “भित्रा, बुळगा” वगैरे शिव्या घालतच होता. इतक्यात आकाशात एक गरुड आपल्या पंज्यात हरणाचे नवजात पिल्लू घेऊन जाताना दिसला. (मूळ उल्लेख ” ईगल विथ अ फॉन इन इट्स टॅलॉन्स” असा उल्लेख आहे. नेटवर पाहिले असता फॉन म्हंजे नवजात हरिणशावक, साईझ एखाद्या छोट्या मांजराएवढा असे दिसले. त्यामुळे गरुडाने त्याला उचलणे तत्वतः शक्य आहे) तो शुभशकुन मानण्याची ग्रीक प्रथा असल्याने ग्रीकांना स्फुरण चढले. इथेही सर्वप्रथम डायोमीडने आगेलाउस नामक ट्रोजनाला भाला खुपसून मारले. पाठोपाठ खुद्द अ‍ॅगॅमेम्नॉन, मेनेलॉस, थोरला अन धाकटा अजॅक्स, इडोमेनिअस, युरिप्लस आणि थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ धनुर्धारी ट्यूसर हे वीर पुढे आले. ट्यूसरची युक्ती भारी होती. आपल्यावर बाण कोसळू लागले, की थोरल्या अजॅक्सच्या भल्यामोठ्या ढालीआड तो लपायचा. त्याने एका दमात ऑर्सिलोखस, ऑर्मेनस, ऑफेलेस्तेस, दाएतॉर, क्रोमियस, लायकोफाँटेस, आमोपाओन, मेलॅनिप्पस या ट्रोजन वीरांना वीरगती मिळवून दिली. त्याचा फॉर्म बघून अ‍ॅगॅमेम्नॉनने त्याची पाठ थोपटली. त्याने नंतर एक बाण सरळ हेक्टरवर
सोडला, पण तो त्याला न लागता प्रिआमचा अजून एक पुत्र गॉर्गिथिऑन याला लागून तो जागीच मरण पावला. यावर ट्यूसरने अजून एक बाण हेक्टरवर सोडला. तोही त्याला न लागता त्याचा सारथी आर्किटॉलेमस याला लागून तो मरण पावला.

आता मात्र हेक्टरचे पित्त खवळले. तो रथातून उतरला, आणि हातात एक भलाथोरला धोंडा घेऊन ट्यूसरच्या दिशेने धावला. ट्यूसर नवीन बाण प्रत्यंचेवर चढवणार इतक्यात हेक्टरने त्याच्या खांद्याच्या हाडावर तो धोंडा जोरात आदळून ते हाडच मोडले. ट्यूसर कोसळला. आपला भाऊ वेदनेने तळमळत असलेला पाहून थोरला अजॅक्स तिथे धावून आला. मेखिस्तेउस आणि अलास्तॉर या त्याच्या सेवकांनी ट्यूसरला तशाच अवस्थेत जहाजांपाशी नेले. हेक्टरने यावेळी बर्‍याच ग्रीकांना यमसदनी धाडले. पार जहाजांपर्यंत मागे हाकलले. नंतर हेक्टरने एक सभा बोलावली आणि ग्रीकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. ग्रीक कुत्र्यांना आपण माघारी हाकललेच पाहिजे, ते पळून जायचा प्रयत्न करतील तरी तेव्हा त्यांना भाले-बाणांच्या जखमा उरीशिरी वागवतच परत जायला लागले पाहिजे, वगैरे वीरश्रीयुक्त भाषण करून सभा बरखास्त झाली आणि रात्र पडली. ग्रीकांवर लक्ष ठेवणारे कितीक ट्रोजन्स अंधारात आपल्या घोड्यांसह आगींच्या उजेडात बसले होते. दुसर्‍या दिवशी काय होते याची वाट पहात.

अ‍ॅगॅमेम्नॉनची हतबलता आणि अकीलिसची समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न

हेक्टरच्या शौर्याने स्तिमित झालेल्या अ‍ॅगॅमेम्नॉनने एक सभा बोलावली. त्याला सभेत बोलताना रडू कोसळले होते. “झ्यूसदेवाने आपल्यावर मोठी अवकृपा केली, आपण उद्या गप निघून आपापल्या घरी परत जाऊ, ट्रॉय घेणे आपल्याच्याने काही होईल असे वाटत नाही” वगैरे ऐकून सगळ्यांना कळायचं बंद झालं. सगळे तसेच दु:खी होऊन बसले, पण तरणाबांड यवनवीर डायोमीड मात्र रागाने ताडकन उठून उभा राहिला. “तुला काय वाटलं आम्ही सगळ्यांनी बांगड्या भरल्यात का? पहिल्यांदा मला भित्रा म्हणाला होतास तू, आणि आज तू असा भित्र्यागत पळून चाललास? लाज वाटते का? तू गेलास तरी बेहत्तर, बाकीचे गेले तरी बेहत्तर, पण स्थेनेलस आणि मी ट्रॉय घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आर्गोसहून आम्ही आलो तेव्हा देवांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते.”

हे ऐकून यवनभीष्म नेस्टॉरने तरुण असूनही दाखवलेल्या मॅच्युरिटीबद्दल डायोमीडची प्रशंसा केली आणि अकीलिसची माफी मागून, त्याला भेटवस्तू वगैरे देऊन परत लढण्यास राजी करण्याबद्दल सांगितले. तेव्हा अ‍ॅगॅमेम्नॉनने अकीलिसला भरपाई देण्याचे कबूल केले- इतक्या भरघोस भेटवस्तू नुसत्या ऐकूनच पागल व्हायची पाळी. काय होत्या त्या भेटवस्तू आणि ओव्हरऑल ऑफर?

-अजून एकदाही आगीची धग न लागलेल्या ७ तिवया.
-दहा टॅलेंट भरून-जवळपास २५०-३०० किलो-सोने.
-वीस लोखंडी कढया/काहिली.
-रेस जिंकून बक्षिसे मिळवलेले बारा घोडे.
-लेस्बॉस बेटावरचे अतिकुशल कामगार.
-अकीलिसपासून हिरावून घेतलेली ब्रिसीस ही मुलगी त्याला परत देण्यात येईल. (बादवे अ‍ॅगॅमेम्नॉनने तिला हातही लावला नव्हता)
-ट्रॉयहून परतताना जी लूट मिळेल तिचा मोठा हिस्सा अकीलिसला दिला जाईल.
-हेलेनखालोखाल हॉट अशा वीस ट्रोजन बायका त्याला दिल्या जातील.
-अ‍ॅगॅमेम्नॉनला क्रिसोथेमिस्,लाओदिस,इफिआनास्सा या तीन मुली होत्या (इफिजेनिया नामक मुलीला आधी ठार मारले गेले ती सोडून) आणि ओरेस्टेस हा मुलगा होता. तीन मुलींपैकी आवडेल तिच्याशी अकीलिसचे लग्न लावले जाईल.
-कार्डामिल, एनोपे, हिरे,फेराए, आंथिआ,आएपेआ आणि पेडॅसस ही सात शहरे आणि त्यांची सर्व संपत्ती अकीलिसच्या नावे केली जाईल.

इफिआनास्सा म्हंजेच इफिजेनिया. ट्रॉयला जाण्याअगोदर तिचा बळी दिला गेला असा उल्लेख उत्तरकालीन साधनांत लै आढळतो, पण स्वतः होमर त्याचा उल्लेख करतच नै. अंमळ विचित्रच प्रकर्ण आहे हे.

ही ऑफर ऐकून नेस्टॉर खूष झाला. त्याला खात्री होती की आता अकीलिस पाघळेल आणि नक्की युद्धाला जॉइन होईल. त्याने थोरला अजॅक्स, ओडीसिअस यांना अकीलिसचा एक सबॉर्डिनेट फीनिक्स याबरोबर अकीलिसकडे पाठवले. ते त्याच्या तंबूत पोहिचले. तिथे अकीलिस आणि पॅट्रोक्लस दोघे आरामात वाईन पीत बसले होते. अकीलिस लायर वाजवत होता. त्यांना पाहताच अकीलिसने त्यांचे स्वागत केले, “वाईन टाक पावन्यास्नी” अशी आज्ञा केली. ओडीसिअसने अ‍ॅगॅमेम्नॉनची ऑफर अकीलिसला सांगितली. पण अकीलिसचा राग काही जायला तयार नव्हता.

“सतत नऊ वर्षे एकसारखे लढून ग्रीकांच्या ताब्यात मी १२ शहरे अन ११ बेटे आणली त्याची कुणाला पर्वा नाही. मी लढाईत असेपर्यंत हेक्टरची जहाजांपर्यंत यायची छाती झाली नाही. हाती आलेल्या लुटीचा थोडासा हिस्सा इतरांना देऊन मुख्य वाटा स्वतःसाठीच ठेवणारा तो हावरट अ‍ॅगॅमेम्नॉन-इतर कुणालाही सोडून फक्त माझ्याकडूनच त्याने ब्रिसीसला काढून घेतले-मला ती आवडायची, तरीसुद्धा! स्वत:च्या बायकोसाठीच तर हे युद्ध चाललंय ना? अख्ख्या जगात मेनेलॉस सोडून कुणाच्या बायका कधी हरवल्या नाहीत काय? तरीही हे बायकांसाठी युद्ध करतात, आणि वर तोंड करून मलाच म्हणतात की कशाला ब्रिसीससारख्या क्षुल्लक पोरीवरून कशाला उगीच भांडतोस म्हणून. मरा लेको. उद्याच्या उद्या मी तरी निघालो माझ्या घरी. पेलिअस (अकीलिसचा बाप) माझ्यासाठी चांगली ग्रीक बायको बघून ठेवेल, मला चिंता नाही त्याची. तो कुत्रा अ‍ॅगॅमेम्नॉन मला आत्ता जितके देऊ पाहतोय त्याच्या वीसपट जरी दिले तरी मला नकोय. इजिप्तमधील थीब्स सारखे अख्ख्या दुनियेत श्रीमंत असलेले शहर देऊ केले तरी नकोच. त्यामुळे माझा राग निवळेस्तोवर मी काही लढणार नाही. आपली जान प्यारी असेल तर दुसरा काही प्लॅन करा जावा.”

हे निर्वाणीचे उत्तर ऐकून अजॅक्सने नापसंती दर्शवली आणि अकीलिसला पुनर्विचार करण्याची विनंती केली. अकीलिस म्हणाला, की अजॅक्सचे म्हण्णे तसे खरे आहे, पण भर सभेत सर्वांदेखत अ‍ॅगॅमेम्नॉनने जो अपमान केला तो आठवल्यावर आजही पित्त खवळते-इलाज नाही. मग गप वाईन पिऊन थोरला अजॅक्स आणि ओडीसिअस गेले अ‍ॅगॅमेम्नॉनकडे. अकीलिसचा जबाब ऐकून डायोमीड म्हणाला, की अकीलिस फार गर्विष्ठ आहे. त्याला वाटेल तेव्हा तो लढूदे. तोपर्यंत आपण आपले काम करू. तूर्त रात्रीची विश्रांती घेऊ आणि उद्या नीट लढण्याच्या बेताची आखणी करू. याला सर्वांनी संमती दिली आणि सर्वजण झोपून गेले.

डायोमीड आणि ओडीसिअसने अंधारात उडविलेली कत्तल

अकीलिसने लढायला नकार दिल्यावर अ‍ॅगॅमेम्नॉनची झोप हराम झाली होती. तो अंथरुणातून उठला, फ्रस्ट्रेशनमुळे त्याने आपल्या डोक्यावरचे काही केसच उपटून काढले आणि जोरात ओरडू लागला. त्याला कळायचे बंद झाले होते. शेवटी तो तयार झाला, मेनेलॉस, नेस्टॉर, डायोमीड, ओडीसिअस, इ. चीफ लोकांना घेऊन मसलत सुरू केली.

मगाशी सांगितल्याप्रमाणे हेक्टरने ग्रीकांवर नजर ठेवण्यासाठी ट्रोजन सैनिकांना नियुक्त केले होते. त्यांनी पेटवलेल्या शेकडो शेकोट्या अंधारात दिसत होत्या. ट्रोजनांचा नक्की बेत काय आहे-ते इथेच थांबणार की शहरात परत जाणार की लगेच हल्ला करणार हे कळावे यासाठी एकदोघा दबंग ग्रीकांनी त्यांच्यापर्यंत जावे असा प्रस्ताव नेस्टॉरने मांडला. पण हे पडलं जोखमीचं काम. कोण करणार? अपेक्षेप्रमाणे डायोमीड पुढे आलाच. पण त्याने अजून एकाची मागणी केली. कित्येकांनी त्याबरोबर जायची तयारी दर्शवली. शेवटी अ‍ॅगॅमेम्नॉनचे मत पडले की डायोमीडनेच बेस्ट साथीदार निवडावा. शेवटी त्याने ओडीसिअसची निवड केली. दोघांनी मिनर्व्हा देवीची प्रार्थना केली, इतरांनी दिलेली शस्त्रे घेतली आणि ते ट्रोजनांच्या दिशेने निघाले.

इकडे हेक्टरचीही खलबते सुरू होती. ग्रीकांच्या जहाजांवरची देखरेख अजूनही पूर्वीसारखीच टाईट आहे की आता ढिली पडलीय हे जाणण्यासाठी ग्रीक छावणीपर्यंत जो कोणी जाईल त्याला मोठे बक्षीस हेक्टरने जाहीर केले- ग्रीक छावणीतला सर्वोत्तम रथ आणि सर्वांत चपळ घोडे. हे ऐकून डोलोन नामक एक ट्रोजन पुढे आला. तो चांगला चपळ रनर होता. त्याने हेक्टरकडे चक्क अकीलिसच्या रथ-घोड्यांची मागणी केली. हेक्टरही राजी झाला. पोकळ आश्वासने द्यायची पद्धत लैच पुरानी असल्याचे अजून एक उदाहरण मग धनुष्य-बाण-चिलखतादि घेऊन डोलोन निघाला. तो काही अंतर गेल्यावर त्याची चाहूल डायोमीड आणि ओडीसिअसला लागली. ते इतस्ततः पडलेल्या प्रेतांत लपून बसले. डोलोन जरा पुढे गेल्यावर ते दोघेही त्याच्या मागे धावू लागले. पहिल्यांदा डोलोनला वाटले की ट्रोजनांपैकीच कुणी असतील म्हणून. त्यामुळे त्याने आपला वेग कमी केला. पण जवळ आल्यावर कळाले की दोघे शत्रू आहेत ते. मग तो खच्चून पळू लागला, पण उपयोग झाला नाही. त्यांनी त्याला पकडले आणि ट्रोजन तळाची माहिती द्यायची आज्ञा केली.

डोलोनने सांगितल्यानुसार शेकोट्या पेटवलेले सगळे शुद्ध ट्रोजन्स होते. साथीदार नव्हते कारण साथीदारांनी ती जबाबदारी ट्रोजनांवर टाकली होती. साथीदार दूरवर झोपा काढत होते. कॅरियन्स, पेऑनियन धनुर्धारी, लेलेग्स,कॉकोनियन्स आणि पेलास्गी यांच्या छावण्या समुद्राजवळ दूरवर होत्या. नंतर थ्रेशियन लोकांची छावणीही जवळच होती. पण हेक्टरबद्दल त्याने काही सांगितले नाही. हे सगळे कळाल्यावर तरी त्याला सोडतील अशी बिचार्‍या डोलोनची आशा होती, पण डायोमीडने त्याला सरळच सांगितले की आत्ता जिवंत सोडल्यास नंतर परत कधीतरी तो गुप्तहेर म्हणून येईल, त्यापेक्षा आत्ताच मारल्यास नंतर डोक्याला ताप होणार नाही. मग त्याने डोलोनच्या मानेत तलवार खुपसून त्याला ठार मारले. त्याचे सामान झाडावर टांगून ठेवले- देवी मिनर्व्हाला अर्पण केले. आणि थ्रेशियन सैनिकांच्या तळाकडे निघाले. थकून विश्रांती घेणार्‍या बारा सैनिकांना डायोमीडने ठार मारले. त्यांची शरीरे ओडीसिअस ओढून रस्त्याकडेला टाकत होता-घोड्यांनी त्यावर पाय टाकून बिथरू नये म्हणून. इकडे डायोमीडच्या मनात अजून काही सैनिकांना मारावे किंवा थ्रेशियन राजाचे चिलखत चोरावे याबद्दल संभ्रम होता 😉 थ्रेशियन राजाच्या रथाचे घोडे रथापासून अलग करून त्यावर बसून अखेरीस दोघे परत निघाले. परत आल्यावर सर्वांनी त्यांचे स्वागत केले.

इथे १० वे बुक संपते. हे विस्तृतपणे देण्याचे कारण म्हंजे अकीलिस सोडून बाकीच्या वीरांबद्दल होमरने काय लिहिले आहे, ते कळावे.

आत्तापर्यंतचे हायलाईट्सः

१. विविध ग्रीक अन ट्रोजन योद्ध्यांचा महापराक्रम

२. अकीलिसचा राग अजूनही गेलेला नाही.

३. हेक्टर-अजॅक्स फाईटमध्ये थोरला अजॅक्स मेला नव्हता.

मुख्य म्हंजे इतक्या लढाया होऊनही पारडे निर्णायकपणे कुणा एका बाजूस सरकत नव्हते. पण लवकरच काही मोठ्या घडामोडी घडणार होत्या….

(क्रमशः)

Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | 4 प्रतिक्रिया